सर्व संवहनी वनस्पतींचा एक महत्त्वाचा अवयव. पाने हिरव्या रंगाची असून खोडावर वाढतात आणि सहज दिसून येतात. पानांमधील हरितद्रव्य आणि पानांची मोठी संख्या यांमुळे वनस्पतीचे अस्तित्व सहज जाणवते. पान आणि खोड हे एकमेकांशी मुकुलावस्थेपासून जोडलेले असतात आणि नंतरही त्यांचा एकमेकांशी संबंध टिकून राहतो. त्या दोन्हींना मिळून प्ररोह म्हणतात आणि त्यांचा उगम बी रुजताना प्रांकुरापासून होतो.

खोडाच्या टोकाशी जसजशी कळी (अग्र कल‍िका) वाढत जाते, तसतशी तिच्यातून लहान पाने आणि खोड हळूहळू साकार होऊ लागतात. कोवळी पाने खोडाच्या किंवा फांदीच्या टोकाला, तर जून पाने तळाकडे असतात. पान खोडाला जेथे जुळलेले असते तेथे झालेल्या वरच्या कोनाला ‘कक्ष’ म्हणतात. पान बहुधा पातळ व चपटे असते. त्याचा वरचा व खालचा पृष्ठभाग यांमध्ये रंग, त्यावरील लव (रोम) आणि छिद्रे म्हणजे पर्णरंध्रे यांत फरक आढळतो. पानांमध्ये असलेल्या शिरांमुळे त्याला आधार प्राप्त होऊन पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा अशा स्थितीत ते खोडावर राहते. काही शैवाल व शैवाक यांमध्ये पानांसारखी रचना असलेली व कार्य करणारी अंगे असतात. मात्र ती पाने नसतात. खरी पाने फक्त संवहनी वनस्पतींवर असतात.

पानाची संरचना

पानांची संरचना : प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेत प्रकाशग्रहण करणे, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन या वायूंची देवाणघेवाण करणे, बाष्प बाहेर टाकणे, खोडाकडून आलेले पाणी व क्षार वनस्पतीला पोहोचविणे आणि तयार झालेले अन्न इतर अवयवांकडे वाहून नेणे यांसाठी पानांची रचना झालेली असते. पानांचे संरक्षण करण्यासाठी तसेच पानांमधील पाण्याचे बाष्पीभवन मर्यादेबाहेर होऊ नये यांसाठी पानांच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागांवर पेशींचा स्तर असतो. या स्तरांना ‘अधिचर्म’ म्हणतात. अधिचर्मावर क्यूटिनाचा स्तर असतो. दोन्ही अधिचर्मांच्या दरम्यान पर्णमध्योती असते. पर्णमध्योतीच्या पेशींमध्ये हरितलवके असतात. प्रकाशसंश्लेषणाचे कार्य याच स्तरात घडून येते. मात्र नेचे आणि बहुतेक सपुष्प वनस्पतींमध्ये पर्णमध्योतीचा स्तर दोन स्तरांमध्ये विभागलेला असतो; वरच्या बाजूचा (१) स्कंभ (पॅलिसेड) स्तर आणि त्याखालचा (२) स्पंजी स्तर. पानांच्या वरच्या बाजूचा मध्योती स्कंभपेशींनी बनलेला असतो. या स्कंभपेशी जवळजवळ व अधिक प्रमाणात असतात. खालच्या बाजूकडील मध्योती स्पंजी असून तेथे पेशी विरल असतात व त्यांमध्ये पोकळी असते. मध्योतीमध्ये संवहनी पूल असतात. त्यातून पाणी व इतर घटक मध्योतीभर दिले जातात आणि तयार झालेले अन्न वाहून नेले जाते. पर्णरंध्रे अधिक संख्येने खालच्या अधिचर्मामध्ये असतात. प्रत्येक पर्णरंध्राभोवती दोन रक्षक पेशी असतात. पर्णरंध्रामधून वायूंचे विसरण होत असते.

