एक तृणधान्य. बाजरी ही एकदलिकित वनस्पती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पेनिसेटम ग्लॉकम आहे. पे. टायफॉइडस अशा शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. बाजरीचे मूलस्थान पश्‍चिम आफ्रिकेतील असून भारतात ती प्राचीन काळापासून लागवडीखाली आहे. इ.स.पू. २५००–२००० या कालावधीत भारतामध्ये बाजरी लागवडीखाली आली असावी, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. गहू व भात या वनस्पतीही पोएसी कुलातील आहेत. उच्च तापमान, कमी सुपीक जमीन तसेच आम्लयुक्त किंवा क्षारयुक्त जमीन असली, तरी बाजरीची वाढ होते. दुष्काळासारख्या परिस्थितीत हे पीक तग धरून राहते. ज्या परिस्थितीत गहू व मका ही पिके येत नाहीत अशा परिस्थितीत बाजरीचे पीक वाढू शकते.

बाजरी (पेनिसेटम ग्लॉकम): (१)शेतातील पीक (२) कणिशे, (३) दाणे

बाजरीचे खोड भरीव असून सु. २ मी. उंच वाढते. ज्वारी व मका यांच्यासारखे बाजरीचे खोड असून त्याला ८–१० पेरे असतात. खोडाच्या खालच्या पेरापासून आगंतुक मुळे येतात. पान साधे व मोठे असून खोडाला वेढलेले असते. ते २०–३० सेंमी. लांब व ३-४ सेंमी. रुंद असते. खोडाच्या अग्रभागी १०–२४ सेंमी. लांबीचा फुलोरा येतो. फुलोरा लांबट, दंडगोलाकार, केसाळ आणि कणिश प्रकारचा असून त्यात द्विलिंगी फुले असतात. परागण वाऱ्यामार्फत होते. बाजरीची एकबीजी फळे (दाणे) पिवळट करडी असून फलावरण व बीजावरण एकमेकांना घट्ट चिकटलेले असतात.

भारतात बाजरी हे एक प्रमुख पीक असून अनेक लोकांचे ते मुख्य अन्न आहे. गहू, मका व ज्वारी यांच्या खालोखाल बाजरीचा वापर होतो. भात आणि गहू यांच्या एवढेच पोषणमूल्य बाजरीच्या दाण्यांमध्ये असते. सामान्यपणे बाजरीचे दाणे दळून पिठाची भाकरी करतात. हिरवी कणसे भाजून किंवा दाण्यांच्या लाह्या करून खातात. बाजरीच्या १०० ग्रॅ. दाण्यांमध्ये १२% पाणी, ११ % प्रथिने, ५% मेद, ६७% कर्बोदके आणि २% तंतू व २% खनिज पदार्थ असतात. १०० ग्रॅ. बाजरीच्या सेवनातून ३६८ किकॅ. ऊष्मांक मिळतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा