गोड्या पाण्यातील एक मासा. रोहू माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव लबिओ रोहिटा आहे. सायप्रिनिडी कुलातील मासे कार्प या सामान्य नावाने ओळखले जातात. या कुलात २२० प्रजाती असून २४०० जाती आहेत आणि जगातील सर्व गोड्या पाण्याच्या पर्यावरणात कार्प आढळतात. रोहू ही कार्प माशाची भारतात बहुतकरून आढळणारी जाती आहे. दक्षिण आशियातील बांगला देश आणि नेपाळ या देशांतही ही जाती आढळते. भारतामध्ये आसाम, बिहार, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत रोहू मासे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.

रोहू (लबिओ रोहिटा)

रोहू माशाचे शरीर लांबट असते. त्याची लांबी सु. २ मी. आणि वजन ११० किग्रॅ.पर्यंत असू शकते. पोटाच्या बाजूने पाहिले असता त्याचा आकार बहिर्वक्र दिसतो. पाठीचा रंग निळसर किंवा तपकिरी करडा असतो. मुस्कट पुढे आलेले आणि ओठ जाड असतात. स्पृशा आखूड आणि बारीक असून सामान्यपणे त्यांची जोडी असते. त्यांना कल्ला-चाळणी असते. त्यामुळे पकडलेले भक्ष्य सहसा बाहेर पडत नाही. खवल्यांचा रंग मधे पिवळसर, नारिंगी किंवा तांबूस असतो आणि त्यांच्या कडा गर्द रंगाच्या असतात. तसेच परावर करड्या, तांबड्या किंवा काळसर रंगाचे मिसळलेले पट्टे असतात.

रोहू हा सर्वभक्षी मासा आहे. ते सर्व प्रकारच्या गोड्या पाण्यात राहतात. ज्या पाण्यात वनस्पती आहेत अशी सरोवरे, मंद-प्रवाह असलेले पाण्याचे प्रवाह आणि नद्या अशा ‍ठिकाणी ते वावरतात आणि दूषित पाण्यातही ते तग धरून राहतात. त्यांची लहान पिले प्राणि-प्लवकांवर जगतात, तर मोठे मासे वनस्पति-प्लवकांवर जगतात. खूप पाणी असलेल्या किंवा पूर आलेल्या नदीत त्यांच्या माद्या अंडी घालतात. एका वेळी मादी सु. २०–३५ लाख अंडी घालते. फलन झाले की अंडी तांबूस रंगाची होतात. पिलांची वाढ वेगाने होते. पहिल्या वर्षात त्यांची लांबी सु. ४५ सेंमी., तर वजन सु. ६५० ग्रॅ. होते. तीन वर्षांनी ते सु. ९० सेंमी. इतके लांब वाढू शकतात.

भारतात रोहू मासा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. रोहू, मृगळ आणि कटला या तीनही गोड्या पाण्यातील माशांचे संवर्धन शेततळी, तलाव, मत्स्यशेती इत्यादी ठिकाणी व्यापारी स्तरावर केले जाते.

This Post Has 2 Comments

  1. गणेश शेळके

    खूप छान माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा