पायपरेसी कुलातील एक सपुष्प वेल. पिंपळीचे शास्त्रीय नाव पायपर लाँगम आहे. काळी मिरीदेखील याच कुलातील आहे.  पिंपळीची लागवड तिच्या फळांसाठी केली जाते. ती मूळची श्रीलंका व फिलिपीन्स बेटे येथील असून भारत, नेपाळ, श्रीलंका इत्यादी देशांतही आढळते. भारतात तमिळनाडू, आसाम, पश्च‍िम बंगाल, महाराष्ट्र व मेघालय या राज्यांत तिची लागवड केली जाते.

पिंपळी (पायपर लाँगम) : (१) कोवळी फळे, (२) पाने आणि फुलोरा असलेली फांदी, (३) वाळलेली फळे.

पिंपळी ही बहुवर्षायू वेल मुळांच्या आधाराने वर चढते. पाने साधी व एकाआड एक असतात. जुनी पाने हिरवी, दंतुर आणि हृदयाकृती असतात. कोवळी पाने अंडाकार व लांब असून त्यांवर पाच शिरा असतात. फुले कणिश फुलोऱ्यात येतात; ती एकलिंगी असून नर-फुले आणि मादी-फुले वेगवेगळ्या फांद्यांवर येतात. नर-फुलांचे देठ मादी-फुलांहून लांब असतात. फळे काळपट हिरवी, चमकदार व मांसल फुलोऱ्यात असतात. ती पिकल्यावर लाल होतात आणि सुकल्यावर धुरकट काळी होतात. फळे सुगंधी व तिखटगोड असतात. फळांमध्ये पायपरलाँग्युमीन नावाचे मुख्य अल्कलॉइड असते. त्यामुळे या फळांना एक विशिष्ट सुगंध येतो.

पिंपळीचे मूळ, फळ व खोड उपयुक्त आहेत. कफ, दमा, वात, खोकला, ताप, मूळव्याध, कावीळ आणि कुष्ठरोग या विकारांवर हे भाग उपयुक्त आहेत. लहान मुलांना कफ, वात व खोकला होऊ नये म्हणून त्यांना दिल्या जाणाऱ्या गुटीत पिंपळीच्या फळांचा समावेश करतात. फळे सामान्यपणे सुकवितात आणि ती मसाल्यात तसेच पदार्थ टिकविण्यासाठी वापरतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा