प्रशासनाची तटस्थता म्हणजे प्रशासनाचा राजकीय नि:पक्षपातीपणा किंवा त्याचे अराजकीय स्वरूप होय. याचा अर्थ असा की, सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी प्रशासकांनी राजकारणापासून अलिप्त राहून नि:पक्षपातीपणे सेवा द्यावी. त्यांनी प्रशासन करत असताना राजकारणाचा विचार न करता स्पष्ट व प्रामाणिकपणे सल्ला द्यावा. प्रशासकांनी व्यक्तीनिरपेक्ष, नि:पक्षपाती, अराजकीय राहून कोणाचेही समर्थक न बनता आपले कार्य कार्यक्षमतेने, प्रामाणिकपणे, निष्ठेने, निपुणेतेने समर्पणाने करावे. प्रशासनाची कोणत्याही राजकीय पक्षांशी किंवा तत्त्वज्ञानाशी बांधिलकी नसावी यालाच प्रशासकीय तटस्थता असे म्हटले जाते.प्रशासनाने राजकारणापासून तटस्थ राहून कार्य करणे आणि कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर असला तरी राजकीयदृष्टया तटस्थ राहून लोककल्याणाची कार्ये करीत राहणे प्रशासकीय तटस्थतेमध्ये अपेक्षित आहे. राजकीय प्रवाहात झालेल्या बदलांचा नोकरशाहीवर परिणाम होत नाही. राजकीय नेतृत्वात बदल जरी झाला तरीही सनदी सेवक स्वत:ला राजकारणापासून अलिप्त ठेवत अविरतपणे राजकीय नेत्याला सल्ला देण्याचे कार्य करतात.

प्रशासनाची तटस्थता या तत्त्वाचा उदय प्रथम इंग्लंडमध्ये झाला. खरेतर तटस्थता ही संकल्पना इंग्लंडमधील नागरी सेवेच्या संदर्भात तिथे वापरण्यात आली. इंग्लंडमधील नागरी सेवकांच्या राजकीय कृतीचे अध्ययन करण्यासाठी नेमलेल्या मास्टरमन समितीने नि:पक्षपातीपणा या प्रशासकाच्या विशेष गुणावर भर दिला आहे. प्रशासकीय सेवकांचा कल राजकारणाकडे नसतो. सर्व राजकीय पूर्वग्रहदूषित वृत्तीपासून सनदी सेवा स्वतंत्र असल्याबाबत जनतेचा विश्वास असतो. कोणताही राजकीय पक्ष सत्तेत असला तरी नागरी सेवक पूर्णपणे इमानदारीने सेवा देते याबाबत मंत्र्यांना विश्वास असतो. प्रशासकीय पदोन्नती आणि पुरस्कार यांची उत्पत्ती ही राजकीय सत्तेत नसून गुणवत्तेवर अवलंबून असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उच्च असते. इंग्लंडमधून तटस्थतेच्या संकल्पनेचा प्रसार ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत आणि इतर देशांत झाला. ही संकल्पना अमेरिकेतील हुवर कमिशनने स्पष्ट करताना म्हटले आहे की, प्रशासन राजकीय कृतीपासून पूर्णत: दूर असले पाहिजेत, धोरणाबाबत त्यांनी तटस्थता जपली पाहिजे. त्यांनी राजकीय कृतीपासून अलिप्त राहिले पाहिजे आणि राजकीय कामकाज टाळले पाहिजे. कारण याचा वाईट परिणाम त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रात आपले कर्तव्य पार पाडण्यात होतो. आपले एक वेगळे स्थान असल्याची स्वतंत्र ओळख ते निर्माण करू शकले पाहिजेत आणि राजकीय पक्ष किंवा त्याच्या धोरणापासून ते पूर्णत: वेगळे असल्याचे दाखविले पाहिजे. जेष्ठ सनदी सेवकांनी खाजगीत किंवा सार्वजनिकरीत्या प्रसारमाध्यमांसमोर कसलेही खुलेआम वक्तव्य करु नये. राजकीय व्यासपीठावरुन राजकीय वक्तव्ये करु नयेत. तसेच राजकीय किंवा वादग्रस्त असलेल्या विषयांवर वक्तव्ये करु नयेत असेही हुवर कमिशनने स्पष्ट केले आहे.

प्रशासन जर तटस्थ नसेल तर लोकशाही देशात वेळोवेळी निवडून येणाऱ्या  वेगवेगळया पक्षांची धोरणे ते राबवू शकणार नाहीत. अशी यामागची समजूत होती. परंतु कल्याणकारी राज्य कल्पनेच्या स्वीकृतीनंतर, शासनाच्या विविध धोरणांची अंमलबजावणी प्रशासनाकडून व्हावी तशी होत नसल्याने त्यांची फळे सामान्यजनांपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा तक्रारीतून नंतर प्रशासकीय बांधिलकीच्या कल्पनेचा उदय झाला. प्रशासनाच्या तटस्थतेचे प्रमाण आणि स्वरूप हेही प्रत्येक देशात वेगवेगळे असल्याचे दिसते.

संदर्भ :

  • Avasthi, A.; Maheshwari, S., Public Administration, Agra, 2017.