कूपमान्स यालिंग चार्ल्स : (२८ ऑगस्ट १९१० – २६ फेब्रुवारी १९८५). डच-अमेरिकन गणिती, अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. दुर्मिळ अशा संसाधनांचा पर्याप्त विनियोग व आर्थिक आकडेवारीचे विश्लेषण यांसाठीच्या सांख्यिकी पद्धती विकसित केल्याबद्दल त्यांना प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ लिओनीद व्ही.  कांटोरोव्ह्यिच (Leonid V. Kantorovich) यांच्या बरोबरीने १९७५ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला.

कूपमान्स यांचा जन्म नेदरलँडमधील ग्रेव्हलँड शहरात झाला. १९२७ मध्ये त्यांनी युट्रेच्ट विद्यापीठात गणित विषयासाठी प्रवेश घेतला. १९३० मध्ये त्यांनी भौतिकशास्त्र विषयाच्या अध्ययनाला प्रारंभ केला. १९३३ मध्ये त्यांनी त्याच विद्यापीठातून गणित व भौतिकशास्त्र विषयांतील एम. ए. ही पदवी प्राप्त केली. त्याच वेळी त्यांची बँक ऑफ स्विडन पुरस्कार विजेते तसेच १९६९ सालचा अर्थशास्त्र विषयाचा नोबेल पुरस्कार विजेते यान टिनबर्जेन (Jan Tinbergen) यांच्याशी भेट झाली. टिनबर्जेन यांच्या मार्गदर्शनाखाली गणिती अर्थशास्त्र विषय शिकविण्यासाठी कूपमान्स हे ॲम्स्टरडॅम येथे गेले.

१९३६ मध्ये लायडन विद्यापीठातून पीएच. डी. प्राप्त केल्यानंतर कूपमान्स यांनी १९३६ – १९३८ या काळात नेदरलँड स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत अध्यिव्याख्याता पदावर काम केले. त्यानंतर त्यांनी १९३८ – १९४० या काळात जिनिव्हा येथे लीग ऑफ नेशन्सच्या कार्यालयात अर्थ-सचिव पद सांभाळले. अमेरिकन शिक्षण पद्धतीच्या आकर्षणामुळे त्यांनी तिकडे प्रयत्न केले व १९४०-४१ मध्ये प्रिन्सेटन विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केले. काही काळ वॉशिंग्टन डीसी येथील शासकीय आस्थापनात काम केल्यानंतर १९४८ – १९५५ या काळात त्यांनी शिकागो विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केले. त्याच दरम्यान ते विद्यापीठाच्या चाऊलेस कमिशन अर्थशास्त्र संशोधनकेंद्रात संचालक म्हणून काम पाहात होते. सदरच्या संशोधन केंद्राला विद्यापीठात विरोध झाल्याने १९५५ मध्ये ते विद्यापीठ येल विद्यापीठात हलवले गेले. त्यामुळे कूपमान्स यांनाही येल विद्यापीठात जावे लागले. तेथे त्यांनी १९६१ – १९६७ या काळात केंद्राचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यांनी १९६८-६९ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या बिहेव्हेरियल सायन्सेस विभागात वर्षभर अध्यापन केले.

कूपमान्स यांना आजही एक महत्त्वाचा आधुनिक विचारसरणीचा अर्थतज्ज्ञ म्हणून मानले जाते. दुर्मिळ अशा संसाधनांचा पर्याप्त विनियोग व आर्थिक आकडेवारीचे विश्लेषण यांसाठीच्या सांख्यिकी पद्धती विकसित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. गणित व संख्याशास्त्र या वेगळ्या विषयांचा आर्थिक समस्यांचे आकलन व्हावे, यासाठी त्यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग केला. त्याचबरोबर आर्थिक विकास व ज्या संसाधनांची पुन:निर्मिती शक्य नाही त्यांचा ऱ्हास झाल्याचे आर्थिक परिणाम कसे संभवतात यासंबंधीची शास्त्रीय मांडणी त्यांनी केली. विद्वान गणिती असल्याने आर्थिक समस्यांची उकल करण्यासाठीच्या पहिल्यांदाच वापरात आणलेल्या गणिती तसेच सांख्यिकी पद्धतीसंबंधीचे त्यांचे संशोधन दिशादर्शक मानले जाते. चाऊलेस कमिशन या संस्थेत संचालकपद सांभाळताना त्यांनी वस्तूंच्या वाहतूक समस्यासंबंधीचा अभ्यासही केला. विविध ठिकाणी रस्ते तसेच समुद्र मार्गांनी वस्तूंची वाहतूक कमीत कमी वेळेत व खर्चात कशी शक्य आहे, याबाबतच्या पद्धती रेखीय कार्यक्रमण (Linear Programming) तंत्राच्या साह्याने विकसित करून त्यांचे सप्टेंबर १९४७ मध्ये झालेल्या इंटरनॅशनल सायन्टिफिक कॉन्फरन्समध्ये सादरीकरण केले. त्यांच्या उल्लेखनीय अशा शैक्षणिक व संशोधन कार्याबद्दल अनेक विद्यापीठांनी त्याला सन्माननीय सदस्यत्व दिले.

कूपमान्स याने विपूल लेखन केले असून त्याचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे : ॲक्टिव्हिटी ॲनालिसिस ऑफ प्राडक्शन ॲण्ड अलोकेशन (१९५१), स्टडीज इन इकॉनॉमेट्रिक मेथड्स (१९५३), दि एसेज ऑन दि स्टेट ऑफ इकॉनॉमिक सायन्स (१९५७), लिनियर रिग्रेशन ॲनालिसिस ऑफ इकॉनॉमिक टाइम सिरिज (१९५७) व सायन्टिफिक पेपर्स ऑफ युलिंग सी. कूपमान्स (१९७०).

कूपमान्स यांचे अमेरिकेतील न्यू हेवन येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा