विषाणूंमुळे होणारा एक तीव्र व संक्रामक रोग. पोलिओचे विषाणू मेंदू व मेरुरज्जूतील चेतापेशींना हानी पोहोचवतात आणि त्यामुळे आंशिक किंवा पूर्ण पक्षाघात होऊ शकतो. प्रामुख्याने लहान बालके या रोगाला संवेदनशील असून त्यांच्यात हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. म्हणून या रोगाला शिशु-पक्षाघात किंवा बालपक्षाघात असेही म्हणतात. या रोगामुळे वृद्ध व्यक्तीदेखील बाधित होऊ शकतात. जगाच्या वेगवेगळ्या भागांत या रोगाच्या साथी येऊन गेल्याचे दिसून आले आहे. १९५० च्या दशकात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत या रोगाच्या साथीमुळे सु. ३३,००० व्यक्ती बाधित झाल्या होत्या. १९५२ मध्ये डेन्मार्क, जर्मनी आणि बेल्जियम या देशांमध्येही पोलिओची साथ पसरली होती.
पोलिओचे विषाणू तीन प्रकारांचे असून त्यांना पोलिओ व्हायरस-१, -२ आणि -३ अशा संज्ञा आहेत. त्यांपैकी कोणत्याही प्रकारामुळे पोलिओ होऊ शकतो. हे विषाणू केवळ जिवंत पेशींमध्ये वाढू शकतात. पोलिओबाधित व्यक्तीच्या थेट संपर्कातून, त्याच्या नाकातोंडावाटे बाहेर पडणाऱ्या कफातून किंवा त्या व्यक्तीच्या विष्ठेतून या विषाणूंचा प्रसार होतो. सर्दी आणि हगवण ही या रोगाची प्राथमिक लक्षणे असून रुग्णाच्या नाकातून बाहेर पडणाऱ्या शिंतोड्यातून तसेच त्याच्या विष्ठेतून हे विषाणू हवेत मिसळतात. निरोगी व्यक्तीच्या नाकातोंडावाटे हे विषाणू घशात शिरतात आणि अन्नमार्गात पोहोचतात. अन्नमार्गातून ते रक्तवाहिन्या आणि लसीका वाहिन्यांमध्ये शोषले जाऊन सर्व शरीरभर पसरतात. तेथून ते मध्यवर्ती चेतासंस्थेत पोहोचतात आणि चेतापेशींमध्ये शिरतात. चेतापेशींमध्ये ते मोठ्या संख्येने गुणित होऊन चेतापेशींचा नाश करतात.
पोलिओच्या विषाणूंचा परिपाक काल आठ दिवसांचा असतो. सौम्य डोकेदुखी, सर्दी, ताप, अन्नावरची वासना उडणे, उलट्या होणे, हगवण व अस्वस्थता ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. सुरुवातीला शरीराचे तापमान हळूहळू वाढत जाऊन दोन-तीन दिवसांनी ताप येतो. हा ताप एकदम खाली येतो. ज्या व्यक्तीला पोलिओच्या विषाणूंची बाधा होते त्या प्रत्येक व्यक्तीला पक्षाघात होतोच, असे नाही. ८०% पेक्षा अधिक रुग्ण जे पोलिओच्या विषाणूंनी बाधित होतात, ते तीन-चार दिवसांत पूर्ववत होतात. परंतु जेव्हा रोगाचे स्वरूप तीव्र असते तेव्हा रुग्ण चिडखोर बनतो, त्याची पाठ व इतर अवयव दुखू लागतात, स्नायू दुबळे होतात आणि मान ताठ होते. पोलिओच्या विषाणूंमुळे जेव्हा मेरुरज्जूतील प्रेरक चेतापेशींचा नाश होतो, तेव्हा पक्षाघात होतो. हातपाय, उदर, मध्यपटल, श्रोणी या अवयवांच्या हालचाली प्रेरक चेतापेशी नियंत्रित करतात. या पेशींची हानी होत असल्यामुळे पक्षाघात होतो. हा पोलिओचा सामान्य पक्षाघात समजला जातो. ज्या चेतापेशी नाश पावतात त्यांची जागा भरून काढली जात नाही कारण चेतापेशींचे पुनर्जनन होत नाही. मात्र, ज्या चेतापेशींची गंभीर हानी झालेली नसते, त्या पूर्वीप्रमाणे काम करू शकतात.
पोलिओ विषाणूंमुळे मस्तिष्क स्तंभातील श्वसनकेंद्र बाधित झाल्यास श्वसनक्रियेत अडथळा निर्माण होतो. कंदीय (बल्बार) पक्षाघातामध्ये पोलिओचे विषाणू मस्तिष्क स्तंभावर आणि गिळणे, उच्चारणे इ. क्रिया नियंत्रित करणाऱ्या चेतापेशींवर हल्ला करतात. त्यामुळे घशात कफ साचत जातो, श्वसनमार्गात अडथळा निर्माण होऊन गुदमरल्यासारखे होते आणि पक्षाघात होऊन प्रसंगी मृत्यू येतो.
पोलिओ झालेल्या रुग्णाला पूर्णपणे विश्रांती देऊन निरीक्षणाखाली ठेवतात. श्वसनसंस्थेतील स्नायूंवर परिणाम झाला असल्यास रुग्णाला कृत्रिम श्वासयंत्रावर ठेवतात. रुग्ण बरा होत असताना व्यंगोपचार व्यायाम पद्धतीचा त्याला फायदा होतो.
पोलिओ रोगावर दोन लशी उपलब्ध आहेत. या लशी पोलिओच्या तीनही प्रकारांच्या विषाणूंपासून संरक्षण करतात. पहिली लस जोनास एडवर्ड सॉल्क या अमेरिकन संशोधकाने अंत:क्षेपकाच्या स्वरूपात तयार केली. यात पोलिओच्या मृत विषाणूंचा वापर करतात. दुसरी लस आल्बर्ट ब्रूस साबिन या अमेरिकन संशोधकाने तयार केली. या लशीमध्ये पोलिओचे जिवंत परंतु निष्क्रिय केलेले विषाणू असतात. ही लस तोंडावाटे देतात.
पोलिओपासून बालकांचा बचाव करण्यासाठी त्यांना पोलिओची लस देतात. ही लस एकूण सात वेळा दिली जाते. बालक जन्मल्यानंतर ४८ तासांच्या आत एक मात्रा, त्यानंतर दर ६ आठवड्यांनी ४ मात्रा, दीड-दोन वर्षांच्या दरम्यान पहिली वर्धक मात्रा (बूस्टर डोस), तर ४-५ वर्षांच्या दरम्यान दुसरी वर्धक मात्रा (बुस्टर डोस) देतात.
भारतात २०११ सालापासून तीन वर्षांत पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. म्हणून मार्च २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र, प्रतिबंधक उपाय म्हणून नवजात बालकांना पोलिओ होऊ नये याकरिता भारत सरकारतर्फे सामूहिक लसीकरणाचा ‘दो बुँद जिंदगीके’ हा पल्स पोलिओ कार्यक्रम देशाच्या कानाकोपऱ्यांत नियमितपणे राबवला जातो.