पापलेट हा पॉम्फ्रेट या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश आहे. बाजारात तीन प्रकारचे मासे पापलेट म्हणून ओळखले जातात. त्यांचा रंग रुपेरी, पांढरा आणि काळा असतो. या तीनही प्रकारच्या माशांचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या पर्सिफॉर्मिस गणात होतो. रुपेरी आणि पांढरे पापलेट स्ट्रोमॅटिइडी कुलातील, तर काळे पापलेट फोर्मिओनिडी कुलातील आहेत. रुपेरी पापलेटचे शास्त्रीय नाव पॅम्पस अर्जेंटियस, पांढऱ्या पापलेटचे शास्त्रीय नाव पॅम्पस चायनेन्सिस तर काळ्या पापलेटचे शास्त्रीय नाव पॅरास्ट्रोमॅटिअस नायजर आहे. भारतालगतच्या हिंदी महासागरात तीनही जातींचे पापलेट आढळतात. त्यांपैकी रुपेरी पापलेटचे प्रमाण सर्वाधिक आढळते.

रुपेरी पापलेट (पॅम्पस अर्जेंटियस)

रुपेरी अथवा करडा पापलेट : याला मराठीत चांदवा असे नाव आहे. भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यांवर ते आढळतात. त्याची लांबी सु. ३० सेंमी. आणि वजन सु. १ किग्रॅ. असते. काही वेळा सु. ४० सेंमी. लांबीचे आणि २ किग्रॅ. वजनाचे रुपेरी पापलेट सापडले आहेत. तो आकाराने समचतुर्भुज असून मुस्कट बोथट असते. डोके व पाठ हे अवयव करड्या रंगाचे असून त्यात जांभळ्या रंगाची झाक असते. डोके आणि शरीराच्या दोन्ही बाजू रुपेरी करड्या असून अधर बाजू पांढरी असते. सगळ्या शरीरावर बारीक काळे ठिपके असतात. शरीर चपटे व दोन्ही बाजूंनी दबलेले असते. पृष्ठपर आणि गुदपर करड्या रंगाचे असून त्यावर दाट काळे ठिपके असतात. शेपटीचा पर द्विशाखित असून त्याचे खालचे टोक अधिक लांब असते. शेपटीचा भाग पिवळसर पांढरा असतो. श्वसनासाठी कल्ल्यांच्या चार जोड्या असतात. कल्ल्यांवर आवरण असून त्याच्या वरच्या भागावर काळा ठिपका असतो. शरीरावर लहान व पातळ वक्राकार खवले असतात. हे खवले झडणारे असतात.

रुपेरी पापलेट किनाऱ्यापासून थोडे दूर आणि ३५–७० मी. खोलीपर्यंत व पाण्याच्या चिखलमय तळ असलेल्या ठिकाणी थव्याने राहतात. ते प्लवकांवर जगतात. प्लवकांत टिनोफोर, सालपा, डोलिओलम व आंतरदेहगुही प्राण्यांच्या छत्रिकांचा समावेश असतो. काही वेळा समुद्रतळाजवळील छोटे प्राणीही ते खातात. विणीच्या हंगामात ह्या माशांचे वृषण आणि अंडाशय यांवरून नर व मादी बाहेरून ओळखता येतात. पूर्ण वाढ झालेले अंडे पारदर्शक व १·२-१·३ मिमी. व्यासाचे असून त्यात तेलाचा एक थेंब असतो. त्यामुळे अंडी पाण्यावर तरंगतात. मादी एका हंगामात ६५,०००–१,७१,००० अंडी घालते. भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावर मुंबई सागरी क्षेत्रात ऑक्टोबर–डिसेंबर हा विणीचा हंगाम असतो. मासे पकडण्याचा हंगाम ऑक्टोबर–फेब्रुवारी या काळात जोरात चालतो. फेब्रुवारीनंतर हे मासे दक्षिणेच्या द‍िशेने स्थलांतर करतात. त्यांचे मांस लुसलुशीत व स्वादिष्ट असल्याने पापलेट मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात.

पांढरा पापलेट : याला मराठीत सरंगा म्हणतात. त्याचा आकार किंचित अंडाकार असतो. पुष्कळ बाबतींत त्याचे साम्य रुपेरी पापलेटशी असले, तरी त्याचे रंग मात्र त्याच्यापेक्षा निराळे असतात. त्याचा रंग गडद करडा ते फिकट तपकिरी अशा कोणत्याही छटेचा असू शकतो. खालची बाजू रुपेरी असून त्यावर धातूच्या चमकेप्रमाणे छटा असतात. शरीरावर तपकिरी ठिपके असतात. लहान आणि मऊ अपृष्ठवंशी प्राणी हे त्यांचे खाद्य असते. बंगालच्या उपसागरात तसेच पश्‍चिम किनाऱ्यावर ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे मासे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात.

काळा पापलेट (पॅरास्ट्रोमॅटिअस नायजर)

काळा पापलेट : याला मराठीत हलवा म्हणतात. तो दिसायला बराचसा रुपेरी पापलेटसारखा असतो. तो आकाराने वरील दोन्ही माशांपेक्षा मोठा असून त्याच्या शरीराची लांबी सु. ६० सेंमी. असते. रंग गडद तपकिरी असून त्यात निळ्या रंगाच्या छटा असतात. पोटाकडचा भाग फिकट असतो. परांचे टोकाकडील भाग काळे असतात. शेपूट पिवळसर असून तिच्यावर तपकिरी रंगाचे तीन आडवे पट्टे असतात. या माशात कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने आणि मेद यांचे प्रमाण अधिक असते. काळा पापलेटही मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा