भूभागाचे वैशिष्ट्य : ज्या भूभागात एक किंवा अधिक नद्या, कालवे, पाणीपुरवठ्यासाठी किंवा संरक्षणासाठी खोदलेले पाटबंधारे, त्यांच्या दोन्ही बाजूंस असलेले बांध, शत्रूच्या आगेकूचीस अटकाव करण्यासाठी डावपेची दृष्टिकोनातून योग्य ठिकाणी खोदलेले लांब चर आणि त्याच्या दोन्ही बाजूंस मातीचे बांध (ज्याला Ditch Cum Bund : DCB अशी संज्ञा आहे), या आणि अशा प्रकारचे सैनिकी कारवायांच्या गतिमानतेत व्यत्यय आणणारे नैसर्गिक वा बनवलेले (Man Made किंवा Artificial) अडथळे अस्तित्वात असतात, तो भूप्रदेश ‘नदीमय प्रदेश’ (Riverine Terrain) या वर्गवारीखाली पडतो. अशा भूप्रदेशातील सैनिकी कारवायांची चर्चा या नोंदीत केली आहे.

या भूभागातील जमीन शेतीप्रधान, झाडाझुडपांनी समृद्ध किंवा कालव्यांमुळे सुपीक झालेली अर्ध-वाळवंटी असते. नदीतीराजवळील जमीन मुलायम किंवा दलदलीची असू शकते. हे अडथळे पार करण्यासाठी पूल किंवा पाणी ओलांडण्याच्या जागा मर्यादित असतात. मोठी धरणे आणि पाण्याच्या प्रवाहाचे नियंत्रण करण्यासाठी ‘हेडवर्क्स’ बांधली जातात. त्यामुळे या जागांचा ताबा सैनिकी कारवायांच्या दृष्टीने अनिवार्य आणि अटीतटीचा ठरतो. पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या अशा निसर्गसमृद्ध प्रदेशात घनदाट मानवी वस्ती, कारखाने आणि दळणवळणाच्या सोयी उपलब्ध असतात. त्यांचे संरक्षण महत्त्वाचे ठरते. सीमासंरक्षणासाठी सीमेच्या सान्निध्यात असलेल्या अशा नैसर्गिक किंवा बनवलेल्या अडथळ्यांवर संरक्षणफळी उभारून शत्रूचे आक्रमण परतवण्यात येते. तसेच आक्रमक कारवायांदरम्यान शत्रूने अशा अडथळ्यांच्या साहाय्याने उभारलेली संरक्षणफळी भेदून शत्रुप्रदेश जिंकला जातो.

सैनिकी कारवायांसमोरील आव्हाने : अशा भूभागात जलतीरावर पोहोचण्याचे मार्ग मर्यादित असल्यामुळे सैनिकी कारवायांवर विविध प्रतिबंध येतात. जर अधिक मार्ग तयार करण्याची आवश्यकता भासली, तर त्यासाठी संसाधने आणि वेळ लागणार. त्यामुळे शत्रूला पूर्वसूचना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूल किंवा जलाशय ओलांडण्याच्या जागांना अवास्तव डावपेची महत्त्व प्राप्त होते. कारवाईबद्दल विस्मय आणि शाठ्य (Surprise and Deception) राखणे अवघड होऊन जाते. नदी, कालवा किंवा बनवलेला अडथळा पार करण्यासाठी विशेष साधनांची आवश्यकता पडते आणि तो पार करताना शत्रू परिणामकारक अडसर घालू शकतो. या अडथळ्यावरील शत्रूच्या मोर्च्यांचा ताबा घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार सैनिकी पूल (Military Bridges) बांधणे भाग पडते. लांबलचक नदीच्या किंवा मातीच्या बांधाच्या सान्निध्यात खोदलेल्या शत्रूच्या मोर्च्यांवर तोफांचा अचूक भडिमार करण्यात अनेक अडचणी येतात. अर्ध-वाळवंटी प्रदेशात हालचाल अत्यंत मंद आणि कष्टदायक होते.

भारताच्या सीमेवरील नदीमय प्रदेश : भारताच्या सीमाप्रदेशात भारतीय सैन्याच्या मोर्चेबंदीस उपयुक्त असे विविध प्रकारचे नैसर्गिक आणि बनवलेले अडथळे अस्तित्वात आहेत. त्यात नद्या, कालवे, संरक्षणफळी उभारण्यासाठी बनवलेले मातीचे बांध (डीसीबी) वगैरेंचा समावेश आहे. भारताच्या उत्तर आणि पश्चिम विभागांत सिंधू (Indus), झेलम, चिनाब, रावी आणि सतलज या पाच नद्या आहेत. सतलज नदीच्या दक्षिणेस पाकिस्तानातील फोर्ट अब्बासपर्यंतचा प्रदेश अर्ध-वाळवंटी आहे. त्यात बांधलेल्या इंदिरा गांधी कालव्याच्या (IGC) पाण्यामुळे हा परिसर सुजल-सुफल झाला आहे. उत्तर आणि पश्चिम सीमाभागांतील या नद्या आणि ‘आयजीसी’बरोबर अनेक छोटे-मोठे कालवे, अनेक ‘हेडवर्क्स’, विविध ‘डीसीबी’ प्रणाली, पुराचे नियंत्रण करण्यासाठी बांधलेले पंजाबातील ‘धुसी’सारखे बांध वगैरे अनेक अडथळ्यांचे जाळे पसरले आहे. संरक्षक सैनिकी कारवायांच्या दृष्टीने ते सर्व उपयुक्त आहेत.

संरक्षणात्मक कारवाया (Defensive Operations) : सीमासंरक्षणाच्या दृष्टीने या लांबलचक सीमेवर अखंडित आणि अभेद्य संरक्षणफळी उभारणे हे कठीणच नव्हे, तर अशक्य आहे. त्यामुळे आघाडीवर तैनात केलेल्या प्रत्येक इन्फन्ट्री बटालियनच्या दर्शनी भागाचा (Frontage) विस्तार नेहमीपेक्षा अधिक असणे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर दोन बटालियनमधील किंवा दोन कंपन्यांमधील मोकळे अंतर (Gaps) अधिक असणे, हेही अपरिहार्य असते. या मोकळ्या जागांमधून शत्रू घुसू शकणार नाही यासाठी डावपेची उपाय करणे आवश्यक होऊन जाते. परिसरातील पूल, शहरे/गावे, महत्त्वाचे रस्ते वगैरेंना संरक्षण पुरवण्याची जबाबदारी हा मोर्चेबंदीचा एक भाग आहे. बटालियनच्या दर्शनी भागावर २४x७ पाळत ठेऊन गस्त घालणे, हेही महत्त्वाचे आहे. अडथळ्याला आणखी बळकटी आणण्यासाठी त्याच्या पुढे भूसुरुंग क्षेत्र (Minefield) पेरले जाते. मोर्चेबंदी भेदून जर शत्रूच्या आघाडीच्या तुकड्या यशस्वी झाल्या, तर त्यांच्यावर प्रतिप्रहार (Counter Attack) करून शत्रूला परतवून लावण्यासाठी बटालियन आणि ब्रिगेडच्या पातळीवर राखीव तुकड्या (Reserves) मागच्या बाजूस सज्ज असणेही जरूरी आहे. अडथळ्याच्या पुढील बाजूस (Far Bank) तैनात असलेल्या तुकड्या गतिमानशील (Mobile) असल्या पाहिजेत. शत्रूच्या आगमनाची वर्दी दिल्यानंतर आणि अपेक्षेनुसार त्याच्या कारवाईत विलंब घडवून आणल्यानंतर या तुकड्या परत येऊन पिछाडीच्या मोर्चेबंदीत सहभागी होतात. शत्रू जेव्हा अशा संरक्षणफळीवर हल्ला चढवत असेल, तेव्हा तो संरक्षणफळीच्या पिछाडीच्या क्षेत्रात (Depth Aera) छत्रीधारी तुकड्या किंवा हेलिकॉप्टरद्वारा तुकड्या उतरवून मागून प्रहार करू शकतो. यासाठी पिछाडीचे क्षेत्र आणि दळणवळणाच्या केंद्राचे संरक्षण करण्यासाठी तेथेही मोर्चेबंदी करणे आवश्यक होते. अशा प्रकारे नदीमय प्रदेशात संरक्षण फळी उभारण्यासाठी अवाजवी सैन्याची आवश्यकता पडते.

आक्रमणात्मक कारवाया (Offensive Operations) : नैसर्गिक आणि बनवलेल्या अडथळ्यांची प्रणाली अस्तित्वात असलेल्या क्षेत्रात शत्रूने उभारलेल्या संरक्षणफळ्या भेदून त्याच्या मोर्चांवर ताबा मिळवणे, हे अत्यंत कष्टप्रद काम आहे. हल्ला कोणत्या ठिकाणी आणि किती संख्येत होणार आहे, याबद्दल गुप्तता राखणे अवघड असते. संरक्षणफळीपुढील गतिमानशील तुकड्यांवर मात करून आणि सुरुंगक्षेत्र पार करून शत्रूच्या मुख्य संरक्षण रेषेपर्यंत (Main Defence Line) प्रथम पोहोचावे लागते. त्यानंतर अडथळा पार करून शत्रूच्या मोर्च्यांवर हल्ला चढवला जातो. त्यापश्चात शत्रूचा प्रतिहल्ला परतवून त्याच्या पिछाडीच्या मोर्च्यांशी (Depth Localities) लढून त्या संरक्षणफळ्या निकाम्या केल्या जातात. यासाठी शत्रूच्या जवळजवळ तिप्पट सैन्यबळाची आवश्यकता पडते. हल्ला चढवताना आपल्या तोफखान्याचा वाजवी प्रमाणात आणि अचूक तोफमारा होणे आवश्यक असते. त्याबरोबर पेरलेल्या सुरुंगांना निकामी करण्यासाठी अभियंता तुकड्यांची गरज पडते. हल्ला होताना आपल्या वायुदलाच्या लढाऊ विमानांचा तोफमारा आणि गोळीबारही फायदेशीर ठरतो. छत्रीधारी किंवा हेलिकॉप्टर्समधून उतरलेल्या सैनिकांचा पिछाडीच्या भागांतील हल्ला परिणामकारक ठरतो.

रसदपुरवठातंत्र (Logistics) : नदीमय क्षेत्रातील संरक्षक किंवा आक्रमक कारवायांसाठी प्रबळ आणि पद्धतपूर्ण पुरवठाप्रणालीच्या पाठबळाची नितांत आवश्यकता आहे. खाद्यपदार्थ, पाणी, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्याचे पुरेसे साठे करणे अपरिहार्य ठरते. मालवाहू वाहने पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असावी लागतात. थोडक्यात, सक्षम रसदपुरवठातंत्राचे प्राबल्य हा महत्त्वाचा घटक ठरू शकतो.

विस्मय आणि शाठ्य (Surprise and Deception) : संरक्षणफळीच्या मोर्चांमध्ये बसलेल्या सैनिकांना दूर अंतरापर्यंत शत्रूच्या हालचालींचा माग लागणे साहजिक असते. त्यामुळे हल्ल्याची माहिती शत्रूपासून लपवून ठेवण्यासाठी, किंबहुना अनेक दिशांनी खरे व खोटे हल्ले चढवून शत्रूची दिशाभूल करण्यासाठी बुद्धिमान आणि अनाकलनीय डावपेच अंतर्भूत केले जातात. सर्व हालचाली आणि प्रत्यक्ष हल्ला रात्रीच्या वेळी केला जातो. याचा दोन्ही बाजूंना समप्रमाणात फायदा आणि तोटा होऊ शकतो.

नदीमय क्षेत्रातील काही संस्मरणीय लढाया : इतिहासातील अनेक प्रसिद्ध लढाया अशा भूभागात घडल्या आहेत. यूरोपमधील सीन, म्यूज, ऱ्हाईन, डॅन्यूब, नायपर आणि व्होल्गा या नद्या तसेच ब्रह्मदेशातील (म्यानमार) चिंद्विन, इरावदी आणि सलवीन या नद्यांच्या परिसरात दुसऱ्या महायुद्धातील काही घनघोर लढाया झाल्या. १९७३ मधील अरब-इझ्राएल, ‘योम किप्पुर’ युद्ध सुएझ कालव्याच्या क्षेत्रात घडले. २००१-०२ मधील इराक़-अमेरिका युद्ध युफ्रेटिस व टायग्रिस नदीप्रदेशांत झाले. १९४७, १९६५ आणि १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धांदरम्यान पंजाब आणि पूर्व पाकिस्तानच्या नदीमय प्रदेशांत अनेक अटीतटीच्या लढाया घडल्या.

संदर्भ :

  • Menon, Narayan, Recollections of the 1971 War, Issue Vol 24; Oct-Dec 2009.
  • Singh, Sukhwant, 1971 War : Battle of Shakargarh Bulge, 10 Oct 2017.
  • www.benning.army.mil/infantry/magazine/issues/2014/Jul-Sep/Grau.html
  • www.sify.com/news/
  • www.tcm.com/tcmdb/title/477600/Special-Ops-Operation-Desert-Storm/

                                                                                                                                                                     समीक्षक – शशिकांत पित्रे