जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. १९४८ मध्ये श्रीनगर येथे जम्मू व काश्मीर या नावाचे एक विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. १९६९ मध्ये या विद्यापीठाची दोन स्वतंत्र विद्यापीठे करण्यात आली. त्यांपैकी काश्मीर विद्यापीठ (Kashmir University) श्रीनगर येथे, तर दुसरे जम्मू विद्यापीठ जम्मू येथे तावी नदीच्या काठावर स्थापन करण्यात आले. याचे कार्यक्षेत्र जम्मू प्रांत असून त्यात जम्मू, उधानपूर, दोडा, कथुआ, पूंछ आणि राजौरी हे जिल्हे समाविष्ट होतात. राज्याचे राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती, तर मुख्यमंत्री प्रतिकुलपती असतात. कुलगुरू हे विद्यापीठीय प्रशासनाचे प्रमुख असून सध्या आर. डी. शर्मा हे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत (२०१९).

विद्यापीठाचा परिसर जम्मूमधील बाबासाहेब आंबेडकर रस्त्यालगत आहे. या मुख्य परिसरात अध्यापन विभाग, आरोग्य केंद्र, अतिथिभवन, डाकघर, बँक, पुस्तकांचे दुकान, वसतिगृहे, आहारिका व आहारगृहे इत्यादी अनेक सुविधा आहेत. विद्यापीठाचा दुसरा (जुना) परिसर मुख्य परिसरापासून ४ किमी. वर सुमारे १०.५ एकर क्षेत्रात विस्तारला असून तेथे प्रामुख्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निवासस्थाने आणि विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे.

जम्मू विद्यापीठ देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांत गणले जाते. शिक्षण, संशोधन, प्रकाशन आणि विद्यापीठाचा शैक्षणिक विस्तार करणे हे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यापीठात जीवशास्त्र, मानव्यविद्या व प्राच्यविद्या, विज्ञान शाखा, शिक्षणशास्त्र, व्यवसायशिक्षण, गणित, विधी, सामाजिक विज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी, संगीत व ललित कला अशा ११ विद्याशाखा आहेत. वेगवेगळ्या विषयांचे ३६ विभाग विद्यापीठपरिसरात आहेत. त्यांमध्ये सुमारे ७० पदवीपूर्व व पदव्युतर अभ्यासक्रम आहेत. विद्यापीठाशी सुमारे १३७ महाविद्यालये संलग्न आहेत. विद्यापीठात केंद्रीय ग्रंथालय असून त्यामध्ये सुमारे ३.५० लाख पुस्तके आणि २५० नियतकालिके आहेत. ग्रंथालय संगणकीकृत असून येथील वाचनालयात एका वेळी सुमारे ५०० विद्यार्थी बसू शकतात. याशिवाय प्रत्येक विभागांत त्यांची स्वतंत्र ग्रंथालये आहेत.

विद्यापीठाला ‘राष्ट्रीय मूल्यनिर्धारण आणि अधिस्वीकृती परिषदेʼने (National Assessment and Accreditation Council – NAC) A+ हे सर्वोत्कृष्ट गुणांकन दिलेले आहे. तसेच विद्यापीठाला आयएसओ-९००१ हे प्रमाणपत्र मिळाले आहे. भाडेरवाह, किश्तवार, पूँछ, रिआसी, रामनगर, कथुआ आणि उधापुर या सात ठिकाणी विद्यापीठाची उपकेंद्रे आहेत.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा