गुजरातमधील जुनागढ येथील प्राचीन शिलालेख. ‘गिरनार प्रस्तर लेखʼ म्हणूनही प्रसिद्ध. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोक याचा लेख असलेल्या शिळेच्या शिरोभागी कार्दमक महाक्षत्रप रुद्रदामन याचा लेख कोरलेला आहे. याच शिळेवर गुप्त सम्राट स्कंदगुप्त याचाही लेख कोरलेला आहे. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ जेम्स प्रिन्सेप (१७९९–१८४०) यांनी या लेखाचे सर्वप्रथम वाचन केले. त्यानंतर भाऊ दाजी लाड, भगवानलाल इंद्रजी, ब्यूहलर, फ्लिट आणि कीलहॉर्न अशा मान्यवर अभ्यासकांनी या लेखाचे पुनर्वाचन केले.
पहिला रुद्रदामन हा कार्दमक घराण्यातील चष्टन याचा नातू आणि जयदामन याचा पुत्र होता. प्रस्तुत प्रशस्ति लेख आलंकारिक संस्कृत गद्यात असून तो इसवी सनाच्या दुसर्या शतकात प्रचलित असलेल्या ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला आहे. तत्कालीन साहित्यशास्त्राच्या प्रगतीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. शक क्षत्रप राजांच्या लेखांत ‘शकʼ कालगणनेचा वापर केलेला असतो. सुस्पष्ट कालोल्लेख असलेला हा प्राचीन भारतातील पहिला अभिजात संस्कृतातील कोरीव लेख आहे.
सुदर्शन तलावाचा सुमारे साडेतीनशे वर्षांचा इतिहास आणि त्याच्या दुरुस्तीची नोंद हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे. इ. स. पू. चौथ्या शतकात चंद्रगुप्त मौर्य याचा राष्ट्रीय वैश्य (प्रांताधिपती) पुष्यगुप्त याने हा तलाव बांधला. सम्राट अशोक याच्या कारकिर्दीत यवनराजा तुषास्फ याने त्याला मोर्या बांधून तो पक्का केला. मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा, शक वर्ष ७२ रोजी अतिवृष्टीमुळे उर्जयत पर्वतातून उगम पावलेल्या सुवर्णसिकता आणि पलाशिनी या नद्यांचे प्रवाह भयंकर वेगाने वाहू लागले. यामुळे सुदर्शन तलावास चारशे वीस हात लांब आणि रुंद व पंचाहत्तर हात खोल खिंडार पडले. त्यातून पाणी वाहून गेल्याने सुदर्शन तलाव दुर्दर्शनीय झाला होता. शक वर्ष ७२ हे गत वर्ष धरल्यास हा दिवस १८ ऑक्टोबर इ. स. १५० हा येतो.
तलावाची दुरुस्ती अतिशय खर्चिक असल्याने रुद्रदामनाच्या मंत्र्यांनी त्याला विरोध केला. मात्र जनकल्याणासाठी या कामाकरिता राजाने पहलव कुळातील कुलैप याचा पुत्र सुविशाख याची नेमणूक केली. याने तलावाची पहिल्यापेक्षा तिप्पट भक्कम पुनर्बांधणी केली. या लेखात सुविशाख याचा सामर्थ्यवान, गर्वरहित, प्रामाणिक अशा विशेषणांनी गौरव केला आहे. या डागडुजीचा खर्च रुद्रदामन याने जनतेला वेठीस न धरता स्वत:च्या खजिन्यातून केला.
प्रस्तुत लेखात रुद्रदामन याचा राज्यविस्तार आणि गुणविशेष यांचे वर्णन केले आहे. रुद्रदामनाने पूर्व आणि पश्चिम आकरावंती, अनुपदेश, आनर्त, सौराष्ट्र, मरु, कच्छ, सिंधु, सौविर, कुकुर, अपरांत, निषाद इत्यादी देश स्वपराक्रमाने जिंकून घेतले. लढाईखेरीज मनुष्यहत्या न करण्याचा त्याचा निग्रह होता. त्याला शरण आलेल्या शत्रूंना अभय दिले, राज्यभ्रष्ट राजांना त्यांचे राज्य पुन्हा मिळवून दिले. मात्र यौधेयांसारख्या मग्रूर आणि युद्धखोरांचा त्याने समूळ उच्छेद केला. शक आणि दक्षिणपथस्वामी सातवाहन यांचा जुना संघर्ष होता. गौतमीपुत्र सातकर्णि याने क्षहरातवंशी नहपानाच्या कुळाचा नाश केला. रुद्रदामन याने मात्र सातकर्णि याचा दोनदा पराभव केला असतानाही त्याच्याशी असलेल्या नातेसंबंधांमुळे त्याला अभय दिले. याबाबतचा खुलासा कान्हेरी येथील गुंफा क्र. ५ मधील एका खंडित ब्राह्मी शिलालेखात मिळतो. गौतमीपुत्र सातकर्णि याचा पुत्र वासिष्ठीपुत्र सातकर्णि याचा विवाह रुद्रदामन याच्या मुलीशी झाला होता. खंडित लेखामुळे या राजकन्येचे नाव समजू शकत नाही.
रुद्रदामनाचे रूप आणि गुण यांविषयीदेखील प्रस्तुत लेखात भाष्य केले आहे. प्रमाणबद्ध देहयष्टी, चालण्याची ढब, उत्तम स्वर आदी गुणांनी तो युक्त होता. अश्व, हत्ती आणि रथ यांचे प्रचलन तसेच तलवार, गदा व द्वंद्व युद्धांत तो निपुण होता. त्याने व्याकरणशास्त्र, न्यायशास्त्र, अर्थविद्या, संगीत यांचे उत्तम अध्ययन केले आहे. तसेच उत्तम गद्य आणि पद्य रचना केल्या होत्या. स्वबळावर त्याने ‘महाक्षत्रपʼ ही पदवी मिळवली होती. अनेक राजकन्यांनी त्याला स्वयंवरात वरले होते.
या लेखात त्याच्या प्रजाभिमुख राज्यकारभाराविषयी माहिती दिली आहे. गावे, व्यापारी शहरे आणि खेडी येथे राहणारी त्याची प्रजा ही चोर, सर्प, हिंस्र प्राणी तसेच रोगराई यांपासून भयमुक्त होती. अशा प्रजाहितदक्ष रुद्रदामनाने योग्य मार्गाने कर, राजाचे हक्क आणि नजराणे या मार्गाने सोने, चांदी, मौल्यवान रत्ने यांनी आपला कोश समृद्ध केला होता. याच कोशातून त्याने गोब्राह्मणांचा प्रतिपाळ आणि स्वत:चे पुण्य व कीर्ती यांची अभिवृद्धी याकरिता सुदर्शन तलावाच्या डागडुजीचा खर्च केला होता.
संदर्भ :
- Kielhorn, F. ‘Junagadh Rock Inscription of Rudradamanʼ, Epigraphia Indica, Vol., VIII, pp. 36-49, 1906.
- Gokhale, Shobhana, Kanheri Inscriptions, Pune, 1982.
- गोखले, शोभना, पुराभिलेखविद्या, पुणे, २००७.
- मिराशी, वा. वि., ‘जुनागड येथील रुद्रदामनचा लेख : वर्ष ७२ʼ, सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.
समीक्षक – मंजिरी भालेराव