नॉर्दहॉस, विल्यम डी. (Nordhaus, William D.) : (१३ मे १९४१). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ, येल विद्यापीठातील स्टर्लिंग प्राध्यापक आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराचे सहमानकरी. जागतिक वातावरणातील बदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर म्हणजेच आर्थिक विकासावर कसा परिणाम होतो, याबाबत केलेल्या संशोधनाबद्दल अर्थतज्ज्ञ पॉल मिशेल रोमर (Paul Michael Romer) यांच्याबरोबरीने नॉर्दहॉस यांना २०१८ सालचा नोबेल स्मृती पुरस्कार देण्यात आला.
नॉर्दहॉस यांचा जन्म न्यू मेक्सिको राज्यातील अल्बूकर्क येथे व्हर्जिनिया व रॉबर्ट जे. नॉर्दहॉस या दांपत्यापोटी झाला. ते जर्मन ज्यू कुटुंबातील असून त्यांचे वडील सँडिया पीक ट्रॉमवे या संस्थेचे सहसंस्थापक होते त्यांचे शालेय शिक्षण ॲन्डोव्हर येथील फिलिप्स अकॅडमी येथे झाले. त्यानंतर त्यांनी येल विद्यापीठातील मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून १९६३ मध्ये बी. ए.; १९६७ मध्ये अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट आणि १९७३ मध्ये एम. ए या पदव्या संपादन केल्या. १९७०-७१ या काळात त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील क्लेर हॉल येथे अधिछात्र (Fellow) म्हणून काम केले. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या कारकीर्दित १९७७ – १९७९ या काळात ते सल्लागार मंडळाचे सदस्य होते. तसेच २०१४-१५ या काळात त्यांनी बोस्टन फेडरल रिसर्च या संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.
नॉर्दहॉस यांनी हवामानातील बदलानुसार अर्थकारणावर कसे परिणाम संभवतात, विविध घटकांवर त्यांचा कसा आर्थिक परिणाम होतो यांबाबतचे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांचे संशोधन दीर्घ काळासाठी स्थूल अर्थशास्त्राबाबतचे असून वातावरणातील बदलांचा त्यावर काय परिणाम होतो, यासंदर्भातील विवेचन त्यात करण्यात आले आहे. हवामान अर्थशास्त्र प्रतिमान (Model) संदर्भातील त्यांचे संशोधन अग्रभागी असून त्यामुळे जागतिक पातळीवर अनेक देशांना आपले भविष्यकालीन हवामान धोरण ठरविण्याबाबत भक्कम असा शास्त्रीय आधार लाभला आहे. विशेषत: विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून औद्योगिक विकास साधणाऱ्या देशांना त्यांच्या संशोधनकार्यामुळे भक्कम अशी बैठक उपलब्ध झालेली आहे. कार्बन उत्सर्जनावर तसेच पर्यावरणाची हानी पोचविणाऱ्यांवर प्रदूषण कर (Pollution Tax) आकारणी करून प्रतिकूल हवामान बदलाचा प्रतिकार करावा यासाठी राज्यकर्त्यांची मनधरणी करण्यात आपल्या आयुष्यातील सुमारे चार दशके त्यांनी खर्ची घातली. उच्च शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सहकारी मित्रांना हवामान बदलाचे अर्थकारणातील महत्त्व पटवून देण्यात नॉर्दहॉस यशस्वी झाले आहेत.
अमेरिकन सरकारने हवामान बदलातील परिणामाबद्दल गांभीर्य न दाखविल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली असून आपण याबाबत फारसे आशावादी नसल्याची खंत नोबेल पारितोषिक मिळताच त्यांनी व्यक्त केली आहे. सर्वच विकसनशील देशांनी हवामान बदलाची समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. जे पर्यावरणाला हानी पोचवितात, सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात त्यांच्याकडून संपूर्ण भरपाई वसूल केली पाहिजे, असा आग्रह नॉर्दहॉस यांनी केला आहे. हवामान बदलामुळे शेतीत व तत्सम व्यवसायांचे होणाऱ्या नुकसानाचे मोजमाप करण्यासाठी त्यांनी गतिशील समग्र हवामान – अर्थ प्रतिकृती (Dynamic Integrated Climate – Economic Model) विकसित केली आहे. १९९६ मध्ये लिहिलेल्या एका लेखात विकासाची पारंपरिक परिणामे मनुष्यप्राण्याच्या गुणवत्तापूर्ण जगण्याला कमी महत्त्व देत असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपले संशोधन हवामानबदलाच्या प्रश्नांसंबंधी उपयुक्त असले, तरी ते पुरेसे नसून याबाबत जागतिक पातळीवर देशांना एकत्र कसे आणावे याची संपूर्ण उकल या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना झालेली नाही, अशी कबुलीही ते देतात. चाऊलेस फौंडेशनच्या डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या चर्चासत्रात नॉर्दहॉस यांनी आपल्या अद्ययावत अशा डाईस प्रतिकृतीचा वापर करून जर राज्यकर्त्यांनी आपल्या धोरणात पुरेसे बदल केले नाहीत, तर वेगाने होणाऱ्या हवामानबदलाचे पुढील शतकात कोणते गंभीर परिणाम संभवतील याचा वेध घेतलेला आहे.
https://www.youtube.com/watch?v=Cfpm5XtzPfc
नॉर्दहॉस यांनी पुढील ग्रंथ लिहिले आहेत : इन्व्हेंशन ग्रोथ, ॲण्ड वेलफेअर (१९६९), इकॉनॉमिक ग्रोथ (१९७२), दि इफिसिएंट यूज ऑफ एनर्जी रिसोर्सेस (१९७९), मायक्रोइकॉनॉमिक्स : ए व्हर्जन ऑफ इकॉनॉमिक्स (१९८९), मायक्रोइकॉनॉमिक्स (१९९२), मॅनेजिंग दि ग्लोबल कॉमन्स : दि इकॉनॉमिक्स ऑफ क्लायमेट चेंज (१९९४), इकॉनॉमिक्स ॲण्ड पॉलिसी इशूज इन क्लायमेट चेंज (१९९८), स्टडी गाईड टू अकंपनी इकॉनॉमिक्स (१९९८), वॉर्मिंग दि वर्ड : इकॉनॉमिक मॉडेल ऑफ ग्लोबल वॉर्मिंग (२०००), इकॉनॉमिक्स विथ पॉवरवेब (२००१), स्टडी गाईड टी/ए मायक्रोइकॉनॉमिक्स (२००१), सोलमन स्टुडंट डीव्हीडी फॉर पॅकेजेस टी/ए सॅम्यूएल्सन (२००३), स्टडी गाईड ऑनलाईन कोड कार्ड टी/ए इकॉनॉमिक्स (२००४), इक्वेशन ऑफ बॅलन्स (२००८), दि क्लायमेट कॅसिनो : रिस्क, अनसर्टनरी ॲण्ड इकॉनॉमिक्स फॉर अ वॉर्मिंग वर्ल्ड (२०१३), इक्वेशन ऑफ बॅलन्स : वेईंग दि ऑप्शन्स ऑन ग्लोबल वॉर्मिंग पॉलिसीज (२०१५). याशिवाय त्यांचे अनेक शोधनिबंधपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
नोर्दहॉस यांना नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्यांच्या संशोधनाबाद्दल पुढील सन्मान लाभले : अमेरिकन स्टेट्स नॅशनल अकॅडमी सायन्सेसचे सदस्य असून अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेसचे ते छात्र आहेत. रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग सायन्सेस या संघटनेचे ते १९९९ पासून विदेशी सदस्य आहेत. अमेरिकन इकॉनॉमिक सायन्सेसचे ते सन्माननीय छात्र (२००४) आणि पुढे अध्यक्ष पदी विराजमान (२०१४-१५).
नॉर्दहॉस हे १९६७ पासून ते आजतागायत (२०१८) येल विद्यापीठातील अर्थशास्त्र, वन व पर्यावरण संशोधन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी बार्बरा या येल चाईल्ड स्टडी सेंटर या संस्थेत सामाजिक कार्यकर्त्या असून सध्या दोघेही न्यू हेवन (Connecticut) येथे वास्तव्यास आहेत.
समीक्षक – संतोष ग्या. गेडाम