इंग्रजी भाषेत पॅरट, लोरिकीट आणि पॅराकीट अशी सामान्य नावे असलेल्या पक्ष्यांना मराठी भाषेत ‘पोपट’ म्हणतात. पक्षिवर्गाच्या सिटॅसिफॉर्मिस गणात (शुक गण) पोपटांचा समावेश केला जातो. या गणात सु. ७६ प्रजाती आणि ६७२ जाती आहेत. सिटॅसिफॉर्मिस गणात लोरिडी, कॅकॅट्युइडी आणि सिटॅसिडी ही कुले आहेत. लोरिडी कुलात कातरा (लोरिकीट) अथवा लहान पोपटांचा समावेश होतो. कॅकॅट्युइडी कुलात काकाकुवांचा समावेश होतो. सिटॅसिडी कुलात मोठे पोपट (पॅराकीट), लव्ह बर्ड, मॅकॉ इ. चा समावेश होतो. पोपट विविध रंगांचे व आकारमानांचे असतात. आकारमानावरून त्यांचे लहान पोपट (पॅरट, लोरिकीट) व मोठा पोपट (पॅराकीट) असे सामान्यपणे वर्गीकरण केले जाते.

लहान पोपट (लोरिक्युलस व्हर्‌नॅलिस)

भारतात आढळणाऱ्या लहान पोपटाचे शास्त्रीय नाव लोरिक्युलस व्हर्‌नॅलिस आहे. त्याला कातरा असेही म्हणतात. त्याची लांबी सु. १४ सेंमी. असून तो साधारणपणे चिमणीएवढा असतो. तो लहान झाडे, कळकांची वने, फळांच्या बागा आणि मळे यांत राहतो. शरीराचा रंग गवतासारखा हिरवा, तर पंख आणि शेपटी गडद हिरव्या रंगाची असते. शेपटी मोठ्या पोपटांच्या तुलनेत आखूड असल्यामुळे त्याला ‘लांडा पोपट’ असेही म्हणतात. तो वृक्षवासी असून दाट, हिरव्या पालवीच्या झाडांवर बसला तरी ओळखता येत नाही. झाडावरून उडाला तरच तो दिसतो. चोच लाल व वाकडी असते; डोळे पिवळसर पांढरे असून डोळ्यांभोवती पिवळे कडे असते. नराच्या गळ्याजवळ अथवा कंठावर निळा डाग असतो पण मादीच्या कंठावर नसतो; पाय पिवळसर किंवा फिकट नारिंगी ते लाल असतात.

लहान पोपट एकटा अथवा लहानशा थव्याने वावरतो. वड, पिंपळ आणि इतर झाडांची फळे, फुलातील पुंकेसर, पांगाऱ्याच्या फुलातील मकरंद इत्यादी तो खातो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे फांदीला उलटे लटकून तो फळे खाताना दिसतो. ताडाच्या झाडाला टांगलेल्या मडक्यातील ताडी पितो. झाडावरून हिंडत असताना अथवा हवेत उडत असताना ‘चीचीचीSSS’ अथवा ‘चीचूचूSSS’ असा आवाज काढतो. वटवाघळाप्रमाणे झाडाच्या फांदीला पायांनी उलटे टांगून घेऊन तो रात्री झोप काढतो.

लहान पोपट (लोरिक्युलस बेरीलिनस)

त्यांचा प्रजनन काळ जानेवारीपासून एप्रिलपर्यंत असतो. झाडांच्या खोडावर चोचीने कोरून ते घरटे तयार करतात. तसेच झाडांवरील एखादी पोकळीही ते घरटे म्हणून वापरतात. घरट्यात मादी तीन अंडी घालते. अंडी लहान व पांढऱ्या रंगाची असतात. लहान पोपट स्थानिक स्थलांतर करतो. त्याला पिचू पोपट, नीळकंठ पोपट व भारतीय नीळकंठ पोपट अशीही नावे आहेत. भारतात लहान पोपटाची अजून एक वेगळी जाती  आढळते. तिचे शास्त्रीय नाव लोरिक्युलस बेरीलिनस आहे.

मोठे पोपट देखील विविध रंगांचे व आकारमानाचे असतात. त्यांची लांबी २०– १०० सेंमी. असते. ते जगात सर्वत्र आढळतात. दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे त्यांच्या विविध जाती आणि प्रकार सर्वाधिक आढळून येतात. बहुतेक मोठ्या पोपटांचा रंग भडक हिरवा असतो. काहींच्या शरीराचे भाग लाल, पिवळे, हिरवे वा काळे असतात. शरीराचे डोके, मान व धड असे तीन भाग असतात. चोच आखूड, मजबूत व बाकदार असते. वरच्या चोचीचा अर्धा भाग कवटीला जुळलेला असून तो थोडाफार हालविता येतो. त्यामुळे चाेचीचे दाेन्ही भाग हालतात. मान आखूड असते. धडावर पंख आणि पायांची जोडी असते. पंख मजबूत आणि गोलसर असतात. पोपट अतिशय वेगाने काही अंतर उडू शकतात. पायांच्या चार बोटांपैकी दोन बोटे पुढे तर दोन बोटे मागे असतात. बोटांवर नख्या असतात. बोटांच्या विशिष्ट रचनेमुळे ते झाडावर सहज चढून जातात अथवा फांद्यांवर हिंडू शकतात. त्यासाठी ते आपल्या चोचीचा वापर करतात.

