प्रोटिस्टा सृष्टीच्या आदिजीव संघाच्या सिलिएटा वर्गातील पॅरामिशियम ही सूक्ष्म व एकपेशीय प्रजाती आहे. या प्रजातीच्या जगभर ८–९ जाती आहेत. सामान्यपणे आढळणाऱ्या पॅरामिशियमाची शास्त्रीय नावे पॅरामिशियम कॉडेटम व पॅरामिशियम ऑरेलिया ही आहेत. तलाव आणि विशेषेकरून डबक्यातील गोडया पाण्यात तसेच कुजणारे गवत, पालापाचोळा असलेल्या पाण्यात हे हमखास आढळतात. विशेष म्हणजे या प्राण्याची हालचाल, पचन व प्रजनन अशा जीवनक्रिया सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकतात.

पॅरामिशियम

पॅरामिशियम आकाराने चपलेसारखा असून तो ०.२५ मिमी. वाढू शकतो. याच्या पेशीपटलावर सूक्ष्म व केसांसारख्या पक्ष्माभिका असतात. या पक्ष्माभिकांच्या साहाय्याने पॅरामिशियम हालचाल करतो. पॅरामिशियमच्या अधर बाजूस मुखखाच असते. खाचेच्या तळाशी पेशीमुख असते. पेशीमुखापासून पेशीग्रासनी निघते. पॅरामिशियमाचे अन्न म्हणजे जीवाणू व सेंद्रिय अन्नकण. हे अन्न पक्ष्माभिकांच्या हालचालीमुळे मुखखाचेपर्यंत येते. नंतर ते पेशीग्रासनीत येते. त्या अन्नाची पेशीग्रासनीच्या तळाशी अन्नरिक्तिका होते. अन्नरिक्तिकेत विकरांच्या साहाय्याने अन्नाचे पचन होते. न पचलेले अन्न गुदछिद्रावाटे बाहेर टाकले जाते.

पेलिकल (तनुत्वचा) हे पॅरामिशियमाचे बाह्य आवरण पारदर्शी व घट्ट पेशीद्रव्याचे असून त्याच्या आत प्रवाही पेशीद्रव्य असते. पेशीद्रव्यात कणिका, अन्नरिक्तिका आणि वेगवेगळ्या आकारांचे स्फटिक असतात. याच्या दोन्ही टोकांना पृष्ठभागावर संकोची रिक्तिका असतात. सभोवतालच्या क्षारांच्या प्रमाणानुसार या संकोची रिक्तिका पाणी आत किंवा बाहेर घेऊन पेशीतील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करतात. याखेरीज त्यांना उत्सर्जी संरचना मानतात कारण त्यांच्याद्वारे बाहेर टाकलेल्या पाण्यात टाकाऊ पदार्थ असतात.

पॅरामिशियमामध्ये दोन प्रकारची केंद्रके असतात: बृहत्-केंद्रक आणि सूक्ष्मकेंद्रक. बृहत्-केंद्रकाशिवाय हा प्राणी जगू शकत नाही आणि सूक्ष्मकेंद्रकाशिवाय याच्यात प्रजनन घडून येत नाही. संयुग्मन होण्यासाठी सूक्ष्मकेंद्रक आवश्यक असते. चयापचयाच्या सर्व क्रियांचे केंद्र बृहत्-केंद्रक असते.

पॅरामिशियमामध्ये अलैंगिक तसेच लैंगिक प्रजनन घडून येते.  बहुधा या प्राण्यात अलैंगिक प्रजनन द्विभाजन पद्धतीने घडून येताना दिसते. या पद्धतीत पॅरामिशियम दोन भागांत विभागला जातो आणि दोन नवीन पेशी तयार होतात. या पेशींपासून दोन स्वतंत्र पॅरामिशियम तयार होतात. लैंगिक प्रकारात म्हणजे संयुग्मनात दोन भिन्न जीव एकत्र येतात आणि सूक्ष्मकेंद्रकातील घटकांची देवाणघेवाण होऊन चार लहान पॅरामिशियम तयार होतात. संयुग्मनानंतर पॅरामिशियमाला पुन्हा यौवनावस्था प्राप्त झाली नाही तर ते वृद्ध होतात आणि मरतात.