कल्याण (ठाणे जिल्हा) येथील संगीताच्या प्रचार-प्रसार व संवर्धनार्थ कार्यरत असलेली एक नामवंत संस्था. तिची स्थापना दिनकर रघुनाथ तथा काकासाहेब बर्वे आणि त्यांच्या संगीतप्रेमी सहकाऱ्यांनी १० जुलै १९२६ रोजी देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ केली. संगीत शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच संगीताची अभिरुची वाढावी, या उद्देशाने तिची सुरुवात झाली. या क्षेत्रात गेली नऊ दशके ही संस्था अव्याहतपणे कार्यरत आहे.
संस्थेच्या मालकीच्या पहिल्या इमारतीची कोनशिला कल्याणचे प्रतिष्ठित नागरिक कृष्णराम हरिराम जोशी यांच्या हस्ते ६ डिसेंबर १९३६ रोजी बसविण्यात आली. अल्पावधीतच संस्थेची वास्तू पूर्ण झाली. संगीतप्रेमी मंडळींना श्रवणाबरोबरच शास्त्रशुद्ध संगीताच्या शिक्षणाची गरज भासू लागली, म्हणून कल्याण गायन समाज संस्थेने दिनकर संगीत विद्यालयाची स्थापना केली (२५ एप्रिल १९४४). सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विद्यालयात सुमारे ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी गायन, वादन आणि नृत्याचे शिक्षण घेतले.
संस्थेने जीर्ण झालेल्या जुन्या वास्तूच्या जागी अद्ययावत सोयींनी युक्त अशी नवीन वास्तू बांधण्यास २००९ मध्ये सुरुवात केली. ही वास्तू २०१२ मध्ये मूर्तरूपात आली. संस्थेने आपले कलात्मक कार्य विस्तारित करण्यासाठी २०१२ मध्ये ‘म्हैसकर कला अध्यासनाची’ सुरुवात केली, त्याद्वारे संगीतशास्त्रातील सखोल ज्ञान घेऊ इच्छिणाऱ्यासाठी नवीन दालन खुले झाले आहे. संगीताबरोबरच इतर कलांचा प्रसार व्हावा, हा देखील त्यामागे हेतू असून छायाचित्रण, रंगावली, हस्तकला, चित्रकला इत्यादी कलांचे या अध्यासनाद्वारे मार्गदर्शन केले जाते. शिवाय संगीत कलेशी संबंधित निरनिराळी शिबिरे, चर्चासत्रे असे तदनुषंगिक उपक्रम संस्थेत सतत चालू असतात.
संस्थेने व विद्यालयाने पंचवार्षिक उत्सव, रौप्य, सुवर्ण, हीरक व अमृत महोत्सव यानिमित्त संगीतविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. संस्थेचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा (८१ वर्षे) २००८ मध्ये साजरा झाला. २००२ पासून संस्थेतर्फे तीन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. देवगंधर्व भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ या संगीतोत्सवाचे नामाभिधान ‘देवगंधर्व महोत्सव’ असे करण्यात आले. गेली १७ वर्षे हा महोत्सव डिंसेंबरचा दुसरा शुक्रवार, शनिवार व रविवार यादिवशी साजरा करण्यात येतो. यावेळी देशविदेशातील शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकार गायन, वादन व नृत्य यांचे सादरीकरण करतात. संस्थेतर्फे दरवर्षी महोत्सवाच्या निमित्ताने गुरु-शिष्य परंपरा, साथ-संगत, संगीतातील प्रसिद्ध घराणी, ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या संस्थांची ओळख इत्यादी विषयांवर आधारित स्मरणिकांचे संपादन केले जाते. त्यातील काही उल्लेखनीय स्मरणिका संगीतातील गंधर्व, राग समयचक्र, संगीतमय विश्व या होत.
उपलब्ध माहितीनुसार आजपर्यंत संस्थेत सुमारे एक हजार मैफिली झालेल्या आहेत. संगीत अभ्यासक मु. रा. पारसनीस यांनी आपल्या जवळील बहुमूल्य पुस्तकांचा खजिना संस्थेस भेट दिला व त्यातून संस्थेच्या ग्रंथालयाची सुरुवात झाली. संगीतविषयक सु. ८०० पुस्तके ग्रंथालयात आहेत. यात काही दुर्मीळ ग्रंथांचाही समावेश आहे. संस्थेमध्ये १९८२ पासून झालेल्या विविध कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रणही संकलित केलेले आहे. संस्थेत निरनिराळ्या महोत्सवांसोबत व्याख्याने, संगीत नाटके, चर्चासत्रे, मुलाखती, संगीत स्पर्धा अशाही उपक्रमांचे आयोजन नियमित केले जाते.
संस्थेने संगीताच्या विद्यार्थ्यांकरिता व अभ्यासकांसाठी मार्गदर्शक म्हणून सृजन या नावाने पाच पुस्तकांचे प्रकाशन केलेले आहे. त्यांचे लेखन प्रभा अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आशा पारसनिस-जोशी यांनी केले आहे. त्यात त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आलेल्या बंदिशी लिहिलेल्या असून त्यांचे नोटेशनही (आलाप तानसहित) अंतर्भूत आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सदर पुस्तके उपयुक्त आहेत.
संदर्भ :
समीक्षक – सु. र. देशपांडे
#अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ#गायन समाज देवल क्लब#व्यास संगीत विद्यालय#शारदा संगीत विद्यालय#भारतीय संगीत आणि नर्तन शिक्षापीठ
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.