शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. धातू पोषण क्रम विचारात घेतल्यास, एकूण सात धातूंपैकी अस्थीधातू हा पाचव्या क्रमांकाचा धातू आहे. अस्थी शब्दातील ‘स्था’ धातू त्याचे चिरकाली म्हणजेच शरीराच्या नाशानंतरही टिकणारे अस्तित्व दर्शवते. शरीराची स्थिती प्रामुख्याने या धातूवर अवलंबून असल्यानेही यास अस्थी असे म्हणतात. अस्थीद्वारे तयार झालेल्या सापळ्यामुळे आतल्या मृदू अवयवांचे संरक्षण होते.

प्राचीन आयुर्वेद ग्रंथांत अस्थींची गणना केली आहे. चरकाचार्यांनी त्यांची संख्या ३६० सांगितली आहे. तर सुश्रुताचार्यांनी ही संख्या ३०० सांगितली आहे. आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार शरीरातील हाडांची संख्या २०६ आहे. मोजण्यातील भिन्नतेमुळे संख्येत ही तफावत आहे. चरकाचार्यांनी अस्थीप्रमाणे कडक वाटणाऱ्या नखांचाही समावेश अस्थींमध्ये केला आहे. त्याचप्रमाणे दात व दातांना धरून ठेवणाऱ्या रचना ज्याला दंतोदूखल म्हणतात, त्यांचाही समावेश अस्थींमध्ये केला आहे. आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार सांध्यांच्या ठिकाणी, दोन हाडांच्यामध्ये असणाऱ्या चिवट रचना म्हणजे कूर्चा किंवा उपास्थी (Cartilage) यांचाही समावेश आयुर्वेदाचार्यांनी अस्थींमध्ये केला आहे. तसेच छातीच्या फासळ्यांची संख्या २४ आहे. आयुर्वेदात प्रत्येक सलग फासळीच्या ठिकाणी तीन वेगळे अस्थी मानल्यामुळे ही गणना २४×३ अशी केलेली आढळते. इतरही काही मोजण्यातील फरकामुळे संख्येत ही भिन्नता आढळते.

सुश्रुताचार्यांनी अस्थीचे रचनेनुसार पाच प्रकार सांगितले आहेत. पसरट आकाराच्या अस्थींना कपालास्थी, गोलाकार अस्थींना वलयास्थी, लवचिक हाडांना तरुणास्थी, चावण्याचे काम करून अन्नाची चव जाणवून देण्यात सहभागी होणाऱ्या दातांना रुचकास्थी, तर लांब आकाराच्या अस्थींना नलकास्थी म्हटले आहे. याचे क्रियात्मक कार्य म्हणजे हा धातू त्याच्या पुढच्या धातूचे म्हणजेच मज्जाधातूचे पोषण व धारण करतो. शरीरावरील केस, लव व नखे हे अस्थीधातूचे मल सांगितले आहेत.

अस्थीधातू अधिक प्रमाणात वाढल्यास अस्थी अर्बुद, अस्थी अधिक जाड होणे, केस व नखे अतिशय वाढणे ही लक्षणे जाणवतात. या धातूचा ऱ्हास झाल्यास हातांमध्ये वेदना, दात व नखे ठिसूळ होणे किंवा तुटणे, शरीरावरील लव व केस गळणे, थकवा, सांध्यांच्या ठिकाणी शिथिलता येणे ही लक्षणे जाणवतात.

उत्कृष्ट अस्थीधातू असणारी व्यक्ती अस्थिसार म्हणविली जाते. अस्थिसार व्यक्तींच्या टाचा, घोटे, गुडघे, मनगट, खांदे, हनुवटी, डोके, बोटांची पेरे मजबूत व स्थूल असतात. तसेच नखे व दातही दृढ असतात. या व्यक्ती उत्साही, सतत काम करणाऱ्या व शारीरिक तसेच बौद्धिक कष्ट सहन करू शकणाऱ्या असतात. स्थिर व बलवान शरीर असलेल्या अशा व्यक्ती दीर्घायुषी असतात.

पहा : धातु, धातु-२, दोषधातुमलविज्ञान, मज्जाधातु.

संदर्भ :

  • चरक संहिता – चिकित्सास्थान, अध्याय १५ (श्लोक १८,१९).
  • चरक संहिता – विमानस्थान, अध्याय ८ श्लोक  १०७.
  • चरक संहिता – सूत्रस्थान, अध्याय १७ श्लोक ६७.
  • सुश्रुत संहिता – शारीरस्थान, अध्याय ५ (श्लोक १८, २२), अध्याय ३५ (श्लोक १६).
  • सुश्रुत संहिता – सूत्रस्थान, अध्याय १५ श्लोक ९.

समीक्षक – जयंत देवपुजारी