कर्ण म्हणजे कान व पूरण म्हणजे भरणे. कानात एखादे पातळ औषध किंवा औषधीयुक्त तेल टाकण्याच्या क्रियेला कर्णपूरण म्हणतात. यास कर्णतर्पण असेही म्हणतात. तर्पण म्हणजे तृप्तता. ऐकण्याचे काम योग्य प्रकारे होत असल्याने कान तृप्त होतात, म्हणून कर्णतर्पण असा शब्दप्रयोग आला आहे.

कानाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी तसेच कानाशी संबंधित आजारांच्या उपचारासाठीही कर्णपूरण करतात. दररोज जर कानात योग्य पद्धतीनुसार तेल टाकले, तर कान निरोगी राहतात. वाढलेल्या वातदोषाच्या उपद्रवामुळे मान अकडणे, हनुवटी जखडणे, ऐकायला कमी येणे यांसारखे विकार होत नाहीत. कुठल्या आजारासाठी कुठल्या औषधाचे पूरण करावे याचे निर्देश आहेत. शिवाय ते औषध किती वेळ कानात टाकून ठेवावे याचेही वर्णन आहे. हा कालावधी ‘मात्रा’ या संज्ञेद्वारे सांगितला आहे. जसे निरोगी व्यक्तीने कानाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी तेलाचे कर्णपूरण केले असता ते शंभर मात्रा एवढा वेळपर्यंत कानात तसेच ठेवावे व नंतर पुसून घ्यावे. एक मात्रा म्हणजे निरोगी व्यक्तीत आपसूकपणे डोळ्यांची उघडझाप होण्यासाठी लागणारा वेळ. कुठल्या हेतूसाठी कर्णपूरण करावयाचे आहे त्यानुसार हा कालावधी शंभर मात्रा ते हजार मात्रा एवढा असू शकतो.

कर्णपूरण करण्यासाठी ज्या कानात औषध किंवा तेल टाकायचे असेल त्याच्या विरुध्द कुशीवर व्यक्तीस झोपविले जाते व त्या कानाभोवती सहन होईल इतक्या गरम कापडाने शेकले जाते. नंतर सहन होईल इतपत कोमट तेल किंवा औषध टाकून आवश्यक मात्रांपर्यंत ते कानात ठेवले जाते. औषध किंवा तेल कानात असेपर्यंत कानाच्या मुळाशी हळूवार चोळले जाते. नंतर हे औषध किंवा तेल स्वच्छ कापसाच्या साहाय्याने पुसले जाते. निरोगी व्यक्तीत तेलाचे कर्णपूरण सूर्यास्तानंतर करणे जास्त लाभदायक असते.

संदर्भ :

  • अष्टांगसंग्रह — सूत्रस्थान, अध्याय ३१ श्लोक २१, २२.
  • चरक संहिता — सूत्रस्थान, अध्याय ५ श्लोक ८४.
  • शार्ङधर संहिता, अध्याय ११ श्लोक १४५.
  • सुश्रुत संहिता — चिकित्सास्थान, अध्याय २४ श्लोक २९.

समीक्षक – जयंत देवपुजारी