जलसंस्करण (शुद्धीकरण) प्रक्रियेत पाण्याचे गाळण करण्यापूर्वी त्या पाण्यातील घनद्रव्ये बाहेर काढण्याची क्रिया. अवसादनात द्रव व सूक्ष्म घन पदार्थ यांच्या मिश्रणातील घन पदार्थ वेगळे केले जातात. अपशिष्ट जल व घन पदार्थांमुळे पाणी दूषित झालेले असते. असे पाणी तलाव, टाकी, डबके इत्यादींत सोडले जाते. पाणी पुरेसा वेळ स्थिरावले की त्यात तरंगणारी घन अपशिष्टे खाली जाऊन जलाशयाच्या तळावर साठत जातात. अवसादन प्रक्रिया स्थिरीकरण कक्षात (सेटलिंग चेंबर) केली जाते. वाहितमल अथवा इतर अपशिष्ट जल यांतील घन पदार्थ काढून टाकण्यासाठी एखाद्या टाकीतही असे पाणी साठविले जाते.
सामान्यपणे अवसादन क्रिया पुढील कारणांसाठी केली जाते: (१) दूषित पाण्यापासून स्वच्छ पाणी मिळविणे. (२) दूषित अथवा गढूळ पाण्यातील शक्य तितका द्रव भाग काढून चिखलासारखा भाग उपलब्ध करणे. (३) गढूळ अथवा दूषित पाण्यातील वेगवेगळ्या आकारमानाचे किंवा घनतेचे कण अलग करणे.
अवसादन क्रियेचा विविध उद्योगांत उपयोग केला जातो. या क्रियेनुसार नैसर्गिक गढूळ पाणी स्वच्छ करून शहरातील लोकांना व उद्योगांना त्याचा पुरवठा केला जातो. विविध कारखान्यांत एकदा वापरलेले पाणी स्वच्छ करून त्याचा पुनर्वापर केला जातो. सांडपाण्याचासुद्धा अवसादन क्रियेनंतर पुनर्वापर केला जाऊ शकतो.
पाणी हे अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे. जलसंसाधनात गोड्या पाण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. त्यामुळे वापरलेले पाणी पुन्हा वापरात आणून जलसंसाधनाचे संधारण करणे अत्यावश्यक बनले आहे. दूषित आणि अपशिष्ट जलाचा पुनर्वापर व्हावा यासाठी जलसंस्करण करणे गरजेचे आहे. जलसंस्करणापूर्वी अवसादन क्रिया महत्त्वाची ठरते. या प्रक्रियेमुळे गोड्या पाण्याच्या मागणीवरील ताण कमी होण्यास मदत होते.
भारतातील अनेक शहरांत अवसादन प्रक्रिया प्रकल्प आहेत. अहमदाबाद येथे मोठा अपशिष्ट जलाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमार्फत पाणी पुरविण्यासाठी अवसादन क्रियेचा वापर केला जातो.