पारिस्थितिकी ही जीवविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत सजीवांचा एकमेकांशी तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध यांचा अभ्यास आणि विश्लेषण केले जाते. सजीवांचे एकमेकांशी संबंध कसे असतात, त्यांचा एकमेकांवर कसा परिणाम होतो, अजैविक घटकांवर ते कसे अवलंबून असतात आणि या घटकांवर सजीवांचा काय परिणाम होतो, हे पारिस्थितिकीच्या अभ्यासातून समजते. या शाखेत जीवविज्ञान, भूगोल व भूविज्ञान हे विषय एकत्र येतात आणि रसायनशास्र, भौतिकी आणि संगणकीय विज्ञान यांचा वापर त्यात होत असल्यामुळे पारिस्थितिकी ही एक आंतरज्ञानशाखा बनली आहे.
निसर्गात विविध प्रकारचे सजीव असतात. त्यांमध्ये वनस्पती व प्राणी यांसारखे जैविकदृष्ट्या प्रगत व जटिल सजीव असतात, तर कवके, अमीबा, जीवाणू इ. साधे व सरल सजीवही असतात. यांपैकी कोणताही लहान किंवा मोठा, साधा किंवा जटिल सजीव एकटा जगू शकत नाही. प्रत्येक सजीव कोणत्या ना कोणत्या प्रकारे इतर सजीव किंवा पर्यावरणातील अजैविक (निर्जीव) घटकांवर अवलंबून असतो. उदा., एखाद्या परिसरातील गवत नष्ट केले, तर त्या परिसरातील हरिणांसारखे प्राणी अन्नासाठी दुसरीकडे निघून जातात किंवा त्यांची उपासमार होते. अशाच रीतीने वनस्पती देखील पोषक घटक मिळविण्यासाठी त्यांच्या परिसरावर अवलंबून असतात. कारण प्राण्यांचे मलमूत्र तसेच मृत प्राणी व वनस्पती यांच्या ऱ्हासातून तयार होणारे घटक तेथील वनस्पतींसाठी गरजेचे असतात.
सजीवांचे अस्तित्व आणि सुस्थिती पर्यावरणीय आंतरसंबंधावर अवलंबून असल्यामुळे पारिस्थितिकीचा अभ्यास गरजेचा असतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात झालेला एखादा क्षुल्लक बदल आपल्यावर आणि आपल्या पर्यावरणावर परिणाम करू शकतो. पारिस्थितिकी तज्ज्ञ निसर्गातील संघटनांचा अभ्यास तीन पातळीवर करतात: (१) समष्टी (पॉप्युलेशन) : एखाद्या ठिकाणी, कोणत्याही दिलेल्या काळी असलेल्या सजीवांच्या एखाद्या जातीतील (किंवा गटातील) सर्व सजीव. (२) समुदाय (कम्युनिटी) : एखाद्या ठिकाणी, दिलेल्या काळी परस्पर आंतरक्रिया असलेल्या सजीवांच्या विविध जातींतील सर्व सजीव. (३) परिसंस्था : जैविक समष्टी मिळून जैविक समुदाय होतो, समुदायाची त्याच्या सभोवतालच्या अजैविक घटकांशी आंतरक्रिया होत असते. असे समुदाय आणि अजैविक घटक मिळून परिसंस्था बनते.
(१) समष्टी : नानज अभयारण्यातील सर्व माळढोक पक्षी मिळून त्यांची समष्टी बनते, तसेच एखाद्या वनात असलेले सर्व साग वृक्ष त्यांची समष्टी दाखवितात. पारिस्थितिकी तज्ज्ञ समष्टीत झालेली वाढ निश्चित करतात, तिचे विश्लेषण करतात आणि प्रत्येक जाती व पर्यावरणाची स्थिती यांतील आंतरसंबंध शोधतात.
कोणत्याही समष्टीतील सजीवांची संख्या दोन पायाभूत बलांतील आंतरक्रियांवर अवलंबून असते – (१) आदर्श परिस्थितीत समष्टी वाढू शकेल असा दर आणि (२) समष्टीवर मर्यादा आणणाऱ्या पर्यावरणीय घटकांचा एकत्रित परिणाम. या घटकांमध्ये अन्नतुटवडा, भक्षकांचे हल्ले, स्वजातीय किंवा परजातीय सजीवांशी स्पर्धा, हवामान आणि रोग इ. बाबींचा समावेश होतो.
बदलणाऱ्या काळानुसार समष्टीमध्ये लक्षणीय बदल होऊ शकतात. काही वेळा हे बदल नैसर्गिक घटनांमुळे घडतात. उदा., पर्जन्यमानात झालेल्या बदलामुळे काही समष्टी वाढतात, तर काही घटतात. एखाद्या नवीन रोगामुळे वनस्पतींची किंवा प्राण्यांची समष्टी लहान होते. काही वेळा मानवी कृतींमुळेही असे बदल घडतात. उदा., औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र व वाहने यांच्याद्वारे आम्लयुक्त वायू हवेत सोडले जातात, ते ढगात मिसळतात आणि आम्लयुक्त पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पडतात. ज्या क्षेत्रात आम्लयुक्त पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो, तेथील माशांच्या समष्टीत मोठी घट होते.
पर्यावरणाची वहनक्षमता : कोणत्याही विशिष्ट जातीच्या कमाल समष्टीला अन्न, पाणी, अधिवास इ. बाबी पुरवू शकणाऱ्या पर्यावरणाच्या क्षमतेला ‘पर्यावरणाची वहनक्षमता’ म्हणतात. वाईट हवामान, भक्षकांद्वारे होणारी शिकार, विणीचा वाईट हंगाम इ. बाबींमुळे पर्यावरणाच्या वहनक्षमतेपेक्षा समष्टी नेहमीच लहान असते.
(२) समुदाय : ताडोबाच्या समुदायात वाघ, कोल्हे, लांडगे, हरिणे, उंदरे, वेगवेगळ्या जातीची गवते, साग, साल आणि विविध वृक्ष आढळतात. पारिस्थितिकी तज्ज्ञ समुदायांचे वेगवेगळे प्रकार अभ्यासतात, वेगवेगळ्या जाती त्यांच्या समुदायात कोणती भूमिका पार पाडतात आणि त्यांच्यात कसे बदल होतात, ते पाहतात.
विस्तृत भौगोलिक क्षेत्रात पसरलेल्या वनस्पती व प्राणी यांच्या समुदायाला ‘जीवसंहती’ म्हणतात. भिन्नभिन्न जीवसंहतीच्या सीमा हवामानानुसार निश्चित केल्या जातात. वाळवंट, वने, तृणभूमी, टंड्रा व जलीय जीवसंहती यांच्या कित्येक प्रकारांचा समावेश जीवसंहतीत होतो.
एखाद्या जैविक समुदायात पर्यावरणाशी जुळवून घेताना प्रत्येक जाती आपली जागा म्हणजेच ‘सुस्थान’ (नीश) निश्चित करते. कोणतीही जाती पर्यावरणाशी ज्या प्रकारे आंतरक्रिया करू शकते असे सर्व पर्याय सुस्थानात उपलब्ध असतात. उदा., विशिष्ट जाती, ऊर्जा कशी मिळविते किंवा काय खाते; ती कोणाचे भक्ष्य असते; तिला उष्णता, प्रकाश किंवा आर्द्रता किती लागते; कोणत्या परिस्थितीत तिचे प्रजनन घडून येते इ. घटक यात समाविष्ट असतात. अनेक जाती त्यांच्या समुदायात विशिष्ट सुस्थान प्राप्त करतात, असे पारिस्थितिकी तज्ज्ञांना दिसून आले आहे. काही तज्ज्ञांच्या मते, हे स्पर्धेमुळे घडते. जर दोन जाती एकच सुस्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतील, तर त्यांपैकी एका जातीला मर्यादित स्रोतांमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागते. अन्य तज्ज्ञांच्या मते, जी जाती सक्षमपणे तिची भूमिका पार पाडत असेल, ती आपले सुस्थान मिळविते.
परमोच्च समुदाय : प्रकाशाच्या तीव्रतेत होणारे बदल, वाऱ्यापासून संरक्षण, मृदेतील बदल इ. घटक एखाद्या क्षेत्रातील सजीवांच्या प्रकारात बदल करू शकतात आणि त्यामुळे समुदायातील समष्टीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी, जातींची संख्या व त्यांचे प्रकार बदलल्याने त्या क्षेत्राच्या भौतिक व रासायनिक वैशिष्ट्यांमध्ये बदल घडून येतात. मात्र असे क्षेत्र कालांतराने स्थिर होऊ शकते. या अवस्थेला ‘परमोच्च समुदाय’ (क्लायमॅक्स कम्युनिटी) म्हणतात. ही अवस्था काही शेकडो ते हजारो वर्षे टिकू शकते.
पारिस्थितिकी अनुक्रमण : समुदायामध्ये काळानुसार होणाऱ्या बदलांना ‘पारिस्थितिकी अनुक्रमण’ म्हणतात. ही एक सावकाश घडून येणारी प्रक्रिया आहे. एखाद्या क्षेत्रातील सजीवांच्या संख्येत होणाऱ्या बदलावरून पारिस्थितिकी अनुक्रमणाचा अभ्यास करता येतो.
पारिस्थितिकी अनुक्रमणाचे प्राथमिक व द्वितीयक असे प्रकार करतात. प्राथमिक अनुक्रमणात जेथे जीवन अस्तित्वात नसते अशा क्षेत्रात सजीव राहू लागतात. उदा., ज्वालामुखीच्या स्फोटानंतर नव्याने तयार झालेले बेट. द्वितीयक अनुक्रमणात अस्तित्वात असलेला समुदाय अडचणीत सापडतो. उदा., वणव्यामुळे वनसमुदाय नाश झाल्यानंतर असे अनुक्रमण घडते. अशा ठिकाणी, प्रथम रानफुले व गवते वाढतात. त्यापाठोपाठ झुडपे वाढून कुरणे तयार होतात. शेवटी वृक्ष वाढतात आणि त्यांपासून पुन्हा वन तयार होते. अशा प्रकारे परमोच्च समुदाय देखील निसर्गाच्या प्रेरणेमुळे बदलू शकतात. पारिस्थितिकी तज्ज्ञांच्या मते, वणवे आणि अन्य मोठ्या नैसर्गिक घडामोडी काही वेळा अपेक्षित व गरजेच्या असतात.
(३) परिसंस्था : परिसंस्था ही निसर्गातील संघटनाची जटिल पातळी आहे. समुदाय आणि पर्यावरणातील अजैविक घटक (उदा., वातावरण, मृदा, पाणी, हवा, पोषक घटक आणि ऊर्जा इ.) यांपासून परिसंस्था बनते. परिसंस्थेतील अनेक अजैविक व जैविक घटकांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न पारिस्थितिकी तज्ज्ञ करतात. या अभ्यासातून परिसंस्थेत ऊर्जेचा प्रवाह कसा असतो आणि पदार्थांचे चक्रीभवन कसे होते, त्यानुसार पारिस्थितिकी तज्ज्ञ परिसंस्थेवर प्रभाव करणाऱ्या घटकांचे सहा मुख्य गट करतात : (१) सूर्य, (२) अजैविक पदार्थ, (३) प्राथमिक उत्पादक, (४) प्राथमिक भक्षक (ग्राहक), (५) द्वितीय भक्षक आणि (६) अपघटक.
सूर्यापासून ऊर्जा मिळते व सर्व प्राथमिक उत्पादक अन्ननिर्मितीसाठी ती ऊर्जा वापरतात. हिरव्या वनस्पती (गवते, झुडपे, वृक्ष इ.) प्रकाशसंश्लेषण क्रियेत अन्न तयार करतात. याशिवाय वनस्पतींना वाढीसाठी पाणी, फॉस्फरस इ. अजैविक घटकांची गरज असते. प्राथमिक भक्षकांमध्ये उंदीर, ससा, नाकतोडा तसेच शाकाहारी प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांना लांडगे, कोल्हे व इतर प्राणी म्हणजे द्वितीय भक्षक खातात. जीवाणू आणि कवक यांसारखे अपघटक मृत वनस्पती व प्राणी यांचे पोषक घटकांमध्ये रूपांतर करतात. हे पोषक घटक मातीत मिसळल्यानंतर वनस्पतींद्वारे वापरले जातात.
एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्नाच्या स्वरूपात ऊर्जेचे रूपांतर होण्याच्या क्रमाला ‘अन्नसाखळी’ म्हणतात. साध्या अन्नसाखळीत प्राथमिक उत्पादक गवत असते. सशासारखे प्राथमिक भक्षक गवत खातात. कालांतराने प्राथमिक भक्षक हे एखादा लांडगा किंवा ससाणा यांसारख्या द्वितीय भक्षकाचे भक्ष्य होऊ शकते. जीवाणूंसारखे अपघटक मृत गवत आणि ससा, लांडगा, ससाणा इ.चे मृत अवशेष तसेच प्राण्यांची अपशिष्टे यांचे अपघटन करतात. बहुतेक परिसंस्थांमध्ये विविध उत्पादक, ग्राहक व अपघटक असतात आणि त्यांच्यापासून वेगवेगळ्या अन्नसाखळ्या तयार होतात. अशा अनेक अन्नसाखळ्या एकमेकांना जोडल्या जाऊन अन्नजाळे तयार होते. अनेक उष्ण आणि सागरी परिसंस्थांमधील अन्नजाळे गुंतागुंतीचे असते. काही जाती अनेक पदार्थ खातात. परंतु काहींना विशिष्ट प्रकारच्या अन्नाची गरज असते. उदा., कोआला आणि पंडा यांसारखे प्राथमिक भक्षक अनुक्रमे निलगिरी आणि बांबू खातात. या वनस्पतींचा नाश झाला तर ते प्राणीही मरतात.
पारिस्थितिक कार्यक्षमता : परिसंस्थेत ऊर्जा रूपांतराचा क्रम विशिष्ट असतो. प्रथम, प्राथमिक उत्पादक सूर्यापासून मिळालेल्या प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात, ती वनस्पतींमध्ये साठविली जाते. प्राथमिक भक्षक या वनस्पती खातात. त्यामुळे ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेच्या विशिष्ट प्रकारात होते आणि ती प्राथमिक भक्षकाच्या शरीराच्या पेशींमध्ये साठविली जाते. जेव्हा द्वितीय भक्षक प्राथमिक भक्षकाचे सेवन करतो तेव्हा या ऊर्जेचे रूपांतर होते. एका पोषण पातळीपासून दुसऱ्या पोषण पातळीत ज्या क्षमतेने ऊर्जा स्थानांतर होते त्याला ‘पारिस्थितिक कार्यक्षमता’ म्हणतात. अनेक सजीवांची पारिस्थितिकीय कार्यक्षमता कमी असते. याचा अर्थ, काही सजीव त्यांना उपलब्ध झालेल्या ऊर्जेपैकी खूपच कमी ऊर्जेचे रूपांतर करतात. हिरव्या वनस्पती त्यांना मिळालेल्या सौर ऊर्जेपैकी ०.१-१% एवढ्याच ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करू शकतात. बहुतांशी ऊर्जा त्या वाढीसाठी वापरतात किंवा उष्णतेच्या रूपात बाहेर टाकतात. शाकाहारी व मांसाहारी प्राणी त्यांनी खाल्लेल्या अन्नापासून मिळालेल्या ऊर्जेचा केवळ १०–२०% वापर पेशीनिर्मितीसाठी करतात.
