अध:पृष्ठीय जल : पुनर्भरण

पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भूस्तरातील सच्छिद्र जागेत असलेल्या पाण्यास अध:पृष्ठीय जल किंवा भूजल म्हणतात. भूपृष्ठावरील पाण्यास ‘पृष्ठीय जल’ म्हणतात.

अध:पृष्ठीय जलाचे वर्गीकरण संतृप्त क्षेत्र आणि वातन क्षेत्र असे केले जाते. संतृप्त क्षेत्रामध्ये खडकातील सर्व रिक्त जागा पाण्याने पूर्णपणे भरलेल्या असतात तर वातन क्षेत्रामध्ये खडकातील काही रिक्त जागा हवेने भरलेल्या असतात.

भूपृष्ठावर पडलेले पावसाचे पाणी जमिनीत झिरपते आणि दोन प्रकारांच्या खडकांत म्हणजेच जलधारक व जलप्रतिबंधक या खडकांत साठते. ज्या खडकात छिद्रे अथवा पोकळ्या असतात आणि जल साठवून ठेवण्याची अथवा वहन करण्याची क्षमता असते, अशा खडकांना जलधारक खडक म्हणतात. घट्ट न झालेली वाळू, दगड-गोटे असलेला नदीचा गाळ आणि वालुकाश्म हे जलधारक खडक आहेत. जलधारक खडकांतील पाण्याचे प्रमाण खडकांची सच्छिद्रता आणि पार्यता यांवर अवलंबून असते. अध:पृष्ठीय जल पार होऊ शकणार्‍या अभेद्य खडकांना जलप्रतिबंधक खडक असे म्हणतात.

अध:पृष्ठीय जलात अनेक रासायनिक, भौतिक व सूक्ष्मजीवांशी निगडित घटक असतात व त्यात क्षार हा घटक सर्वत्र आढळतो. यात सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे बायकार्बोनेट, कार्बोनेट व सल्फेट इ. विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त तर क्लोराइड व नायट्रेट यांचे प्रमाण अल्प असते. त्याचप्रमाणे लोह, अ‍ॅल्युमिनियम, सिलिका, बोरॉन, फ्ल्युओराइड, सिलिनियम इ. घटक अल्प प्रमाणात आढळतात.

अध:पृष्ठीय जल शोधण्याच्या अनेक पद्धती आहेत. ज्या भूपृष्ठावर उंबर, बेल, निलगिरी इ. वृक्ष असतात त्या वृक्षांच्या जागी अध:पृष्ठीय जल असण्याची शक्यता वर्तविली जाते. अध:पृष्ठीय जल शोधण्यासाठी भूभौतिक शास्त्रातील ‘विद्युत् रोधकता’ पद्धतीचा वापर केला जातो. तसेच कृत्रिम उपग्रहांद्वारे घेतलेली हवाई छायाचित्रे, दूरवर्ती संवेदनाग्रहण इ. तंत्रांचा वापर करून भूपृष्ठावरील प्रदेशांचे नकाशे तयार करण्यात येऊन त्याचा वापर अध:पृष्ठीय जल शोधण्यासाठी केला जातो.

अध:पृष्ठीय जल हे जलसंधारणाचे एक महत्त्वपूर्ण संसाधन आहे. हिमप्रदेशातील बर्फ वितळून पाण्याचा बराचसा भाग जमिनीत मुरतो. भूपृष्ठावरील जलाशय, नदी, डोह, दलदलीचे प्रदेश इत्यादींतील पाणी जमिनीत मुरत राहते आणि त्यामुळे जलसाठ्यात भर पडत असते. पावसाचे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात कसे मुरेल याकडे लक्ष देऊन अनेक उपाय शोधले जातात. उदा., पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून जाण्यास प्रतिरोध करण्यासाठी वनस्पतींची वाढ करणे, तसेच लहान-मोठी धरणे बांधणे, पाझर तलाव व नालाबंडिगची कामे करणे. त्यामुळे पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरल्याने अध:पृष्ठीय जलाच्या साठ्यात भर पडते.

भारतातील अध:पृष्ठीय जलस्रोताचा वार्षिक पुनर्भरण साठा सु. ४३३ अब्ज घ.मी. असून उपलब्धता ३९९ अब्ज घ.मी. आहे. भारतात केंद्रीय अध:पृष्ठीय जल मंडळातर्फे देशातील अध:पृष्ठीय जलस्रोतांचा आढावा घेतला जातो. मंडळाच्या अहवालानुसार भारतात अध:पृष्ठीय जलस्रोतांचे वितरण व विकास असमान असल्याचे आढळते. तसेच राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, पंजाब आणि हरयाणा इ. राज्यांत अध:पृष्ठीय जलपातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा