राधाकृष्णन्, सर्वपल्ली : (५ सप्टेंबर १८८८‒१६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२–६७) व पाश्चात्त्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे.

राधाकृष्णन् यांचा जन्म वीरस्वामी व सिता (सिताम्मा) या दांपत्यापोटी आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला. तिरुत्तनी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. उच्च शिक्षण मद्रास (सध्याचे चेन्नई) येथील ख्रिश्चन महाविद्यालयामध्ये झाले. नंतर चेन्नईचे प्रेसिडेन्सी महाविद्यालय (१९०९–१६), म्हैसूर विद्यापीठ (१९१६–२१), कलकत्ता (सध्याचे कोलकाता) विद्यापीठाचे ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’ (१९२१–३१) या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्याच वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर महाविद्यालयामध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक होते (१९२९) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे (१९३१–३५) व बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (१९३९–४८) होते. तसेच लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक (Spalding Professor) होते. १९३१ ते ३९ पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या वेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली.

राधाकृष्णन् यांनी तत्त्वचिंतनात स्वतःची अशी कोणतीच भर घातली नाही, अशी टीका पुष्कळदा त्यांच्यावर केली जाते. ती खरीही आहे आणि खोटीही आहे. खरी अशाकरता की, आपल्या लिखाणात शंकराचार्यांच्या केवलाद्वैत मताचीच थोडी फेरमांडणी करून त्यांनी जी मांडणी केली, ती आधुनिक काळाला साजेल अशी केली. शिवाय त्यांनी नित्य परिवर्तनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाश्वत मूल्यांचे पुनर्संस्करणही केले. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल, असे त्यांनी दाखवून दिले. सगुण ब्रह्म अथवा ईश्वर हा निर्गुण परब्रह्माचा खालच्या पातळीवरील आविष्कार आहे, असे न म्हणता भक्ताशी असलेल्या त्याच्या संबंधाच्या अपेक्षेने ग्रहण केल्यावर जो ईश्वर म्हणून भासतो त्याचेच संबंध–निरपेक्ष रीतीने ग्रहण केल्यावर तो परब्रह्म म्हणून उरतो, असे त्यांचे प्रतिपादन आहे. राधाकृष्णन् यांनी मायावाद स्वीकारला; जग ईश्वरावर अवलंबून आहे, स्वप्रतिष्ठित नाही आणि अशाश्वत आहे, असा त्यांनी त्याचा अर्थ केला. हिंदू धर्मास काही अर्वाचीन रूप मिळाले आहे, असे मानल्यास त्याचे श्रेय स्वामी विवेकानंद, डॉ. भगवानदास, म. गांधी इत्यादींच्या प्रमाणे राधाकृष्णन् यांनाही आहे.

सर्व धर्मांतील मूलभूत सत्य एकच आहे आणि ही वृत्ती हिंदू धर्माने विशेषेकरून जोपासली आहे, असे राधाकृष्णन् यांनी सांगितले. कोणत्याही धर्माच्या शिकवणुकी या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासविषय आहेत; ईश्वरविद्येच्या (Theology) नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. याचे कारण ज्ञानमीमांसेत प्रत्यक्ष व अनुमान यांच्याप्रमाणेच अंतःप्रज्ञा (Intuition) हेही सत्यज्ञान मिळविण्याचे एक साधन आहे, असे त्यांनी मानले. धर्मग्रंथांचे प्रामाण्य त्यांत ग्रथित असलेल्या ऋषींच्या गूढानुभूतींवर आहे, त्या ग्रंथांच्या ईश्वरकर्तृत्वावर नाही, असे त्यांचे मत होते. या दृष्टिकोनातून धर्माची चिकित्सा आणि प्रस्थापित धर्ममतांचा समन्वयही करता येतो.

गौतम बुद्धांनी अनात्मवाद सांगितला; पण राधाकृष्णन् यांच्या मते हा अनात्मवाद आणि वेदान्ताचा आत्मवाद अथवा ब्रह्मवाद यांच्यात विरोध नाही. बुद्धांनी नाकारला तो ‘मी’ आणि ‘माझे’ अशी वृत्ती निर्माण करणारा जीवात्मा होय. जीवात्मा हा अहंकाराचा परिणाम होय. अहंकाराचा लोप झाला म्हणजे निर्वाणरूपी परम शांतीचा अनुभव येतो. वेदान्तही अहंकाराचे विसर्जन करावयास सांगतो. अहंकार नष्ट झाल्यावर जो शुद्ध चैतन्याचा अनुभव येतो, त्यास वेदान्तात आत्मानुभव म्हणतात.

खरे म्हटले तर धर्म एकच असतो, संप्रदाय अनेक असतात. याचा अर्थ असा नव्हे की, कोणताही संप्रदाय व त्याच्या विशिष्ट परंपरा नाहीशा केल्या पाहिजेत. इतकेच केले पाहिजे की, संप्रदायांनी आपापली आग्रही वृत्ती सोडली पाहिजे. धर्म ही माणसा-माणसाला जोड़णारी शक्ती आहे, त्यांच्यात फूट पाड़णारी नाही हे ओळखले पाहिजे, असे राधाकृष्णन् यांचे मत होते.

राधाकृष्णन् यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. द रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी या १९२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांच्या मनाचा कल रामानुजांच्या विशिष्टाद्वैतवादाकडे–म्हणजे सगुणोपासनेकडे‒झुकलेला दिसतो. पुढे १९२३ (पहिला भाग) व १९२७ (दुसरा भाग) साली प्रसिद्ध झालेल्या इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात शंकराचार्यांचे केवलाद्वैत मत त्यांनी शिरोधार्य मानले. १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या ॲन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक समग्र तत्त्वज्ञान साररूपाने आले आहे. या ग्रंथात असे म्हटले आहे की, देहपातापूर्वीही व्यक्तीला ईश्वराशी सायुज्यता मिळू शकेल; पण अंतिम मोक्ष अथवा ब्रह्म-निर्वाण हे सर्व जीव मुक्त झाल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून सायुज्य मुक्ती प्राप्त झालेले महामानव हे इतर जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहतात. हे मत महायान पंथातील बौद्ध मतासारखे (बोधिसत्व  संकल्पनेसारखे) आहे. त्यांनी प्रिन्सिपल उपनिषद्स (१९५३), ब्रह्मसूत्रे (द ब्रह्मसूत्राज–१९६०) व भगवद्‌गीता (द भगवद्‌गीता–१९४८) या वेदान्ताच्या प्रस्थानत्रयीवर भाष्यस्वरूप ग्रंथ लिहिले. प्राचीन काळी प्रस्थानत्रयीवरच्या अधिकारी व्यक्तीला ‘आचार्य’ म्हणत. या अर्थाने त्यांना ‘आचार्य’ ही उपाधी लावता येईल. यांशिवाय द एथिक्स ऑफ वेदान्त अँड इट्‌स मेटॉफिझिकल प्रीसपोझिशन्स (१९०८), द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर (१९१८), द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ (१९२६), ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन (१९३३), ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट (१९३९), द धम्मपद (१९५०), द रिकव्हरी ऑफ फेथ (१९५५) इ. त्यांची काही महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय ग्रंथरचना होय.

धर्म व तत्त्वज्ञान यांप्रमाणे शिक्षण हाही राधाकृष्णन् यांच्या परिशीलनाचा विषय होता. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान झाले पाहिजे आणि आपल्या विचाराची दिशा ठरविता आली पाहिजे, असे त्यांचे मत होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी व ह्या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) हा ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जाते.

आज ज्याला विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान म्हणतात त्याच्याशी आपल्या विचारांचा सांधा जमवून घेण्याचा राधाकृष्णन् यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्याचप्रमाणे आजच्या अस्तित्ववादाविषयीही त्यांनी फारसा आदर दाखविला नाही. त्यांच्या मते उपनिषदांतील तत्त्वज्ञान हेच खरे अस्तित्ववादी आहे; कारण त्याची सुरुवात आत्म्याच्या अस्तित्वापासून होते. जडवादात अंतःप्रज्ञेला अथवा गूढानुभूतीला स्थान नसल्यामुळे आध्यात्मिक मर्मदृष्टीला तो पारखा होतो.

राधाकृष्णन् यांचे तत्त्वज्ञान : तर्काने विशदीकरण, समर्थन, विश्लेषण, खंडन करणे शक्य होते. तर्काने अन्वयार्थ लावला जातो; प्रतीकात्म व सांकेतिक भाषेत अभिव्यक्ती केली जाते. सूत्रमय रीत्या विशिष्ट विचार मांडण्यासाठी तर्काची आवश्यकता असते; पण तर्कशक्ती कार्यरत होण्यासाठी अंत:ज्ञान आवश्यक असते. विज्ञान, कला, काव्य, नीतिशास्त्र विकसित करावयाचे असेल, तर तर्काबरोबरच अंतर्ज्ञानाची, तर्कशक्तीला अंत:प्रज्ञेची जोड मिळणे आवश्यक असते, असे राधाकृष्णन् यांचे मत होते.

राधाकृष्णन् यांचे तत्त्वज्ञान केवळ तर्कप्रधान नसून अंत:ज्ञानाची मातब्बरी जाणणारे, विश्लेषणापेक्षा संश्लेषणावर भर देणारे, तसेच वास्तवाचे साकल्याने भान करून देणारे आहे. मुळात ते श्रद्धाप्रवण आहे. जीवनाला प्रयोजन असते; जे जे घडते, ते हेतुगर्भ असते; विश्वातील प्रत्येक घटकाला कार्य असते. सुनियोजित रीतीने व्यवहार सुरू असतात, हे जाणून प्रत्येक घटक आपापले योगदान देत असतो व युगानुयुगे हे रहाटघाडगे अव्याहत चालू राहते. या रहाटगाडग्यापलीकडील चिद्‌शक्ती समजून त्याप्रमाणे आचरण ज्याच्याकडून होते तो ज्ञानयोगी, भगवत्कृपेला आधार मानून चित्शक्ती सगुण रूपात जाणतो तो भक्तिमार्गी व आपल्या विहित कर्मांनी भगवंताची पूजा निरपेक्ष, निरहंकारी वृत्तीने करतो तो कर्मयोगी, अशी फोड राधाकृष्णन् यांनी केली आहे. पाश्चात्त्यांना सहजपणे समजेल, अशी वेदान्ती तत्त्वज्ञानाची त्यांनी केलेली इंग्रजीतून मांडणी म्हणजे पौर्वात्य-पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाला जोडणारी अत्यंत महत्त्वाची अशी मौलिक कामगिरी होय. मात्र त्यांना अभिप्रेत असणारा यांमधील भेद टीकाकारांना मान्य नाही.

प्राचीन व अर्वाचीन काळीही पाश्चिमात्य व पौर्वात्य देशांत पुनर्जन्मावर विश्वास ठेवला गेला. अनेक जन्म घेऊन आपण परिपूर्णता मिळविण्याची पराकाष्ठा करतो. ह्या जन्मी कमावलेल्या पुण्याची शिदोरी पुढील जन्मी उपयुक्त ठरते. कणाकणाने पुण्य संपादित होते. पुण्यकर्मे करत गेल्याने अंत:काळी हा देह नाहीसा होतो व पूर्वसंचितानुसार पुढील जन्म मिळतो. मग सखोल, समृद्ध नि साकल्यपूर्ण ज्ञान उत्तरोत्तर शक्य होते. अशा रीतीने पुनर्जन्म म्हणजे निरंतर पुनरावर्तनाची निरर्थक प्रक्रिया नव्हे; तर अर्थगर्भ, हेतुपूर्ण अशी अधिक प्रगल्भ, सुजाण जीवनासाठीची वाटचाल होय.

स्वर्ग व नरक ही वास्तव्याची किंवा मुक्कामाची ठिकाणे नसून आत्म्याच्या निरनिराळ्या अवस्था होत. परिपूर्णता स्वास्थ्य संपादित केलेल्या आत्म्याच्या स्थितीला स्वर्ग (सद्‌गती) म्हणतात; तर दु:ख, अनारोग्य, अस्वस्थता असलेल्या स्थितीला नरक (दुर्गती) म्हणतात. जो तो जीव त्या सद्‌गती किंवा दुर्गतीनुसार विशिष्ट वास्तविक कुटुंबात योग्य वेळी जन्म घेतो आणि मोक्ष मिळेपर्यंत पुन:पुन्हा देह धारण करत राहतो. म्हणजे नैतिक दृष्टीने प्रत्येक जीव एकेकटा असतो; पण आध्यात्मिक दृष्टीने सर्व जीव, जग व ईश्वर एकच होत. सर्वमुक्ती सिद्धान्ताद्वारे राधाकृष्णन् हे त्याच अद्वैताचा पुनरुच्चार करतात. येथे सर्वांची मुक्ती अभिप्रेत आहे. मुक्ती मिळविण्याची क्षमता सर्वांमध्ये असते, अशी ग्वाही देऊन सर्वांची आध्यात्मिक समता त्यांनी अधोरेखित केली आहे.

राधाकृष्णन् यांच्या धर्म, तत्त्वज्ञान व शिक्षण या क्षेत्रांतील मौलिक कामगिरीमुळे त्यांना अनेक मानसन्मान देऊन गौरविण्यात आले. अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे (१९२७) आणि अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (१९३०) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमानही त्यांना लाभला. १९५४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविले. १९५२ ते १९६७ पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले. निवृत्तिकालात ते चेन्नई येथे जाऊन राहिले. तेथेच थोड्या विमनस्क अवस्थेत त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Joad, C. E. M. Counter Attack From the East :  The Philosophy of Sarvepalli Radhakrishnan, London, 1933.
  • McDermott, Robert A. Ed. Radhakrisnan : Selected Writings on Philosophy, Religion and Culture, New York, 1970.
  • Schilp, P. A. Ed. Philosophy of Sarvepalli Radhakrishnan, New York, 1952.
  • Sinha, R. C. Concepts of Reason and Intuition : With Special Reference to Sri Aurobindo, K. C. Bhattacharyya and S. Radhakrishnan, Delhi, 2013.
  • www.iep.utm.edu/radhakri

समीक्षक – शर्मिला वीरकर