पोपट शाकाहारी आहेत. ते उंबर, वड, पिंपळाची फळे, सावर व पांगाऱ्याच्या फुलातील पुंकेसर व पाकळ्या खातात. लहान व कठीण कवचाचे फळ एका पायाने उचलून आणि पायाच्या बोटांमध्ये घट्ट पकडून आपल्या चोचीने फोडतात आणि टरफल काढून आतला गर खातात. अंजीर, पेरू व डाळींब यांच्या फळबागांवर धाडी घालतात आणि फळे टोकरून खाली टाकतात. फळे खाण्यापेक्षा फळांचे नुकसान ते जास्त करतात. पोपट समूहाने राहतात. समूहातही ते जोडीने वावरतात. त्यांची जोडी अनेक वर्षे टिकते. झाडांच्या ढोलीत, खडकांच्या कपारीत, घरांच्या भिंतीमधील खोबणीत ते घरटी करतात. मादी दर खेपेला २-५ अंडी घालते. अंडी लहान असून पांढऱ्या रंगाची असतात. तीन आठवड्यानंतर अंडी फुटून पिले बाहेर पडतात. नर व मादी दोघेही पिलांचे संगोपन करतात. पोपटाच्या काही जाती पाळून शिकविल्यानंतर माणसाच्या आवाजाची नक्कल करू शकतात. मोठ्या पोपटांच्या भारतात १३ जाती आहेत. यांपैकी चार जाती सर्वत्र आढळतात.

राघू (सिटॅक्युला यूपॅट्रिया)

राघू : या मोठ्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला यूपॅट्रिया आहे. त्याची लांबी सु. ५० सेंमी. असून शेपटी टोकदार व इतर पोपटांपेक्षा जास्त लांब असते. तो साधारणपणे कबुतराएवढा असतो. तो मोठी झाडे, शेते, बागा या ठिकाणी आढळतो. शरीराचा रंग वरच्या बाजूला गवती हिरवा आणि खालच्या बाजूला फिकट हिरवा असतो; चोच लाल, आखूड आणि वाकडी असते; मानेभोवती गुलाबी कंठा असून पुढच्या बाजूला तो काळ्या पट्‌ट्याने चोचीपर्यंत जोडलेला असतो. पंखावर लाल तपकिरी रंगाचा डाग असतो; खांद्यावर तांबडा पट्टा असतो; मादीला गुलाबी वलय नसते. तो दिसायला आकर्षक असल्याने त्याला पाळतात. तो माणसाच्या आवाजाची नक्कल करू शकतो.

कीर (सिटॅक्युला क्रॅमरी)

कीर : या मोठ्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला क्रॅमरी आहे. तो भारतात सर्वत्र आढळतो. तो साधारणपणे साळुंकीपेक्षा मोठा, पण राघूपेक्षा लहान असतो. त्याची लांबी सु. ४० सेंमी. असून शेपटी टोकदार असते. शरीराचा रंग हिरवा असून हिरव्या पंखावर निळसर झाक असते. त्याला काळा आणि गुलाबी रंगाचा कंठ किंवा गळपट्टा असतो. शेपटीच्या वरच्या पिसांवर आकाशी निळसर रंगाचा उभा पट्टा असतो. फळे खाताना ‘किकSS किॲकSS किॲकSS’ असा कर्कश आवाज करतो. म्हणून त्याला कीर असे नाव पडले असावे. त्यालादेखील लोक पिंजऱ्यात पाळतात. तो माणसाच्या आवाजाची नक्कल करतो. सर्कशीत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करून दाखविण्यासाठी त्यांना शिकवून वापरतात. शिकविले तर तो तोफ उडवू शकतो.

लालडोकी पोपट (सिटॅक्युला सायनोसेफेला)

 

लालडोकी पोपट : याचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला सायनोसेफेला आहे. त्याची लांबी सु. ३७ सेंमी. असून तो साळुंकीएवढा असतो. नराचे डोके लाल तांबड्या रंगाचे असून मानेभोवती बारीक काळे वलय असते; खांद्यावर तांबडा डाग असतो. मादीच्या डोक्याचा रंग निळसर करडा असतो. मात्र तिच्या मानेभोवती पिवळ्या रंगाचे वलय आणि खांद्यावर तांबडा डाग नसतो. हवेत उडताना ते ‘टुर्इर्इSS टुर्इर्इSS’ असा कर्णमधुर आवाज करतात. म्हणून त्याला टोर्इ पोपट असेही म्हणतात. तो पाळत नाहीत.

नीलपंखी पोपट (सिटॅक्‍युला कोलुंबॉयडेस)

नीलपंखी पोपट : त्याचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला कोलुंबॉयडेस आहे. त्याची लांबी सु. ३८ सेंमी. असून शेपटी लांब, टोकदार व निळी असते. शरीराचा रंग राखट हिरवा; पंख निळसर हिरवे; नराची चोच लाल असून टोकाकडे पिवळी असते. नराच्या व मादीच्या गळ्याभोवती काळा कंठ असतो. नीलपंखी पोपट दिसायला आकर्षक असतो. उडताना ते ‘चिचीवीSSS चीचीवीSSS’ असा कर्कश आवाज करतात. हा पोपट क्वचित पाळला जातो.

लहान किंवा मोठे पोपट पिंजऱ्यात पाळावयास कायद्याने बंदी आहे.

This Post Has One Comment

  1. सविस्तर माहितीदिल्याबद्दल धन्यवाद! नवीन संकेतस्थळ छान आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा