कोथिंबीर ही एपियसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कोरिअँड्रम सॅटायव्हम असे आहे. मूलत: ही दक्षिण यूरोप व आशिया मायनरमधील असून यूरोपात फार प्राचीन काळापासून लागवडीत आहे. भारतात ही वनस्पती सर्वत्र पिकविली जात असून स्वयंपाकात हिचा वापर अधिक होतो. या वनस्पतीच्या पाल्याला कोथिंबीर व फळांना धणे म्हणतात.
या वर्षायू वनस्पतीची उंची ४०-५० सेंमी. असून पाने दोन प्रकारची असतात. खालची पाने लांब देठाची, विषमदली व अपूर्ण पिच्छाकृती (पिसासारखी) असून त्यांचे तळ खोडाला वेढणारे असते, तर वरची पाने आखूड देठाची, अपूर्ण पिच्छाकृती व खंडित असतात. खोड पोकळ असते. फुले लहान, पांढरी किंवा गुलाबी-जांभळी असून संयुक्त चामरकल्प (छत्रीसारख्या) फुलोर्यात येतात. फळे पिवळट, गोलाकार व शिरा असलेली असून ती दोन सारख्या भागांत विभागतात. प्रत्येक भागात एकेक बी असते.
कोथिंबिरीचे खोड, पाने व फळे यांना विशिष्ट उग्र वास असतो. त्यात कोरिअँड्रॉल हे बाष्पनशील तेल असते. स्वयंपाकात स्वाद आणण्यासाठी कोथिंबिरीचा उपयोग केला जातो. मिठाई व मद्य यांतही त्याचकरिता धणे वापरतात.
कोथिंबिरीची पाने चवीला तिखट व स्तंभक असून उचकी, दाह, कावीळ इत्यादींवर गुणकारी असतात, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. फळे मूत्रल, वायुनाशी, उत्तेजक, पौष्टिक व दीपक (भूक वाढवणारे) आहेत. शूल(पोटातील वेदना) व रक्ती मूळव्याध यांवर धण्यांचा काढा देतात. अधिहर्षतेमुळे (अॅलर्जीमुळे) होणार्या दाहावर पानांचा रस आणि लेप गुणकारी असतो.