अन्नसाखळीच्या प्रत्येक पायरीवर ऊर्जा मुक्त होत असल्याने सर्व परिसंस्थांमध्ये ऊर्जेचा एक स्तूप दिसून येतो. या स्तूपामध्ये वनस्पती (प्राथमिक उत्पादक) स्तूपाच्या पायथ्याशी असतात. स्तूपाच्या दुसऱ्या पायरीवर शाकाहारी प्राणी (प्राथमिक भक्षक) आणि शिखरावर मांसाहारी प्राणी (द्वितीय भक्षक) असतात. स्तूपातून असे दिसते की, वनस्पतींपासून शाकाहारी प्राण्यांपेक्षा तसेच शाकाहारी प्राण्यांपासून मांसाहारी प्राण्यांपेक्षा अधिक ऊर्जा मुक्त होत असते. अनेक भूमी परिसंस्थामध्ये ऊर्जा स्तूपापासून जैवस्तुमान स्तूप तयार झालेला दिसून येतो. याचा अर्थ, वनस्पतींचे जैववस्तुमान शाकाहारी प्राण्यांच्या एकूण जैववस्तुमानापेक्षा अधिक असते आणि शाकाहारी प्राण्यांचे जैववस्तुमान मांसाहारी प्राण्यांच्या एकूण जैववस्तुमानापेक्षा अधिक असते. सागरी परिसंस्थांमध्ये प्राणी व वनस्पती यांचे जैववस्तुमान जवळपास सारखे असते. समुद्रात लहान वनस्पती एवढ्या वेगाने वाढतात की, त्या संख्येने अधिक असलेल्या प्राण्यांची अन्नाची गरज भागवू शकतात.
पदार्थांचे चक्रीभवन : सर्व सजीव विशिष्ट मूलद्रव्ये आणि संयुगांपासून बनलेले असून पाणी, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर इ. त्यांचे मुख्य घटक आहेत. परिसंस्थांमध्ये या सर्व घटकांचे चक्रीभवन होत असते. सर्व सजीवांना फॉस्फरसची गरज असते. वनस्पतींना मातीतून फॉस्फरसयुक्त संयुगे मिळतात, तर प्राण्यांना त्यांनी खाल्लेल्या वनस्पती किंवा प्राणी यांपासून फॉस्फरस मिळतो. अपघटकांद्वारे मृत वनस्पतींचे व प्राण्यांचे विघटन होऊन त्यांच्यातील फॉस्फरस मृदेत मिसळतो. सुरक्षित परिसंस्थांमध्ये फॉस्फरसचे प्रमाण स्थिर असते. परंतु मानवी कृतींमुळे परिसंस्था विचलित झाली तर फॉस्फरस गळला जातो. त्यामुळे परिसंस्थांची वनस्पतींना आधार देण्याची क्षमता घटते. उदा., मानवाने वनांचे रूपांतर शेतजमिनीत केल्याने मातीची झीज होते व मातीबरोबर फॉस्फरस नद्यांमध्ये मिसळला जातो. तेथे शैवालाच्या वाढीमध्ये भर पडते आणि समुद्राच्या व नदीच्या तळाशी फॉस्फरस बंदिस्त होतो. फॉस्फरसाचे मातीतील प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना महागडी फॉस्फरसयुक्त खते वापरून त्याचे प्रमाण पूर्ववत करावे लागते.
पर्यावरण आणि पारिस्थितिकी : परिसंस्थेत रोज, ऋतुमानानुसार तसेच दीर्घ कालावधीनंतर (जसे पारिस्थितिक अनुक्रमण घडून येते तसे) बदल घडतात. एखाद्या वनात वणवा पेटला किंवा समुद्रकिनाऱ्याला चक्रीवादळ धडकले, तर अशा आकस्मिक बदलांमुळे परिसंस्थेवर गंभीर परिणाम होतात. मात्र दिवसागणिक होणारे बहुतेक बदल, विशेषत: पोषण चक्रांचे बदल एवढे सूक्ष्म असतात की परिसंस्था सामान्यपणे स्थिर भासते. प्राणी, वनस्पती व त्यांच्या पर्यावरणात भासणाऱ्या अशा स्थिरतेला ‘निसर्गाचा समतोल’ म्हणतात. पूर्वी ही संकल्पना संतुलित किंवा बदल न होणारी म्हणजे परमोच्च समुदाय म्हणून मानली जात असे. पारिस्थितिकी तज्ज्ञ एखाद्या परिसंस्थेचा आणि पारिस्थितिक अनुक्रमणाचा पद्धतशीर अभ्यास दीर्घकाळ करतात. अशा अभ्यासातून पारिस्थितिकी अनुक्रमणातील गुंतागुंत लक्षात येते. ज्याला समतोल म्हणतात; त्यातही हळूहळू बदल घडत असतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील मिशिगन