पंडा या प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील आयल्युरिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव आयल्युरस फुलगेन्स आहे. त्याला तांबडा पंडक किंवा पँडा असेही म्हणतात. पंडा हा वृक्षवासी असून आयल्युरस प्रजातीतील अस्तित्वात असलेली ही एकमेव जाती आहे. प्रारंभी या प्राण्याचा समावेश रॅकून आणि अस्वलांच्या कुलात केला जात असे. मात्र, आता त्याचा समावेश आयल्युरिडी या स्वतंत्र कुलात केला जातो. तो भारत, चीन, नेपाळ व तिबेट येथे आढळतो. भारतात तो हिमाचल प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश व मेघालय या राज्यांत आढळतो.
पंडाच्या शरीराची लांबी सु. ६० सेंमी असून वजन ३–७ किग्रॅ. असते. शेपूट सु. ५९ सेंमी.पर्यंत लांब असते. तो आकाराने मांजरापेक्षा मोठा असून दूरवरून मांजरासारखा दिसतो. पाठीवरील भागात तांबड्या रंगाची फर असते तर पोटावरील भागात काळ्या रंगाची फर असते. चेहऱ्याचा रंग फिकट असून त्यावर अधूनमधून पांढऱ्या छटा दिसतात.प्रत्येक पंडाच्या चेहऱ्यावरील पांढऱ्या छटा वेगवेगळ्या असतात. डोके गोल असून त्यावर मध्यम लांबीचे कान असतात. नाक आणि डोळे काळे असतात. त्याच्या लांब व केसाळ शेपटीवर पिवळसर सोनेरी रंगाच्या सहा वलये असतात. पाय आखूड काळे असून पंजांच्या तळव्यावर दाट फर असते. या फरमुळे त्याचे थंडीपासून संरक्षण होते. पायावर मजबूत, तीक्ष्ण व वळलेल्या नख्या असल्यामुळे त्याला बांबूसारख्या निमुळत्या होत गेलेल्या वनस्पतीची पाने, फांद्या आणि फळे खाता येतात.
पंडा त्याच्या ठरलेल्या अधिवासात राहतो. मिलनाचा हंगाम वगळता हा प्राणी एकटा राहतो. तो संधिप्रकाशात आणि रात्री क्रियाशील असतो.दिवसा तो अंगाचे वेटोळे करून व शेपूट डोक्याभोवती गुंडाळून झाडाच्या ढोलीत किंवा फांदीवर झोपतो आणि अंधार पडू लागल्यावर अन्न शोधायला बाहेर पडतो. वनस्पतींची मुळे, बांबूंचे कोंब, गवत, फळे आणि धान्य हे त्याचे प्रमुख अन्न आहे. काही वेळा तो अंडी, कीटक, लहान प्राणी व सुरवंटही खातो. धोक्याची जाणीव झाल्यास तो जवळच्या उंच झाडावर किंवा खडकावर चढून बसतो. मात्र, हे शक्य न झाल्यास तो मागच्या पायांवर, माणसासारखा उभा राहून आहे त्याहून मोठा भासविण्याचा प्रयत्न करतो.
अठरा महिन्यानंतर पंडा प्रौढ होतो. जानेवारी ते मार्च हा त्यांचा प्रजननकाल असून नर-मादी फक्त समागमासाठी एकत्र येतात. पिलांना जन्म देण्याआधी काही दिवस मादी गवत व पाने एकत्र करून झाडांच्या पोकळीत किंवा खडकांच्या कपारीत घर तयार करते. गर्भावधीकाल ११२–१५८ दिवसांचा असतो. जून-जुलै महिन्यात मादी १–४ पिलांना जन्म देते. पिलांचे संगोपन मादीच करते. नंतर येणाऱ्या प्रजननकालापर्यंत पिले मादीसोबत राहतात. पंडाचा आयु:काल ८–१० वर्षे असतो.
चीनमधील उत्तुंग पर्वतरांगांतील सेचवान, सिक्यांग, कान्सू इत्यादी प्रांतांत आढळणाऱ्या अस्वलांच्या एका जातीला जायंट पंडा ही संज्ञा वापरतात. ती अस्वलांच्या अर्सिडी कुलातील एक जाती आहे. तिचे शास्त्रीय नाव आयल्युरोपोडा मेलॅनोल्यूका आहे.