पानांची कार्ये : पाने हरितद्रव्याच्या मदतीने प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करून अन्नाच्या स्वरूपात साठविण्याचे कार्य करतात. या क्रियेत पाण्याच्या रेणूचे विघटन होऊन ऑक्सिजन वायू निर्माण होतो (पाहा : प्रकाशसंश्‍लेषण). श्‍वसनक्रियेत हवेतील ऑक्सिजन पानांवरील पर्णरंध्रांमार्फत आत घेतला जाऊन तयार झालेला कार्बन डायऑक्साइड पानांद्वारे बाहेर सोडला जातो. पाने वनस्पतींनी मुळांद्वारे शोषलेले पाणी व क्षार खोडातून सर्व अवयवांपर्यंत नेण्याचे कार्य तसेच जास्तीचे पाणी बाष्परूपात वातावरणात सोडण्याचे कार्य करतात (पाहा : बाष्पोत्सर्जन).

पानाचे विविध भाग

पानाचे (१) पर्णाधार, (२) पर्णवृंत (देठ) आणि (३) पर्णदल (पाते) असे तीन भाग असतात.

पर्णाधार : पान खोडाला पेराशी जेथे जोडलेले असते तो भाग म्हणजे पर्णाधार. काही वनस्पतींमध्ये या जागी दोन अनुपर्णे असतात, त्यांना ‘अनुपर्णी’ म्हणतात. अनुपर्णे पानांसारखी, शूलासारखी किंवा तणावासारखी रूपांतरित झालेली असतात (उदा., गुलमोहर, बाभूळ इ.). वड व फणस यांमध्ये अनुपर्णे मोठी असतात. त्यांना ‘कलिका शल्क’ म्हणतात. ज्या पानांना अनुपर्णे नसतात त्यांना ‘अननुपर्णी’ म्हणतात.

पर्णवृंत : पर्णदल पर्णाधाराला ज्या गोल देठाने जुळलेला असतो त्याला ‘पर्णवृंत’ म्हणतात. मोरवेलीमध्ये पर्णवृंत लांब व तणावासारखे आणि ऑस्ट्रेलियन बाभळीमध्ये ते चपटे व पानासारखे असते. ज्या पानांना पर्णवृंत नसतात त्यांना ‘अवृंत’ पाने म्हणतात. पर्णदलाला भरपूर प्रकाश मिळेल, अशी रचना करणे हे पर्णवृंताचे कार्य असते.

पर्णदल : पर्णदल हिरवे, चपटे व पसरट असून त्याच्या तळापासून टोकाकडे एक किंवा अधिक व कठीण मुख्यशीर निघालेली असते. या शिरेपासून अनेक उपशिरा निघून त्या पर्णदलाच्या कडांकडे पसरलेल्या असतात. पर्णदलाचे तळ, कडा, टोक व पाते असे भाग असतात. तळ निमुळता व सरळ असून त्याच्या मध्यावर पर्णवृंत जुळलेला असतो. काही पानांच्या पर्णदलांचा तळ खोडाला वेढलेला असतो. असे पर्णदल खोडाभोवती अर्धे किंवा पूर्ण आवरण करतात; उदा., मका, गहू इत्यादींच्या पर्णदलाची कडा बहुधा सरळ व एकसंध असते. मात्र अशोक वृक्षाच्या पानांची कडा नागमोडी, तर जास्वंदीच्या पानांची कडा करवतीसारखी दंतूर असते. घायपाताच्या पर्णदलाची कडा कठीण व काटेरी, तर पानफुटीच्या पर्णदलाची कडा गोलाकार असते. त्यातील बेचक्यांमध्ये मुकुल म्हणजे डोळे असतात. बहुतेक सर्व वनस्पतींच्या पर्णदलांच्या दोन्ही कडा टोकाला एकत्र येतात. काही पानांमध्ये या कडांमध्ये लघुकोन, तर काहींमध्ये विशालकोन दिसून येतो. उदा., जास्वंद, वड व पिंपळ यांच्या पानांची टोके लांब ओढलेली, तर कांचन व आपटा यांच्या पानांची टोके आत दबलेली असतात. पाते बहुधा गुळगुळीत, चमकदार व मेणाने आच्छादलेले किंवा रोमल (लवदार) असते. प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे अन्न तयार करणे, बाष्पोत्सर्जन करणे आणि अन्न व पाणी साठविणे ही पर्णदलाची कार्ये असतात.

