पक्षिवर्गातील सुलिफॉर्मिस किंवा पेलिकॅनिफॉर्मिस (Suliformes / Pelecaniformes) गणाच्या फॅलॅक्रोकोरॅसिडी (Phalacrocoracidae) कुलातील पक्षी. पाणथळ जागेत अधिवास असल्याने त्यास पाणकावळा असे म्हणतात. फॅलॅक्रोकोरॅसिडी कुलामध्ये सु. ४० जातींचा समावेश होतो. यामधील फॅलॅक्रोकोरॅक्स अरिस्टोटेलिस (Phalacrocorax aristotelis) ही जाती करढोक (Shag) म्हणून ओळखली जाते. ती दिसायला पाणकावळ्यासारखी परंतु, त्याच्यापेक्षा आकाराने लहान असते. इंग्रजीमध्ये तिला यूरोपियन कॉरमोरंट किंवा कॉमन कॉरमोरंट म्हणतात.
पाणकावळ्याचे शरीररचनेनुसार पुढील तीन प्रकार पडतात : (१) लहान पाणकावळा (little cormorant), (२) भारतीय पाणकावळा (Indian cormorant) व (३) मोठा पाणकावळा (Great cormorant).
(१) लहान पाणकावळा (Little cormorant) : याचे शास्त्रीय नाव फॅलॅक्रोकोरॅक्स नायजर (Phalacrocorax niger) असून तो भारत, श्रीलंका, बांगला देश, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया व इंडोनेशियातील काही भागांत आढळतो. हिमालय व इतर पर्वतराजी वगळता तो भारतात सर्वत्र आढळतो. नदी, खाडी, तलाव, कालवे, दलदली तसेच क्वचित समुद्राजवळील झाडींमध्ये ते थव्याने आढळतात. त्याची लांबी ५१–५६ सेंमी. व वजन ३६०–५२५ ग्रॅ. असून पंखांचा विस्तार ९० सेंमी. असतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. डोके चपटे; चोच लहान, तपकिरी रंगाची असून टोकावर तीक्ष्ण आकडी असते. पाय आखूड, बोटे चपटी व पातळ त्वचेने जोडलेली असतात. इतर दोन जातींपेक्षा शेपूट लांब असते. आखूड व जाड मान आणि लांब शेपूट यांमुळे त्याला पंखांची हालचाल वेगाने करता येते. प्रजननक्षम पक्ष्यामध्ये संपूर्ण शरीराचा रंग काळा असतो. यावेळी त्याच्या हनुवटी व गळ्यावरील पांढरा ठिपका नाहीसा होऊन तो संपूर्ण काळा चकचकीत दिसू लागतो; तर शरीरावरील तपकिरी पिसेही काळ्या रंगाची होतात.
(२) भारतीय पाणकावळा (Indian cormorant) : याचे शास्त्रीय नाव फॅलॅक्रोकोरॅक्स फ्युसीकोलीस (Phalacrocorax fuscicollis) असे असून त्याचा आढळ भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश, थायलंड, व्हिएतनाम व कंबोडियामध्ये आहे. ही जाती आकाराने लहान पाणकावळ्यापेक्षा मोठी, तर मोठ्या पाणकावळ्यापेक्षा लहान असते. याची लांबी ६० सेंमी. व वजन ६००–८०० ग्रॅ. असते. चोच लांब असून आकडीसारखी असते. मान बारीक, शरीर सडपातळ व शेपूट लांब असते. शरीराचा रंग तपकिरी आणि पिसे टोकास काळी असतात. प्रजननक्षम पक्ष्याचा रंग तकतकीत काळा असून डोळे हिरवट निळसर आणि कानाजवळ लहान पांढऱ्या पिसांचा झुपका असतो.
(३) मोठा पाणकावळा (Great cormorant) : मोठ्या पाणकावळ्याचे शास्त्रीय नाव फॅलॅक्रोकोरॅक्स कार्बो (Phalacrocorax carbo) असे आहे. त्याच्या फॅलॅक्रोकोरॅक्स कार्बो कार्बो (Phalacrocorax carbo carbo), फॅ. का. सिनेन्सीस (P. c. sinensis), फॅ. का. हानेडी (P. c. hanedae), फॅ. का. मारोकॅनॅस (P. c. maroccanus), फॅ. का. ल्युसिडस (P.c. lucidus), फॅ. का. नोव्हिहॉलंडिई (P.c. novaehollandiae) या सहा उपजाती आहेत. मोठ्या पाणकावळ्याचा आढळ भारत, आफ्रिका, यूरोप, उत्तर अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे आहे. याची लांबी ८०–१०० सेंमी. असून वजन १८००–२८०० ग्रॅ. असते. मादी नरापेक्षा किंचित लहान असते. डोके मोठे व चोच लांब, जाड व आकडीसारखी असते. पंखांचा विस्तार १३०–१६० सेंमी. असतो. शरीराचा रंग काळा असून प्रजनन काळात गळा व मांडीभोवती पांढरा पट्टा, डोक्यावर पांढऱ्या रंगाचे केस, तर चोचीखाली लाल रंगाचा ठिपका असतो. जाड मान, आखूड शेपूट व वजनदार शरीर यांमुळे याच्या पंखांची हालचाल अतिशय मंद गतीने होते.
पाण्यात किंवा पाण्याच्या जवळपास असणाऱ्या झाडांवर किंवा झुडपांवर पाणकावळे घरटी बांधतात. त्यांची एकाच झाडावर अनेक घरटी असतात. ही घरटी गवत, सागरी पक्ष्यांच्या विष्ठेपासून तयार झालेले खत (Guano) व काटक्या यांपासून तयार केलेली असतात. यांचा विणीचा हंगाम प्रदेशपरत्वे बदलतो. तो उत्तर भारतात जुलै–सप्टेंबर, दक्षिण भारतात नोव्हेंबर–फेब्रुवारी आणि समशितोष्ण प्रदेशांत एप्रिल–जून असा असतो. मादी निळसर हिरव्या रंगांची ३–५ अंडी घालते. अंड्यांचे कवच कठीण असून त्यांवर पांढरट भुकटीचा लेप असतो. अंडी उबविल्यावर ३–५ आठवड्यांनी त्यातून पिले बाहेर येतात. पिलू सु. ३ वर्षांनी प्रजननक्षम होते.
पाणकावळ्याचे मुख्य खाद्य मासे असून ते कवचधारी, मृदुकाय व उभयचर प्राणी देखील खातात. ते १० मी. खोलीपर्यंत पाण्यात पोहू शकतात, तर ताशी ५४ किमी. अंतर उडू शकतात. पाण्यात पोहणे व सूर मारून मासा पकडणे यांत ते अतिशय तरबेज असतात. तसेच ते अतिशय खादाड असून अविरतपणे मासे खात असतात. यांमुळे चीन व जपानमध्ये त्यांचा उपयोग मासे पकडण्यासाठी केला जातो. तसेच त्यांच्या विष्ठेपासून खत तयार केले जाते. पंखांतील तैलग्रंथीच्या अभावामुळे थोड्या थोड्या वेळाने भिजलेले पंख वाळवण्यासाठी त्यांना पाण्याबाहेर यावे लागते. त्यामुळे ते बऱ्याचदा नदीकाठच्या खडकांवर तसेच झाडांवर पंख पसरून बसलेले दिसतात.
पाणकावळ्याचे आयुर्मान सु. २४ वर्षे आहे.
पहा : कावळा; डोमकावळा.
संदर्भ :
समीक्षक – कांचन एरंडे