व्हेनेझुएला देशातील तसेच दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठे सरोवर. व्हेनेझुएलाच्या वायव्य भागातील माराकायव्हो खोऱ्यात सस.पासून ४१४ मी. उंचीवर हे सरोवर आहे. उत्तरेस व्हेनेझुएला आखातापासून दक्षिण टोकापर्यंत सरोवराची लांबी २१० किमी. आहे. सरोवराची रुंदी १२१ किमी. आणि क्षेत्रफळ सु. १३,२८० चौ. किमी. आहे. सरोवर उथळ असून सरासरी

माराकायव्हो सरोवराचे विहंगम दृष्य

खोली २४ मी. आहे. उत्तर भागात खोली कमी असून दक्षिण भागात ती सर्वाधिक (६० मी.) आहे. या सरोवरास उपसागर म्हणूनही उल्लेखिले जाते. माराकायव्हो सरोवराला अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यांपैकी काटाटूंबो ही सर्वांत मोठी नदी आहे. सरोवरात एकूण ४६७ बेटे आहेत. त्यांपैकी झापारा, टोआस, सॅन कार्लस, प्रॉव्हडेंसीआ, पेस्कडोरीझ, पाहारोस इत्यादी प्रमुख आहेत.

सरोवराच्या उत्तर टोकाशी असलेल्या टाब्लाझो या ५.५ किमी. इतक्या अरुंद सामुद्रधुनीने हे सरोवर व्हेनेझुएलाच्या आखातास जोडले गेले आहे; तर व्हेनेझुएला हे आखात कॅरीबियन समुद्राला मिळते. टाब्लाझो सामुद्रधुनीतून भरती-ओहोटीच्या वेळी समुद्राचे क्षारयुक्त पाणी सरोवरात शिरते. त्यामुळे सरोवराच्या उत्तर भागातील पाणी अधिक क्षारयुक्त व मचूळ बनते, तर दक्षिण भागात क्षारता खूप कमी असते. सरोवराच्या उत्तर मुखाजवळ असलेल्या सुमारे २६ किमी. लांबीच्या वाळूच्या दांड्यामुळे अनेक वर्षे येथील सामुद्रधुनीतून जलवाहतूक करता येत नसे. तसेच या समुद्रधुनीतील पाण्याची खोली फक्त ४ मी. पेक्षाही कमी होती. १९३० च्या दशकानंतर सातत्याने त्यातील गाळ काढून या प्रवाहमार्गाची खोली कृत्रिम रीत्या ११ मी. पर्यंत वाढविली. तसेच भविष्यात पुन्हा त्यात गाळ साचू नये म्हणून मुखाशी ३.२ किमी. लांबीचे लाटारोधक बांधकाम १९५७ पर्यंत पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या मार्गिकेतून महासागरी तेलवाहू आणि मालवाहू जहाजे सरोवराच्या दक्षिण टोकापर्यंत सहज ये-जा करू शकतात. अंतर्गत व सागरी जलवाहतुकीच्या दृष्टीने या सरोवराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सरोवराच्या पूर्व

जनरल रॅफीअल ऊर्थानेता पूल,

किनाऱ्यावरील कबीमस, सीअथा, ओहेदा, जिब्राल्टर आणि पश्चिम किनाऱ्यावरील माराकायव्हो ही प्रमुख बंदरे आहेत. १९६२ मध्ये टाब्लाझो सामुद्रधुनीवर, माराकायव्हो शहराजवळ ८.९ किमी. लांबीचा ‘जनरल रॅफीअल ऊर्थानेता पूल’ (General Rafael Urdaneta Bridge) बांधण्यात आला असून हा जगातील सर्वाधिक लांबीच्या पुलांपैकी एक आहे. या पुलावरून दररोज सुमारे ३७,००० पेक्षाही अधिक वाहने दररोज ये-जा करतात. या पुलाखालून सागरी जहाजे सहज ये-जा करू शकतील इतकी पुलाची उंची ठेवण्यात अली आहे.

माराकायव्हो सरोवर हे पृथ्वीवरील सर्वांत जुन्या भूशास्त्रीय कालखंडात (सुमारे २० ते ३६ द. ल. वर्षांपूर्वी) निर्माण झाले आहे. माराकायव्हो खोरे हे जगातील खनिज तेलाचे साठे व उत्पादनाच्या दृष्टीने संपन्न प्रदेशांपैकी एक आहे. १९१७ पासून येथील खनिज तेल उत्पादनास सुरुवात झाली. परिसरात आणि सरोवरातही खनिज तेल साठे असल्याने दोन्ही ठिकाणी पुष्कळ तेलविहिरी आहेत. देशाच्या एकूण तेल उत्पादनांपैकी सुमारे दोन तृतीयांश तेल उत्पादन या क्षेत्रातून होते. येथे खनिज तेलाबरोबरच नैसर्गिक वायूचेही उत्पादन घेतले जाते. खनिज तेल वाहतुकीच्या दृष्टीने माराकायव्हो सरोवर विशेष महत्त्वाचे ठरले आहे.

माराकायव्हो खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खनिज तेलाच्या उत्पादनामुळे सरोवराच्या परिसरातील जमीन खचत आहे. आतापर्यंत किनारी भागातील जमीन सुमारे ५ मी. ने खचली आहे. त्यामुळे सरोवराभोवती दलदलयुक्त सखल भूमी निर्माण झाली आहे. जलपर्णीचा वाढता विस्तार ही या सरोवरातील एक प्रमुख पर्यावरणीय समस्या असून २००४ च्या सर्वेक्षणानुसार सरोवराचे सुमारे १८ टक्के क्षेत्र जलपर्णींनी वेढले आहे. सध्यातरी जलपर्णीच्या वाढीचा मत्स्य उत्पादनावर परिणाम आढळत नसला, तरी मासेमारी करणाऱ्या बोटींच्या मार्गात त्या अडथळा निर्माण करत आहेत. औद्योगिक अपशिष्टांचे नद्यांमार्फत सरोवरात येणारे ढीग व पाण्यातील खनिज तेलाचा थर हटविण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने ही या समस्येला कारणीभूत आहेत. सरोवराच्या परिसरात राहणाऱ्या सुमारे २० हजार लोकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असून प्रामुख्याने ते या सरोवरातूनच मासे पकडतात.

काटाटूंबो लायटनिंग, माराकायव्हो परिसर

मारकायव्हो  सरोवर व त्याचा परिसर हा विजांचा चमचमाट मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जगातील प्रमुख प्रदेशांपैकी एक आहे. या वातावरणीय आविष्कारास ‘काटाटूंबो लायटनिंग’ (Catatumbo Lightening) असे म्हणतात. या परिसरात वीज इतकी सतत पडत असते की, परिसरातील सर्व गोष्टी अंधारातही स्पष्टपणे पाहता येतात. यामुळे अनेक पर्यटक येथे भेटी देतात. वर्षातून सुमारे १४० ते १६० रात्री जमिनीपासून १ किमी. उंचीवर तयार होणाऱ्या वादळी हवा व ढगांमुळे विजांचा चमचमाट व ढगांच्या गडगडाटासह या भागात वृष्टी होते. त्यामुळे परिसरातील अनेक लोक मृत्यूमुखी पडतात. पर्जन्यमानाच्या भिन्नतेनुसार सरोवराच्या उत्तरेकडील परिसरात झुडुपे, तर दक्षिणेकडील भागात उष्ण कटिबंधीय वर्षारण्ये आढळतात. ही वने तेथील स्थानिक वन्य प्राणी व पक्षी यांच्यासाठी मुख्य अधिवास बनली आहेत.

इटालियन समन्वेषक आमेरीगो व्हेस्पूची आणि स्पॅनिश समन्वेषक आलॉन्सो दे ओखेदो यांनी २४ ऑगस्ट १४९९ मध्ये सर्वप्रथम हा सरोवर प्रदेश शोधून काढला. त्यांना या परिसरात इंडियन जमातीच्या लोकांनी पाण्यात डांबांवर उभारलेल्या आणि छप्पर शाकारलेल्या झोपड्या आढळल्या. या झोपड्या पाहून त्यांना व्हेनिसची आठवण झाली. त्यावरून या प्रदेशाला त्यांनी ‘व्हेनेझुएला’ (स्पॅनिश लिटल व्हेनिस) हे नाव दिले. १५२९ मध्ये वसविलेले व्यापारी बंदर माराकायव्हो शहर या नावाने प्रसिद्धीस आले. व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी १८२३ मध्ये झालेल्या लढाईत माराकायव्हो शहर केंद्रस्थानी होते. पूर्वी या खोऱ्यातील बहुतांश तेल उद्योग प्रामुख्याने अमेरिकन, ब्रिटिश व डच कंपन्यांनी विकसित केले. फारच कमी तेलविहिरी स्थानिकांच्या होत्या; परंतु १९७५ मध्ये येथील तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

समीक्षक : वसंत चौधरी