रक्तारुण. पृष्ठवंशी प्राण्यांच्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये आढळणारे लोहयुक्त (आयर्नयुक्त) प्रथिन. हीमोग्लोबिन हे फुप्फुसातील ऑक्सिजन रक्तावाटे शरीराच्या ऊतींकडे वाहून नेते आणि ऊतींमधील कार्बन डायऑक्साइड रक्तावाटे फुप्फुसाकडे आणते. सामान्यपणे प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रती १०० मिली. रक्तामध्ये १२–२० ग्रॅ. हीमोग्लोबिन असते.

हीमोग्लोबिनचे रचनासूत्र

हीमोग्लोबिन हे चार बहुपेप्टाइड शृंखलांपासून बनलेले असते. α1–आल्फा-१, α2–आल्फा-२, β1–बीटा-२ आणि β2–बीटा-२ अशी या बहुपेप्टाइड शृंखलांची नावे असून यातील प्रत्येक शृंखला एका ‘हीम’ गटाला (लोहाचा एक अणू आणि पॉर्फिरीन या वलयांकित संरचनेपासून बनलेले संयुग यालाच हीमॅटिन असेही म्हणतात) जोडलेली असते. या हीम गटाला म्हणजेच लोह-पॉर्फिरीन जटिल संयुगाला फुप्फुसातील ऑक्सिजन जोडला जातो आणि रक्तामधून सर्वत्र वाहून नेला जातो.

जेव्हा रक्तातील तांबड्या पेशी फुप्फुसातील वायुकोशात येतात, तेव्हा तेथे फुप्फुसातील ऑक्सिजन हीमोग्लोबिनशी जोडला जाऊन ‘ऑक्सिहीमोग्लोबिन’ हे संयुग बनते. या प्रकारे तांबड्या पेशी रक्तामधून शरीरभर फिरतात, तेव्हा त्या सर्व ऊतींना ऑक्सिजन पुरवितात. याच वेळी हीमोग्लोबिनद्वारे ऊतींमधील कार्बन डायऑक्साइड गोळा केला जातो आणि फुप्फुसांतील वायुकोशात आणून सोडला जातो. हा कार्बन डायऑक्साइड वायू श्वसनक्रियेतून उच्छ्वासावाटे शरीराबाहेर टाकला जातो.

हीमोग्लोबिन अस्थिमज्जेतील पेशींमध्ये तयार होते आणि याच पेशींचे रूपांतर तांबड्या पेशींमध्ये होते. जेव्हा तांबड्या पेशी मरतात, तेव्हा हीमोग्लोबिनचे तुकडे होतात. या प्रक्रियेत जे लोह मागे उरते, त्याचा पुन्हा वापर होतो. ते प्रथिनांकरवी अस्थिमज्जेत नेले जाते आणि नवीन तांबड्या पेशींच्या निर्मितीसाठी वापरले जाते. हीमोग्लोबिनच्या चयापचयातून पिवळ्या रंगाचे बिलिरुबीन बनते, जे पित्त आणि लघवी यांतून शरीराबाहेर टाकले जाते. हीमोग्लोबिन हे तांबड्या रक्तपेशी आणि प्रजनन मार्ग वगळता, अन्य ठिकाणीही आढळते. मेंदूतील कृष्ण स्तराच्या चेतापेशी, बृहतभक्षी पेशी, वायुकोशातील पेशी, फुप्फुसे, यकृत पेशी, वृक्कातील मिझँजियल पेशी, गर्भाशय अंत:स्तरातील पेशी इत्यादींमध्ये हीमोग्लोबिन असते.

काही विषारी पदार्थांचा हीमोग्लोबिनबरोबर संयोग झाल्यास त्यामुळे हीमोग्लोबिन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होत नाही. खासकरून ॲनिलीन हे रंगद्रव्य आणि इतर रसायने यांच्या हीमोग्लोबिनच्या संयोगातून मेथोमोग्लोबिन बनते, ज्याचा ऑक्सिजनबरोबर संयोग होत नाही. त्यामुळे रक्त निळसर-करडे बनते. कार्बन मोनॉक्साइड या विषारी वायूचाही हीमोग्लोबिनबरोबर सहज संयोग होतो. त्यामुळे रक्त भडक-लाल बनते; परंतु त्यामुळे रक्तात ऑक्सिजन शोषला जात नाही. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावतो.

हीमोग्लोबिन याचा इंग्लिश संक्षेप ‘एचबी (Hb)’ असा करतात. तसेच सामान्यपणे संपूर्ण रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण ग्रॅम प्रति-डेसीलिटर (ग्रॅ./डेलि.) या एककात मोजतात. पुरुषांसाठी सामान्य एचबी पातळी १४ ते १६ ग्रॅ./डेलि. आणि महिलांकरिता १२ ते १६ ग्रॅ./डेलि. इतकी आहे.

वैज्ञानिकांना हीमोग्लोबिनचे १,००० पेक्षा जास्त प्रकार आढळले आहेत. हे प्रकार जनुकीय बदलांमुळे घडून येतात. मनुष्यात भ्रूणावस्थेत हीमोग्लोबिनचे वेगवेगळे चार प्रकार, अर्भकावस्थेत एक प्रकार, जन्मानंतर चार प्रकार तर प्रौढावस्थेत तीन प्रकार दिसून येतात. प्रौढावस्थेत हीमाग्लोबिन-ए हा प्रकार सर्वाधिक आढळतो. तो ९५–९८% प्रौढांत दिसून येतो. हीमोग्लोबिन-ए 2 आणि हीमोग्लोबिन-एफ हे प्रकार साधारणपणे प्रत्येकी २-३% लोकांत आढळतात. हीमोग्लोबिनचे अनेक प्रकार रोगकारक असतात. हीमोग्लोबिन-एस या अपसामान्य प्रकारामुळे दात्र-पेशी पांडुरोग (सिकल सेल ॲनिमिया) उद्भवतो. या विकृतीत तांबड्या पेशींचा आकार विळ्यासारखा होतो आणि त्या कठीण होतात. अशा पेशींमुळे रक्तवाहिन्या तुंबू शकतात.