राज्याच्या वायव्य दिशेला रॉयल बेटावरील परिसंस्थेचे उदाहरण यासंदर्भात येथे घेता येर्इल. या ठिकाणी मूस (मृगाची एक जाती) व लांडगा या प्राण्यांमध्ये चक्रीय संबंध आढळून येतो; मूस प्राण्याची संख्या वाढली की लांडग्यांची संख्या वाढते. मागील ६० वर्षे केलेल्या अभ्यासातून या दोन्ही प्राण्यांच्या संख्येत चढ व उतार आढळून आले असून, अद्यापही त्यांच्यात समतोल दाखविणारे आंतरसंबंध प्रस्थापित झालेले नाहीत. या अभ्यासातून मूस यांच्या संख्येत बदल होण्यामागे अन्नाची उपलब्धता, त्यांची लांडग्याकडून होणारी शिकार, स्थानिक वातावरणातील बदल इ. बाबी कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे. लांडग्यांच्या संख्येत बदल होण्यामागे केवळ अन्नाची उपलब्धता हे एकमेव कारण नसून त्यांच्यात घडणारे अंतर्जनन आणि विषाणुजन्य रोग इ. घटक कारणीभूत आहेत, असे लक्षात आले आहे.
एखादा वेगळा प्रदेश क्षेत्रकार्यासाठी निवडून तेथील प्राणी व वनस्पती यांच्यातील आंतरसंबंध पर्यावरणीय अभ्यासाच्या नजरेतून जाणून घेणे गरजेचे असते. उदा., अंदमान-निकोबार या बेटसमूहांवर पर्यटनामुळे जलप्रदूषण व हवाप्रदूषण वाढत आहे. त्याचा परिणाम तेथील परिसंस्थांवर कसा होतो आणि पारिस्थितिकीय समतोल कसा ढासळू शकतो, हे समजून त्यावर उपाय सुचविण्याचे कार्य पारिस्थितिकीचे अभ्यासक करीत आहेत.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी, नैसर्गिक स्रोतांची जपणूक व व्यवस्थापन करण्यासाठी पारिस्थितिकीचा अभ्यास उपयोगी ठरतो. पारिस्थितिकी तज्ज्ञ अन्य क्षेत्रातील वैज्ञानिकांसोबत काम करतात आणि वनस्पती, प्राणी व नागरिक यांना आरोग्यदायी व कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देतात. एकीकडे कोळसा, नैसर्गिक वायू इ. अनूतनक्षम स्रोत वेगाने कमी होत आहेत. तसेच त्यांच्या अतिवापरामुळे प्रदूषणात भर पडत आहे. दुसरीकडे वने व तृणभूमी यांचे शेतीसाठी, शहरीकरणासाठी व पडीक जमिनीत रूपांतर झाल्यामुळे नैसर्गिक परिसंस्था आणि तेथील जातींचा ऱ्हास होत आहे. पारिस्थितिकी तज्ज्ञांचे असे मत आहे की, मानवी लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर इंधन तुटवडा, प्रदूषण, निर्वनीकरण, वाहतूक, गरिबी आणि वातावरणातील बदल इ. समस्या अधिक उग्र स्वरूप धारण करू शकतात.
भारतात पारिस्थितिकीच्या अभ्यासात के. रामदेव मिश्रा यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. प्रायोगिक पारिस्थितिकीचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांचे सहकारी जी. एस. पुरी यांनी १९६० मध्ये ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर ट्रॉपिकल इकॉलॉजी’ ही संस्था स्थापन केली. त्यानंतर आर. एस. त्रिपाठी आणि के. बी. रेड्डी यांनी पारिस्थितिकी विज्ञानात बहुमोल योगदान दिले आहे. दिल्ली येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हॉयरन्मेंट’ ही संस्था या शाखेत महत्त्वपूर्ण काम करीत आहे. पारिस्थितिक समृद्धीसाठी पारिस्थितिकीचे ज्ञान असावे लागते. परिसंस्था सुस्थितीत व सुरक्षित राहिल्यास त्याचा लाभ समाजाला होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला पारिस्थितिकी आणि पर्यावरण यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.