शासकीय योजना आणि ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची यंत्रणा. तिला सरकारी कर्मचाऱ्यांद्वारा  संचालित शासनप्रणाली असेही म्हटले जाते.नोकरशाही ही संज्ञा Bureau (ब्युरो) या फ्रेंच  शब्दापासून तयार झाली आहे. Bureau म्हणजे लिहिण्याचा टेबल/डेस्क होय. Bureaucracy यास डेस्क गव्हर्नमेंट असेही संबोधल्या जाते. cracy हा एक प्रत्यय असून तो Kratos क्रेटोस या ग्रीक शब्दापासून तो तयार झाला आहे. त्याचा अर्थ शासन असा होतो. ब्युरो किंवा विभागात प्रशासकीय शक्ती केंद्रित होणे आणि राज्याच्या क्षेत्राधिकारा बाहेरच्या विषयातसुध्दा अधिकाऱ्यांचा अनुचित हस्तक्षेप असणे हा अर्थ नोकरशाहीची संकल्पनेत प्रकट होतो.

शासनव्यवस्थेत पदाधिकारी आणि अधिकारी असे दोन घटक असतात. पदाधिकारी हे नेमणूक किंवा निवडणुकीच्या माध्यमाने राजकीय व्यक्ती म्हणून प्रशासन करीत असतात. याउलट प्रशासनातील अधिकारी हे तज्ञ कायमस्वरूपी व बिगर राजकीय असतात. प्रशासनातील त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. कर्मचारी स्थायी प्रशासकीय सेवेचे सदस्य असतात आणि त्यांची नियुक्ती/भरती स्पर्धा परीक्षांद्वारे होते. कर्मचाऱ्यांना निश्चित, नियमित वेतन व भत्ते दिले जातात व सेवानिवृत्तीपर्यंत ते पदावर राहतात.विशिष्ट पदाचे विशिष्ट कार्यक्षेत्र, गुणवत्तेच्या निकषावर नियुक्ती आणि बढती, निश्चित वेतन, नियमांनुसार कार्ये, निश्चित कालावधीसाठी नेमणूक, अधिकारपद परंपरा, निश्चित कार्यपध्दती, नियमांचे कठोरपणे पालन ही नोकरशाही वैशिष्टये आहेत. राजकीय पदाधिकारी हे तज्ञ असतातच असे नाही. तेव्हा या सनदी नोकरशहांच्या मदतीने ते निर्णय घेत असतात.

एफ. एम. मार्क्स यांनी नोकरशाहीचे चार स्पष्ट केले आहेत ते म्हणजे-  १. पालनकर्ता नोकरशाही २. जातिप्रधान नोकरशाही ३. आश्रयदाता नोकरशाही ४. गुणवत्ताप्रधान नोकरशाही. वेबरचा नोकरशाहीवरील अभ्यास आणि त्यांचे निष्कर्ष महत्त्वाचे मानले जातात. औद्योगिक समाजामध्ये उद्दिष्टपूर्तीचा बुध्दिसंमत असा मार्ग म्हणून नोकरशाहीचा निर्देश वेबरने केला आहे.इंग्रजी भाषेतील  उपरोल्लेखित Bureaucracy या शब्दाला विशेष चांगला अर्थ नाही. नेहमीच्या वापरात सरकारी अधिकारी, प्रशासन, नोकरशाही असा त्यांचा उल्लेख केला जातो, तर कित्येकदा विशिष्ट वेळकाढू, नियमांनी बध्द अशा गुंतागुंतीच्या कृतींचा/प्रवृत्त्तींचा नोकरशाही म्हणून टीकात्मक उल्लेख होतो. जॉन ए. विग यांच्या मते, विकृत किंवा उपहासामुळे नोकरशाही शब्दाचा अर्थ कामात घोटाळा, अतीव्यय, हस्तक्षेप आणि वर्गीकरण असा केल्या जातो. कार्लाईलने नोकरशाही शब्द वापरताना राज्यकारभारातील गोंधळ आणि सुव्यवस्था अशा अर्थाने वापरला आहे. प्रत्यक्षात नोकरशाही याचा अर्थ तज्ञ, कायम स्वरूपाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे राज्य. त्यांचे प्रशासनावर वर्चस्व असते म्हणून त्यांच्या मार्फत स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत होणाऱ्या प्रशासनाला नोकरशाही असे म्हणतात.

 संदर्भ :

  • Avasthi, A.; Maheshwari, S., Public Administration, Agra, 2017.
  • व्होरा, रा., पळशीकर, सु., राज्यशास्त्र कोश, १९८७, पुणे.