प्रशासन व्यवस्थेत काम करणाऱ्यांनी लोकशाहीतील नीतिमूल्यांचे भान ठेवून आपण जनतेचे सेवक आहोत, या भावनेतून प्रशासन करावे व जनतेचे प्रश्न सोडवून प्रशासनाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करावा, या विचारतत्त्वास प्रशासकीय नीतिवाद असे म्हटले जाते. लोकशाही व्यवस्थेत प्रशासन हे जनताभिमुख असावे. प्रशासकीय जबाबदारीची जाणीव ठेवून आपण जनतेचे सेवक आहोत, या भूमिकेतून त्यांनी प्रशासन करावे. लोकप्रशासनातील सेवकांनी लोकशाही मूल्ये आणि उच्च नैतिक मानदंड यांचे पालन करावे आणि अधिकाराचा दुरूपयोग टाळावा असा विचार. मुख्यत: पॉल अ‍ॅपलबीने हया विचारांचा पाठपुरावा केलेला आढळतो. नैतिकता आणि प्रशासन वेगळे करणे शक्य नाही असे म्हटले जाते. केवळ प्रशासनातील नैतिकता हीच चांगल्या सरकारची हमी देऊ शकते. प्रशासकीय नैतिकता ही धैर्य, प्रामाणिकपणा, निष्ठा, उत्साह, सौजन्य आणि प्रामाणिकपणा सारख्या गुणांमुळे टिकून राहते.  अ‍ॅपलबी यांच्या मते, प्रशासकीय नीतीवादात जबाबदारीची जाणीव, प्रामाणिकपणा, संपर्क आणि सेवक प्रशासनातील कौशल्य, समस्या सोडविण्याची आणि त्यासाठी संघभावनेने काम करण्याची तयारी, संस्थात्मक साधनांचा विकास करण्याचे सामर्थ्य इ. वैशिष्टयांचा अंतर्भाव होतो. त्याखेरीज खाजगी बाबी आणि सार्वजनिक बाबी यात भेद करणे, जनतेमध्ये प्रशासकीय प्रक्रियेबद्दल विश्वास निर्माण करणे इत्यादींचाही प्रशासकीय नीतीवादात समावेश होतो. व्यक्तीगत स्वार्थ, सत्ता, प्रभुत्व यापेक्षा सार्वजनिक हित व सार्वजनिक कल्याण महत्वाचे आहे असे प्रशासकीय नीतीवाद मानतो. निर्णय-निर्धारण प्रक्रियेतील नैतिकता हा प्रशासकीय नैतिकतेमधील केंद्रबिंदू मानला जातो. तथ्य व मूल्यांच्या प्रश्नांना नैतिक निर्णय-निर्धारण प्रक्रियेपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. जबाबदारी, उत्तरदायित्व, कार्याप्रती निष्ठा, सर्वोत्कृष्ठता, सत्यनिष्ठता, पारदर्शिकता, न्याय यांचा समावेश प्रशासकीय नैतिकतेमध्ये होतो

पहा : नव-लोकप्रशासन.

संदर्भ :

  • Laxmikanth, Public Administration, New Delhi, 2011.