केरळ राज्याच्या एर्नाकुलम् जिल्ह्यातील कालडी येथील एक संशोधनाभिमुख सार्वजनिक संस्कृत विद्यापीठ. याची स्थापना २५ नोव्हेंबर १९९३ रोजी झाली. विद्यापीठाला केवलाद्वैतवादाचे प्रवर्तक व तत्त्वज्ञानी श्री शंकराचार्य यांचे नाव देण्यात आले. विद्यापीठाचे मुख्य कार्यालय एर्नाकुलम् जिल्ह्यात पेरियार नदीकाठावर नव्याने उदयास आलेल्या कालडी या नगरात असून हे स्थळ आद्यशंकरचार्याचे जन्मस्थळ आहे. विद्यापीठाचे अधिकारक्षेत्र संपूर्ण केरळ राज्य आहे. कालडी येथील मुख्य केंद्राशिवाय केरळची राजधानी तिरूअनंतपुरम्, तिरुर (मल्लापुरम् जिल्हा), एट्टमनूर (कोट्टयम्), पाय्यन्नूर (कननोर), त्रिसूर, थुरावूर (अलप्पुझा), कोयलांडी (कोझीकोडे), पनमाना (कोलम) ही विद्यापीठाची आठ प्रादेशिक केंद्रे आहेत. केरळ राज्याचे राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती, तर राज्याचे शिक्षणमंत्री कुलगुरू असतात. ‘ज्ञानादेव तु कैवल्यम्’ (ज्ञानातूनच मोक्ष प्राप्ती होते.) हे विद्यापीठाचे बोधवाक्य आहे.
संस्कृतमधील वेगवेगळ्या शाखा, भारतविद्या, भारतीय संस्कृती, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय भाषा, ललित कला, विदेशी भाषा, सामाजिक विज्ञान इत्यादी विषयांच्या अभ्यासास देश-विदेशांत उत्तेजन देणे, त्यांचा विकास आणि सखोल संशोधन करणे, संस्कृतमधील मौल्यवान हस्तलिखिते, प्रकाशित पुस्तके इत्यादींचे संकलन करून त्यांचे जतन करणे इत्यादी विद्यापीठाच्या स्थापनेचे मुख्य उद्देश आहेत.
विद्यापीठाच्या परिसरात संस्कृत साहित्य, संस्कृत व्याकरण, भारतीय तत्त्वमीमांसा, भारतीय तर्कशास्त्र, भारतविद्या, भारतीय भाषा, विदेशी भाषा, कला व सामाजिक विज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षणशास्त्र या दहा विद्याशाखा आहेत. संस्कृत साहित्य, संस्कृत व्याकरण, संस्कृत वेदांत, संस्कृत न्याय, संस्कृत सामान्य, आयुर्वेद, वास्तुविद्या, समाजकार्य, इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान, उर्दू, इंग्रजी, हिंदी, मल्याळम्, संगीत, रंगकला, नृत्य, रंगभूमी, शारिरिक शिक्षण, अरेबिक असे २३ विभाग येथे असून वेगवेगळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे राबविले जातात. बी. ए.; बी. एफ्. ए. (ललित कला पदवी); एम्. ए.; एम्. एससी; एम्. पीएड्.; एम्. एफ्. ए.; एम्, एस्. डब्लू; एम्. फिल्.; पीएच्. डी. इत्यादी अभ्यासक्रमांचे अध्यापन केले जाते. विद्यापीठात संस्कृतमधील विविध विषयांमध्ये संशोधन करणारी पाच केंद्रे असून त्यांत चार हजारांवर लाभार्थी विद्यार्थी, १७८ कायम अध्यापक आणि २७३ कर्मचारी वृंद आहे.
