आकाराने सर्वांत मोठा विषारी साप. नागराजाचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना असून ऑफिओफॅगस प्रजातीत नागराज ही केवळ एकच जाती आहे. त्याच्या नावात जरी नाग हा शब्द असला तरी तो सामान्य नागाहून (कोब्रा) वेगळा आहे. त्याचा समावेश इलॅपिडी कुलाच्या ऑफिओफॅगस प्रजातीत होतो तर नागाचा (कोब्रा) समावेश इलॅपिडी कुलाच्या नाजा प्रजातीत होतो. नागराज हा प्रामुख्याने आशियात आढळत असून भारतापासून फिलिपीन्स व इंडोनेशियापर्यंत आढळतो. पूर्व चीनमध्ये तो तुरळकपणे आढळतो. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या सीमाभागातील बांदीपूर, निलगिरी वनांत, तमिळनाडू, केरळ आणि आसाममधील वनांत नागराज दिसून येतो. तो हल्लेखोर आणि चपळ साप आहे.
पूर्ण वाढलेल्या नागराजाची लांबी सामान्यत: ३ ते ४ मी. असते; परंतु काही वेळा त्याहून अधिक सु. ५.६ मी.पर्यंत असू शकते. रंग पिवळा, हिरवा तपकिरी किंवा काळा असतो. शरीरावर फिकट पिवळसर किंवा पांढरे आडवे किंवा ‘^’ आकाराचे पट्टे असतात. पोट पिवळसर पांढरे असून पाठीवरील खवले मऊ व एकसारखे असतात. नागराज हा नागाप्रमाणे फणा काढतो. मात्र त्याची फणा नागाच्या फणेहून अरुंद असते. तसेच नागराजाच्या फणेवर १० च्या आकड्यासारखी खूण नसते. त्याचे दोन्ही जबडे परस्परांना जुळलेले नसल्याने तो मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळू शकतो. त्याच्या वरच्या जबड्याच्या पुढील भागावर दोन पोकळ विषदंत (त्यांची कसलीही हालचाल होत नाही असे) असतात. त्यातून भक्ष्याच्या शरीरात विष अंत:क्षेपित केले जाते. नर नागराज मादीहून आकाराने मोठा आणि जाड असतो. नागराजाच्या डोक्यावर सहज दिसू शकतील असे दोन पश्चकपाल (ऑक्सिपिटल) खवले असतात. त्यामुळे तो सहज ओळखता येतो. त्याची जीभ दुभंगलेली असून तो सतत जीभ आतबाहेर करतो. जिभेच्या टोकावर आलेल्या गंधकणांचे ज्ञान त्याच्या टाळ्यावर असलेल्या जॅकोबसन अवयवामुळे होते. भक्ष्याचे नेमके स्थान हुडकण्यासाठी आणि मीलनकाळात मादीचा मीलन गंध ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नागराजाचे डोळे तीक्ष्ण असतात. हालचाल करणारी वस्तू १०० मी. अंतरावर असली तरी तो ओळखू शकतो. जमिनीमधील कंपनांचे त्याला उत्तम ज्ञान होते. या कंपनांवरून आणि गंधज्ञानावरून त्याला भक्ष्याचा अचूक पाठलाग करता येतो. एकदा भक्ष्य जबड्यात पकडले की धडपड करणारे भक्ष्य तो जबड्याने गिळू लागतो. नागराजाचा आयुःकाल २० वर्षांचा असतो.
नागराज दिनचर आहे. हा सहसा मानवी वस्तीपासून दूर राहतो. दिवसभरात कोणत्याही वेळी तो भक्ष्य पकडतो. शरीराचा पुढचा एक-तृतियांश भाग उभारून हल्ला करण्याच्या पवित्र्यात तो अनेकदा पाहायला मिळतो. शरीराचा पुढील भाग वर उचलून मान सरळ करून विषाचे दात दाखवून फुत्कार सोडणे, ही त्याची सवय आहे. नागराजाचा फुत्कार इतर सापांच्या तुलनेने मोठा असतो. जवळ आलेल्या व हालचाल करणाऱ्या प्राण्यांमुळे तो चिडतो. बहुधा डिवचल्यानंतर किंवा अडचणीत सापडल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो. नागराज सु. २ मी. अंतरावर असलेल्या प्राण्यावर हल्ला करू शकतो. हल्ला करताना तो फणा वर ठेवूनही पुढे सरकून दंश करू शकतो. यामुळे साप दूर आहे अशा समजुतीने जवळ गेल्यास व्यक्तीचा अंदाज चुकतो आणि ती व्यक्ती नागराजाच्या तडाख्यात सापडते. त्याचा दंश विषारी असून प्रत्येक दंशाच्या वेळी साधारणपणे विषाचे सु. ३० थेंब तो सोडतो.
धामण, लहान अजगर आणि बरेच विषारी साप हे नागराजाचे मुख्य अन्न आहे. मात्र ते न मिळाल्यास तो सरडे, पक्षी आणि लहान कृंतक खातो. मुंगूस हा सापांचा नैसर्गिक शत्रू आहे. परंतु मुंगूस अंगावर आले तर नागराज त्याला प्रतिकार करतो. त्यांच्या झटापटीत बहुधा मुंगसाचा जीव जातो.
नागराजाची मादी ही सापांमध्ये अंड्यांचे रक्षण करणारी एकमेव मादी आहे. वाळलेली पाने आणि गवताचे घरटे करून त्यात मादी २०–४० अंडी घालते. अंड्यामधून पिले बाहेर पडेपर्यंत मादी या पानांच्या घरट्यावर वेटोळे घालून बसते आणि कोणत्याही प्राण्यास अंड्यांच्या जवळपास फिरकू देत नाही. अंड्यांतून पिले बाहेर येण्याच्या वेळी ती घरट्यापासून दूर जाऊन एखादे भक्ष्य खाते. मात्र, स्वत:ची पिले ती खात नाही. जन्मलेली पिले ४५–५५ सेंमी. लांब असतात. पिले काळी कुळकुळीत असून त्यांच्या शरीरावर तसेच शेपटीवर पिवळे किंवा काळे आडवे पट्टे असतात. त्यांचे विष प्रौढ नागराजाएवढे जहाल असते.
नागराजाचे विष चेतासंस्था आणि हृदय यांवर परिणाम करते. विष मुख्यत्वे प्रथिने आणि बहुपेप्टाइडांनी बनलेले असते. विषाचा चेतासंस्थेवर तात्काळ परिणाम होतो. तीव्र वेदना, चक्कर येणे व पक्षाघात ही लक्षणे ताबडतोब दिसतात. दंश केलेल्या व्यक्तीचा हृदयक्रिया बंद पडून, बेशुद्धीसारखी स्थिती उदभवून किंवा श्वसनसंस्थेचा पक्षाघात होऊन ४०–४५ मिनिटांत मृत्यू होतो. नागराजाने दंश केलेल्या सु. ५०% व्यक्ती मरण पावतात. थायलंड रेड क्रॉस आणि हैदराबादमधील सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांनी नागराजाच्या दंशावर दोन वेगवेगळी प्रतिविषे तयार केली आहेत. मात्र, त्यांचे उत्पादन अगदी लहान प्रमाणात असल्याने ती सहज उपलब्ध होत नाहीत.