आयुर्वेदानुसार ‘धातु’ या शब्दाचा अर्थ शरीराला धारण करणारे घटक असा होतो. ‘धातु’ शब्दातील ‘धृ-धारयति’ या क्रियापदाचा अर्थ धारण करणे, पोषण करणे असा होतो. शरीरातील असे घटक जे शरीराला आधारभूत आहेत, त्या सर्वांचा समावेश आयुर्वेदामध्ये ‘धातु’ या शब्दाच्या अंतर्गत केलेला आहे. आयुर्वेदीय ग्रंथात रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सात धातू सांगितले आहेत.

सुश्रुत संहितेत वात, पित्त, कफ हे तीन दोष आणि मल, मूत्र हे जोपर्यंत शरीरात योग्य प्रमाणात असतात, तोपर्यंत त्यांचा समावेश धातूंमध्ये करावा असे सांगितले आहे. धातूंच्या  मोजमापाबाबत ग्रंथांत वर्णन आहे. आयुर्वेदात प्रत्येक धातूच्या मोजमापाचे सामान्यीकरण केलेले नसून ते व्यक्तीपरत्वे वेगवेगळे मानलेले आहे आणि ते वस्तुमानाच्या भाषेत मोजावयास सांगितले आहे.

आपण जो आहार घेतो त्याच्या सार भागापासून आहाररस तयार होतो. आहाररसापासून रसधातू तयार होतो. रसधातूच्या काही अंशांपासुन रक्तधातू तयार होतो. याचाच अर्थ आपल्या आहारात ज्या धातूला अनुकूल असे घटक असतील त्यानुसार क्रमाने पुढील धातू तयार होतात.

धातूंची गुणवत्ता शरीरात उत्तम असेल, तर त्यासाठी ‘धातुसारता’ या शब्दाचा वापर केलेला आहे. उदा., ज्या व्यक्तीमध्ये रसधातू उत्तम असेल तर ती व्यक्ती रससार होय. ही सारता तपासण्यासाठी विविध परिक्षा वर्णन केलेल्या आहेत. रोजच्या कामांमुळे तसेच आजारामुळे या धातूंमध्ये अवास्तव वाढ किंवा झीज होत असते. अशावेळी जो धातू कमी झाला त्या धातूंच्या समान गुणधर्माचा आहार घ्यावा. उदा., मांसाहार केला तर मांसधातू वाढतो. नारळाचे पाणी प्यायल्याने रसधातूची झीज भरून निघते. निरोगी व्यक्तीची व्याख्या करताना ‘समधातु’ हा शब्द ग्रंथकारांनी  वापरला आहे. म्हणजे ज्या व्यक्तीच्या शरीरात सातही धातू योग्य प्रमाणात असतात, ती व्यक्ती निरोगी असते. म्हणून आयुर्वेद शास्त्राच्या प्रयोजनाचा एक भाग धातूसाम्य राखणे असा होतो. धातूंचा उल्लेख शरीराचे मूळ कारण असाही केलेला आहे.

पहा : अस्थिधातु, धातु-२, दोषधातुमलविज्ञान, मज्जाधातु, मांसधातु, मेदधातु, रक्तधातु, रसधातु, शुक्रधातु.

संदर्भ :

  • अष्टांगहृदय – सूत्रस्थान,  अध्याय १ श्लोक १३, ४४, ५३.
  • चरक संहिता -विमानस्थान,  अध्याय ८ श्लोक १०३.
  • चरक संहिता – शारीरस्थान, अध्याय ७ श्लोक १५.
  • सुश्रुत संहिता – सूत्रस्थान, अध्याय १४ श्लोक ३, २०.
  • सुश्रुत संहिता – सूत्रस्थान,  अध्याय १५ श्लोक ३, ४१.

समीक्षक – अनुपमा देवपुजारी