सूचिपर्णी वनस्पतीमध्ये पानांचा आकार लांब, अरुंद व सुईसारखा असतो. कांदा, लसूण आणि गवत यांच्या पानांचा आकार चपटा, लांब, अरुंद व पात्यासारखा असतो. कण्हेरीची पाने भाल्यासारखी, करंजाची लंबवर्तुळाकार, जास्वंदीची अंडाकृती, तर बदामाची उलट-अंडाकृती असतात. केळीची पर्णदले लांबट व दोन्ही कडा समांतर असून तळाकडे व टोकाकडे अर्धगोलाकार असतात. मिरी व नागवेल यांची पर्णदले हृदयाकृती, कमळाची वर्तुळाकार, ब्राह्मीची वृक्काकार आणि गारवेलीची हाताच्या पंजासारखी असतात. धोतऱ्याच्या पर्णदलाच्या दोन्ही कडा तळाशी एकत्र न येता थोड्याशा फरकाने मुख्यशिरेशी जोडलेल्या असतात. त्यामुळे पर्णदलाचे दोन असमान भाग होतात, त्याला ‘तिर्यक’ म्हणतात. ड्रॉसेराचे पर्णदल चमच्याप्रमाणे असते. काही पाणवनस्पतींची पर्णदले बाणाकृती असतात; उदा., सॅजिटेरिया.

पानांचा शिराविन्यास

पानांचा शिराविन्यास : पानांना आधार देण्यासाठी व प्रकाशग्रहण करण्यासाठी पर्णदल पसरट असते. त्यामध्ये एक किंवा अधिक मुख्यशिरा व उपशिरा असून त्यांच्यामार्फत पाणी व अकार्बनी क्षार पानांपर्यंत पोहोचविले जातात, तर पानांद्वारे तयार झालेले अन्नघटक साठवण अवयवांपर्यंत नेले जातात. पानांमध्ये असलेली मुख्यशीर आणि उपशिरा यांच्या रचनेला ‘शिराविन्यास’ म्हणतात. त्याचे दोन प्रकार केले जातात : (१) जाळीदार शिराविन्यास व (२) समांतर शिराविन्यास.

जाळीदार शिराविन्यास : या प्रकारात एक, तीन किंवा पाच अशा मुख्यशिरा आणि त्यांपासून निघालेल्या उपशिरांचे जाळे तयार होते. हा प्रकार द्विदलिकित वनस्पतींमध्ये आढळतो. यातील मुख्यशिरांची रचना व संख्येनुसार पुढील उपप्रकार आहेत. (अ) एकप्रशिरी : यात पर्णदलामध्ये एक मुख्यशीर असते. तिच्यापासून उपशिरांच्या शाखा निघतात आणि त्यांच्या शाखांची जाळी तयार होते. उदा., पिंपळ, जास्वंद इ. (आ) बहुप्रशिरी  : यात पर्णदलांमध्ये तीन किंवा अधिक मुख्यशिरा असून त्यांच्या उपशिरांचे व शाखांचे जाळे तयार होते. याचे दोन उपप्रकार आहेत : (१) अभिसारी : यात मुख्यशिरा पर्णदलाच्या तळापासून निघून पुढे दूर जात टोकाकडे एकत्र येतात. उदा., बोर, तमालपत्र इ. (२) अपसारी : यात एका ठिकाणाहून उगम पावलेल्या मुख्यशिरा पर्णदलाच्या कडांकडे एकमेकांपासून दूर गेलेल्या असतात. उदा., पपई, कापूस इ.

पानांचे प्रकार

समांतर शिराविन्यास : या प्रकारात मुख्यशिरा आणि उपशिरा जाळे तयार न करता एकमेकांना समांतर राहतात. हा प्रकार एकदलिकित वनस्पतींमध्ये आढळतो. उदा., ज्वारी, मका, गवत इ. यातील मुख्यशिरांच्या संख्येवरून दोन उपप्रकार होतात. (अ) एकप्रशिरी : यात एक मुख्यशीर तळापासून निघून टोकाकडे जाते. तिच्या उपशिरा व शाखा एकमेकांना समांतर असतात. उदा., कर्दळ, हळद इ. (आ) बहुप्रशिरी : यात एकापेक्षा अधिक मुख्यशिरा असून त्यांच्या उपशिरा समांतर असतात. याचे दोन उपप्रकार आहेत : (१) अभिसारी : सर्व मुख्यशिरा पर्णदलाच्या तळातून एका ठिकाणातून निघून पुढे टोकाकडे एकत्र येतात. उदा., बांबू. (२) अपसारी : सर्व मुख्यशिरा एका ठिकाणातून निघून पर्णदलात एकमेकांपासून दूर जातात. उदा., ताड, पंखामाड इ.

पानांचे प्रकार : पानांचे दोन मुख्य प्रकार आहेत. (१) साधी पाने : या पानांमध्ये पर्णदल एकच असून पानांची कडा अखंड असते; उदा., जास्वंद, आंबा, पेरू. (२) संयुक्त पाने : या पानांमध्ये पर्णदल खंडित असून त्याची कडा मुख्यशिरेपर्यंत पोहोचून पर्णिका तयार होतात; उदा., गुलमोहर, बाभूळ. संयुक्त पानांचे मुख्यशिरेवरील (प्राक्ष) पर्णिकांच्या रचनेनुसार पिच्छाकृती व हस्ताकृती असे दोन प्रकार केले जातात.

पिच्छाकृती संयुक्त पानांचे प्रकार

पिच्छाकृती संयुक्त पान : या पानांमध्ये मुख्य प्राक्ष एकच असून त्यावर दोन्ही बाजूंनी पर्णिका असतात. त्यामुळे पानाला पिसाप्रमाणे आकार येतो. पिच्छाकृती पानांचे पुढील उपप्रकार आहेत : (१) एकपिच्छक : या प्रकारात एकच प्राक्ष असून त्याच्या दोन्ही बाजूंना पर्णिका असतात. त्याचे दोन प्रकार आहेत. (अ) असमपिच्छक : या प्रकारात पर्णिकांची संख्या विषम असते. त्यामुळे प्राक्षाच्या टोकाला एकच पर्णिका असते; उदा., कडूलिंब. (आ) समपिच्छक : या प्रकारात पर्णिकांची संख्या सम असते. त्यामुळे प्राक्षाच्या टोकाला पर्णिकांची जोडी असते; उदा., शिरीष. (२) द्विपिच्छक : या प्रकारात प्रथम प्राक्षाच्या दोन शाखा असून त्यावर पर्णिका असतात; उदा., बाभूळ, लाजाळू. (३) त्रिपिच्छक : या प्रकारात प्रथम प्राक्षाच्या शाखांना पुन्हा असलेल्या शाखांवर पर्णिका असतात; उदा., शेवगा. (४) विसंयुक्त : या प्रकारात पिच्छाकृती पान त्रिपिच्छकाहून अधिक खंडित असते; उदा., कोथिंबीर, बडिशेप, जिरे, गाजर.

हस्ताकृती संयुक्त पानांचे प्रकार

हस्ताकृती संयुक्त पान : संयुक्त पानाच्या या प्रकारात पर्णिका मुख्य प्राक्षाच्या टोकावर असतात. पर्णिकांच्या संख्येवरून त्याचे पुढील उपप्रकार केले आहेत. (१) एकपर्णकी : या प्रकारात मुख्य प्राक्षाच्या टोकावर एकच पर्णिका असते; उदा., लिंबू, पपनस. (२) द्विपर्णिकी : या प्रकारात प्राक्षाच्या टोकाला दोन पर्णिका असतात; उदा., रेग्नेलिडियम (नेच्याचा एक प्रकार). (३) त्रिपर्णिकी : या प्रकारात प्राक्षाच्या टोकावर तीन पर्णिका असतात; उदा., बेल, वायवर्णा. (४) चतु:पर्णिकी : या प्रकारात प्राक्षाच्या टोकावर चार पर्णिका असतात; उदा., मार्सेलिया (नेच्याचा एक प्रकार). (५) बहुपर्णिकी (किंवा अंगुल्याकार) : या प्रकारात प्राक्षाच्या टोकावर चारपेक्षा अधिक म्हणजे ५, ७ किंवा ९ पर्णिका एकाच ठिकाणी असतात. त्यामुळे हाताची बोटे फाकल्यासारखा आकार दिसतो; उदा., शाल्मली.

पानांचे आयुष्य :  खोडावर पाने किती काळ टिकतात, त्यानुसार त्याचे वर्णन करतात. (१) पर्णपाती : ही पाने कमी काळ व केवळ एका ऋतूपर्यंत असतात. बहुधा हिवाळ्यात ती गळतात. (२) पानझडी: या प्रकारात पाने वर्षभर असतात. दरवर्षी मार्च–मे महिन्यांत नवीन पालवी येते. (३) सदाहरित : या प्रकारात पाने एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहतात.

पानांच्या कडा आणि आकार

पानांचे आकारमान : पानांच्या आकारमानात विविधता आढळते. उदा., लेम्ना या पाणवनस्पतीचे पान सर्वांत लहान व ३–५ मिमी. लांब, तर वाळवंटात आढळणाऱ्या वेलवेट्‌शिया या वनस्पतीचे पट्‌ट्यासारखे पान २ मी. लांब व ७-८ सेंमी. रुंद असते. व्हिक्टोरिया लिली या वनस्पतीचे पान थाळीसारखे व १-१·५ मी. व्यासाचे असते. रॅफिया नावाच्या एकदलिकित वनस्पतीचे पिच्छाकृती पान २ मी. लांब व ३ मी. रुंद असते.

पानांचे रूपांतरण : उत्क्रांती होत असताना पानांमध्येही अनुकूलन घडून आले आहे. प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे अन्न तयार करणे हे पानांचे मुख्य कार्य असते. मात्र गरजेनुसार पाने इतरही कार्ये करतात. (अ) तणावे : पान किंवा त्याच्या भागाचे बारीक, लांब, तारेसारख्या व दोरीसारख्या तणावांमध्ये रूपांतरण होते. हे तणावे आधाराभोवती स्वत:ला गुंडाळून घेऊन वेलींना आधारावर चढायला मदत करतात. उदा., वाटाणा, बचनाग, मोरवेल. (आ) शूल : चरणाऱ्या जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी आणि बाष्पोत्सर्जन कमी करून पाणी साठवून ठेवण्यासाठी पानांचे कठीण व टोकदार शूलामध्ये रूपांतर झालेले असते. उदा., बाभूळ, निवडुंग, बिग्नोनिया, घायपात. (इ) शल्क : पातळ, पडद्यासारखी व रंगहीन पाने बहुधा जमिनीखालच्या भागावर असतात. मुकुलांचे रक्षण करणे हे त्यांचे कार्य असते. उदा., आले, हळदीचे खोड, केळीचा कंद यांवरील शल्कपर्णे. कांदा व लसूण या वनस्पतींमध्ये अन्न साठविण्याचे कार्य पाने करतात. (ई) पर्णाभवृंत : या प्रकारात पानाचा देठ चपटा, पातळ, पसरट, हिरवा व पर्णदलासारखा असतो. अन्न तयार करणे व बाष्पोत्सर्जन कमी करणे यांसाठी हे रूपांतरण झालेले असते. उदा., ऑस्ट्रेलियन बाभूळ. (उ) घटपर्णी : या कीटकभक्षी वनस्पतीमध्ये कीटकांना आकर्षित करून पकडण्यासाठी पानांचे रूपांतरण घटात (सापळ्यात) झालेले असते. उदा., घटपर्णी, ड्रॉसेरा, माशीचा सापळा.

 

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा