बालमणी अम्मा : (१९ जुलै १९०९ – २९ सप्टेंबर २००४).प्रसिद्ध मल्याळम् कवयित्री. मल्याळम् साहित्यात बालीमणी अम्मा या कवयित्रीला महत्त्वाचे स्थान आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध कवयित्री महादेवी वर्मा यांच्या समकालीन असलेल्या अम्मांनी पाचशेहून अधिक कविता लिहिल्या आहेत. त्या एक परंपरानिष्ठ, तरल कवयित्री आहेत. स्त्रीचं मातृरूप, तिच्या मनातील वात्सल्यभावना त्यांच्या कवितांतून अतिशय साध्या, सरळ शब्दात व्यक्त झालेल्या दिसतात. त्यांची अंगाईगीते, बालसाहित्य आणि अनुवादही उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कवितेत नादसौंदर्य, भावुकता आणि तत्त्वचिंतन यांचा कलात्मक संगम आढळतो. त्यांच्या कवितेतून घडणारे मातृहृदयाचं दर्शन अपूर्व आहे आणि म्हणूनच या परंपरानिष्ठ कवयित्रीला ‘मल्याळम् साहित्याची माता’ मानले जाते.
बालमणी अम्मांचा जन्म पुन्नायुरक्कुलम या गावी एका नायक कुटुंबात झाला. नलपत कोचुकुट्टी अम्मा आणि चित्तनजूर कुन्हुनी राजा हे त्यांचे आईवडील. त्यांना शाळेत पाठविण्यात आले नाही. घरीच त्यांचे शिक्षण झाले. संस्कृत शिकवायला शिक्षक घरीच येत. त्यामुळे संस्कृत आणि थोडेफार इंग्रजी त्या घरीच शिकल्या. विवाहानंतर पतीच्या प्रोत्साहनामुळे त्या इंग्रजी भाषाही चांगल्याप्रकारे शिकल्या. अम्मांचे मामा प्रसिद्ध साहित्यिक वातावरणात अम्मांची बालपणीच पुस्तकांशी मैत्री झाली. वयाच्या २० व्यावर्षी त्यांचा विवाह श्री. व्ही. एम. नायर यांच्याशी झाला. ते मातृभूती या प्रसिद्ध नियतकालिकाचे व्यवस्थापकीय संपादक व संचालक होते. त्यामुळे काही काळ त्यांचे कलकत्त्यात वास्तव्य होते.कमला दास, सुलोचना, मोहनदास आणि श्यामसुंदर ही त्यांची चार मुले. त्यापैकी कमलादास उर्फ माधवी कुट्टी उर्फ कमला सुरैय्या ही इंग्रजी आणि मल्याळममध्ये सुप्रसिद्ध लेखिका आहे. बालमणी अम्मांच्या साहित्यिक जीवनावर त्यांचे मामा एन.एन. मेनन, मामांचे घनिष्ट मित्र महाकवी बी. एन. मेनन, रवींद्रनाथ टागोर आणि व्हिक्टर ह्यूगो यांच्या साहित्याचा विलक्षण प्रभाव जाणवतो.
पतीच्या प्रोत्साहनाने त्यांनी ‘कलकत्तेका काला कुटिया’ ही पहिली कविता लिहिली आणि प्रकाशितही झाली. पण त्यांची पहिली कविता आहे ‘मातृचुंबन’ही आहे असे म्हटले जाते. त्यांचे एकूण २४ कवितासंग्रह प्रकाशित झाले असून कुप्पुकई (ओंजळ – १९३० ) हा पहिला कवितासंग्रह आहे. त्यानंतर अम्मा (१९३४), कुटुम्बनी (१९३६), स्त्रीहलमम् (१९३९), प्रभंकुरम (१९४२), कालिकोट्टा (१९४९), मुतश्शी (१९६२), मरूविष्टे कथा (कुऱ्हाडीची कथा-१९६६),नैवेद्यम् (१९८७) इ. काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. मरूविष्टे कथा हा संग्रह खूपच गाजला. जिविताट्टीलुट ही त्यांची आत्मकथा प्रकाशित झाली आहे. त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी, इंग्रजी, मराठी अनुवादही प्रसिद्ध झाले असून अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
अम्मांच्या सुरुवातीच्या काव्यलेखनावर सुप्रसिद्ध मल्याळी कवी वळ्ळतोळ यांच्या काव्याचा प्रभाव होता. वास्तविक स्वातंत्र्य आंदोलन काळात त्यांच्या काव्यलेखनाला सुरूवात झाली. महात्मा गांधींच्या विचारांचा, आदर्शाचा प्रभाव त्यांच्या जीवनावर होता. त्याकाळात त्या चरख्यावर सूत कातत, खादी वापरत. त्यामुळे १९२९-३९ मध्ये लिहिलेल्या काही कवितातून देशभक्ती, स्वातंत्र्याची ओढ व्यक्त झालेली असली तरी, म्हणावे तसे या विचारांचे पडसाद त्यांच्या काव्यात दिसत नाही. उलट स्त्रीजीवनातील विविध भूमिका, भावनांचा आविष्कारच त्यांच्या काव्यात अधिक दिसतो. एकूणच त्यांच्या कवितेत मातृत्व भावनेचे वैश्विक दर्शन घडते. भारतीय संस्कार आणि तत्त्वज्ञानावर त्यांची अपार श्रद्धा होती. मुतश्शी, अम्मा ह्या त्यांच्या उल्लेखनीय काव्यसंग्रहात स्त्रीजीवनातील विविध नात्यांचा, अनुभूतीचा अत्यंत संवेदनशील आविष्कार दिसतो.
प्रेम, भक्ती, पौराणिक संदर्भ देत वैश्विक तत्त्वाला स्पर्श करणारी त्यांची कविता असून पारंपारिक पद्धतीने काव्यलेखन करणाऱ्या बालमणी अम्मांना अनेक साहित्यिक पुरस्कार मिळाले आहेत. साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली होती. ‘मुतश्शी’ (आजी) या काव्यसंग्रहासाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५) ,केंद्रिय साहित्य अकादमी पुरस्कार, असन स्मारक कविता पुरस्कार (१९८५),वळ्ळतोळू पुरस्कार (१९९३) ,ललिताम्बिका अंतर्जनम् पुरस्कार, एळूताच्छन पुरस्कार (१९९५) आणि नैवेद्यम् या काव्यसंग्रहासाठी सरस्वती सन्मान पुरस्कार (१९९५) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या ‘गौरेया’ या लोकप्रिय कवितेचा केरळ राज्याच्या पाठ्यपुस्तकात समावेश केला आहे.विशेष म्हणजे अम्मांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कोची आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव समितीद्वारा मल्याळम् भाषिक साहित्यिकांचा बालमणी अम्मा पुरस्काराने दरवर्षी सन्मान केला जातो.
अलझायमर आजाराने ५ वर्षे ग्रस्त असलेल्या अम्मांचे कोची येथे निधन झाले.
संदर्भ : खांडगे, मंदा आणि इतर, भारतीय भाषातील स्त्रीसाहित्याचा मागोवा, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ,पुणे.