विद्यापीठाने नव्याने वेगवेगळे २४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करून एम्. फिल व पीएच्. डी.च्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबरोबरीनेच आयुर्वेद पंचकर्म आणि आंतरराष्ट्रीय स्पा थेरपी (रोगनिवारणाची स्पा उपचार पद्धती) यांसारखे विविध पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन सध्याच्या या व्यावहारिक जगातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे, योग्य अभिवृत्ती, पुरेसे ज्ञान आणि शास्त्रीय दृष्टिकोन अंगिकारणारे सर्जनशील तरूण संशोधक व चिकित्सक विचारवंत घडविणारे एक आदर्श शैक्षणिक केंद्र निर्माण करणे हा या विद्यापाठाचा दृष्टिकोन आहे. संस्कृतच्या अभ्यासातून भारताच्या उच्च ऐतिहासिक वारशाचा पद्धतशीरपणे शोध घेऊन ते सत्य संपूर्ण जगापुढे मांडणे, अंध:श्रद्धेच्या आहारी गेलेल्या समाजाला त्यातून मुक्त करणे आणि विधायक, सकारात्मक समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे हे या विद्यापीठाचे उदात्त धोरण आहे.
जैमिनीय परंपरेतील सामवेद ऋचांना केरळमध्ये विशेष महत्त्व असून प्रख्यात नंबूदिरी समाजातील काही कुटुंबांत त्यांचे पठन केले जाते; परंतु आजच्या बदलत्या सामाजिक आणि बुद्धीप्राधान्यवादी वातावरणात या परंपरेचा र्हास होत आहे. या बाबत विद्यापीठाने पुढाकार घेऊन केरळमधील थ्रिसूर (त्रिचूर) जिल्ह्यातील पंजाल या गावातील पारंपरिक पद्धतीने सामवादाचे पठण करणार्या तज्ज्ञांच्या माध्यमातून या ऋचांचे ध्वनिमुद्रण केले आहे. त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या आर्थिक मदतीतून या विद्यापीठाने केरळमधील कुट्टियाट्टम् या सांस्कृतिक व पारंपरिक नाट्यरूप कला प्रकाराच्या ठेव्याची ध्वनिमुद्रित चित्रफीत आणि अनुबोधपट या माध्यमांतून संवर्धन केले आहे. या क्षेत्रातील अधिकच्या संशोधनासाठी शैक्षणिक संदर्भ म्हणून ही साधने या विद्यापीठात ठेवली आहे.
संस्कृतच्या अभ्यासाला उत्तेजन देणारे हे विद्यापीठ राज्यातील मध्यवर्ती संस्था आहे. त्यासाठीचे वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत देते. कुडियाट्टमचे दस्तऐवजीकरण करणे, आदर्श संस्कृत विद्यालये चालविणे, ताडाच्या पानावरील हस्तलिखितांचा संग्रह करणे इत्यादी कार्यक्रम हे मध्यवर्ती विद्यापीठ राबवीत आहे. अलिकडेच राज्यातील एक हजार विद्यालयांमध्ये संस्कृत भाषा प्रसारण कार्यक्रम राबविण्यात आले. राज्यातील वेगवेगळ्या विद्यालयांत गांधीजींच्या विचारांची मूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी रुजविण्याच्या दृष्टीने ‘गांधी दर्शन कार्यक्रम’ राबविणारे हे मध्यवर्ती विद्यापीठ आहे. हस्तलिखित ग्रंथालय निर्माण करण्याच्या बाबतीत विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
मुख्य परिसरात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, ग्रंथालय, अतिथिगृह, आरोग्य केंद्र, प्रेक्षागृह, आंतरजाल, भाषा प्रयोगशाळा इत्यादी सुविधा आहेत. संस्कृत व इतर भाषा आणि विषयांसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण व समुपदेशन केंद्रेही येथे चालविली जातात. विद्यापीठाच्या ग्रंथालयात सुमारे ७७,८०० पुस्तके, हस्तलिखित ज्ञानपत्रिका व नियतकालिके आहेत. २४ सप्टेंबर २०१४ मध्ये नॅकने या विद्यापीठाला ‘अ’ श्रेणी हे उच्च मानांकन दिले असून केरळ राज्यातील विद्यापीठांपैकी ‘अ’ श्रेणी मानांकन मिळविणारे हे पहिले विद्यापीठ आहे. विद्यापीठाने २०१८ साली वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करून आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले.
समीक्षक – संतोष ग्या. गेडाम