पाऊस आणि हिमक्षेत्र यांतून उपलब्ध झालेले, जमिनीत न मुरलेले किंवा बाष्पीभवनाने वातावरणात न मिसळलेले असे भूपृष्ठावर उपलब्ध असलेले प्रवाही किंवा संचित पाणी म्हणजे पृष्ठीय जल. प्रामुख्याने पाऊस व हिमवृष्टी यांपासून पृष्ठीय जल उपलब्ध होते. अध:पृष्ठीय आणि पृष्ठीय जलांचा अभ्यास जलविज्ञानात केला जातो, तर पृष्ठीय जलाचा उगम आणि त्याच्या क्रिया-प्रक्रिया यांचा अभ्यास जलालेखनात केला जातो. पावसाचे पाणी भूपृष्ठावरील प्रवाहांतून व नद्यांमधून वाहत असते. हिवाळ्यात पर्वतीय व उच्चभूमी प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर हिमसंचय झालेला असतो. उन्हाळ्यात हिम वितळून त्याचे पाणी भूपृष्ठावरून वाहू लागते. कोणत्याही प्रदेशातील पृष्ठीय जलाची उपलब्धता ही त्या प्रदेशातील पर्जन्यमान, भू-उतार, भूकवचातील खडकांचे प्रकार, जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण, जलोत्सारण क्षेत्राचा विस्तार, मृदेचा प्रकार, भूमिवापर, वनाच्छादन, बाष्पीभवनाचा वेग इत्यादी घटकांवर अवलंबून असते.

यवतेश्वर डोंगरावरील पृष्ठीय जल : (कास तलाव, सातारा जिल्हा)

भूपृष्ठभागावरून वाहणारे पावसाळी प्रवाह, नेहमी वाहणारे प्रवाह, उन्हाळी प्रवाह, नैसर्गिक व कृत्रिम जलाशय, आर्द्रभूमी यांतील पाण्याचा समावेश पृष्ठीय जलामध्ये होतो. सागराचे पाणी हे पृष्ठीय जल असले, तरी त्यातील पाणी खारट असते.

पृष्ठीय जलाचा उपयोग पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा, जलसिंचन, जलविद्युत्‌ निर्मिती, कारखाने, खाणकाम व्यवसाय, प्राणी, परिसंस्थांचा विकास यांसाठी होत असतो. त्याचप्रमाणे अनेक पृष्ठीय जलसाठे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. समाजाला अध:पृष्ठीय जल आणि पृष्ठीय जल या दोन प्रमुख स्रोतांद्वारे गोडे पाणी उपलब्ध होते. वैयक्तिक कुटुंबांसाठी किंवा छोट्या वस्त्यांसाठी अध:पृष्ठीय जल हा पाण्याचा मुख्य स्रोत ठरतो; तर मोठ्या शहरांना नद्या, नैसर्गिक सरोवरे व कृत्रिम जलाशये या पृष्ठीय जलस्रोतांद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

कोल्हापूर येथील पृष्ठीय जल : (रंकाळा तलाव)

पृष्ठीय जलात अनेक सूक्ष्मजीव असतात. नागरीकरणाच्या विस्ताराबरोबर समाज, शेती क्षेत्राकडून औद्योगिक क्षेत्राकडे वळला आहे. शेतीच्या आधुनिकीकरणामुळे विविध कीटकनाशके व रासायनिक खते यांचा वापर वाढला आहे. कीटकनाशके, खते, ग्रामीण व नागरी वस्तीतील सांडपाणी-मैलापाणी, घरगुती कचरा, औद्योगिक अपशिष्टे इत्यादींमुळे पृष्ठीय जलाचे प्रदूषण वाढते. असे प्रदूषित पृष्ठीय जल सजीवसृष्टीला अपायकारक ठरत असून परिसंस्था विसकळीत होत आहेत. तसेच वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची मागणी वाढत आहे. त्या दृष्टीने पृष्ठीय जलव्यवस्था आवश्यक ठरत आहे.

पृथ्वीवरील जलचक्रात बदल होत आहेत. जगातील स्वच्छ पृष्ठीय जलाची मागणी उपलब्धतेपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे पृष्ठीय जलाचे योग्य व प्रभावी व्यवस्थापन करणे ही एक निकड बनली आहे. त्या दृष्टीने पृष्ठीय जलाचे प्रदूषण नियंत्रित करणे, पूरनियंत्रण करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, उपलब्ध पाण्याचे शुद्धीकरण आणि वितरण अशा उपाययोजना करणे आवश्यक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा