सपुष्प वनस्पतीतील बीजे धारण करणाऱ्या अवयवाला फळ म्हणतात. फुले आल्यानंतर त्यातील अंडाशयापासून फळ तयार होते. फळाचे फलभित्ती आणि बीज (बी, बिया) असे दोन भाग केले जातात. फलभित्ती अंडाशयाच्या भित्तीपासून बनलेली असते, तर बीज बीजांडापासून बनलेले असते. फलभित्ती जाड किंवा पातळ असते. ती जाड असते तेव्हा तिचे दोन किंवा तीन स्तर असू शकतात. बाहेरच्या स्तराला बाह्यफलभित्ती म्हणतात आणि सामान्यपणे ते फळाचे आवरण असते. मधल्या स्तराला मध्यफलभित्ती म्हणतात. आंबा, जरदाळू व अलुबुखार अशा फळांमध्ये हा स्तर मांसल गराच्या स्वरूपात असतो. सर्वांत आतल्या स्तराला अंत:फलभित्ती म्हणतात. तो स्तर बहुधा पातळ आणि संत्र्यासारख्या फळांमध्ये पटलयुक्त, तर आंबा, माड (नारळ) इ. फळांमध्ये कठीण व दगडासारखा असतो. मात्र अनेक फळांमध्ये फलभित्तीचे असे तीन स्तर नसतात.

काही फुलांमध्ये केवळ अंडाशयाचे रूपांतर फळामध्ये झालेले असते. अशा फळांना ‘खरे फळ’ किंवा ‘सत्य फळ’ म्हणतात. परंतु बऱ्याचदा फुलातील पुष्पासन, निदलपुंज इ. भाग वाढतात आणि फळांचे भाग बनतात. अशा फळांना ‘आभासी फळ’ म्हणतात. जसे सफरचंद, नासपती या फळांमध्ये पुष्पासन अंडाशयाभोवती वाढते आणि ते मांसल बनते. काजूच्या फुलातील पुष्पवृंत आणि पुष्पासन वाढतात, फुगतात व त्याचे मांसल बोंडूमध्ये रूपांतर होते. या बोंडूलाच बहुधा फळ समजले जाते. मात्र ते आभासी फळ असते. काजूचे खरे फळ हे त्याच्या मांसल बोंडूला जुळलेले वृक्काकार काजूगर असते. बिब्ब्याचेही पुष्पवृंत मांसल बनते आणि त्यावर कवचयुक्त फळ असते.

प्रत्येक फळ फुलापासून बनते; परंतु प्रत्येक फुलाचे रूपांतर फळात होतेच असे नाही. फुलामध्ये परागण झाल्यानंतर काही तासांत ते काही दिवसांत फलन घडून येते. सपुष्प वनस्पतींमध्ये फलन दुहेरी असते. या प्रक्रियेत फलित अंडपेशीपासून भ्रूण तयार होतो आणि फलित ध्रुवीय केंद्रकाचे भ्रूणपोषात रूपांतर होते. बीजांडापासून फळातील बीज तयार होते. अंडाशयातून स्रवणाऱ्या वृद्धि-संप्रेरकांमुळे अंडाशयाचा आकार वाढू लागतो आणि हळूहळू त्याचे फळात रूपांतर होते. काही कारणांमुळे फलन झाले नाही तर अंडाशय कोमेजून जाते आणि गळून पडते. केळ, पपर्इ, संत्रे, द्राक्षे, सफरचंद, अननस इ. वनस्पतींच्या काही जातींमध्ये अंडाशयाचे फलनाशिवाय फळात रूपांतर होते. याला ‘अनिषेक फलन’ म्हणतात. अशा फळांमध्ये क्वचितच बिया असतात.

फळांचे साधी फळे, घोसफळे (समूह फळे) आणि संयुक्त फळे असे प्रकार केले जातात.

साधी फळे : फुलातील एकाच अंडाशयापासून (एकच अंडपी किंवा संयुक्त अंडपी) एकच फळ तयार होत असल्यास़, अशा फळाला ‘साधे फळ’ म्हणतात. ते शुष्क किंवा मृदू असू शकते. शुष्क फळ स्फुटनशील, अस्फुटनशील किंवा अर्धस्फुटनशील असते. यानुसार त्याचे पुढील प्रकार व उपप्रकार केले जातात.

साधी स्फुटनशील शुष्क फळे

साधी स्फुटनशील शुष्क फळे : यांचे पुटक, शिंब, कूटपटिक आणि बोंड हे उपप्रकार आहेत.

पुटक : (फॉलिकल).  पुटक फळ लंबगोल व अंडाकृती असून ते एकाच फुलाच्या एकअंडपी व ऊर्ध्वस्थ अंडाशयापासून तयार होते. ते पिकल्यावर एकाच उभ्या शिवणीवर फुटून बिया बाहेर पडतात. उदा., रुई, बाळकडू इ.

शिंब : (लेग्यूम). शिंब म्हणजे शेंग. शिंब फळ शेंगेसारखे असून ते एकाच फुलाच्या एकअंडपी व ऊर्ध्वस्थ अंडाशयापासून तयार होते. ते पिकल्यावर दोन उभ्या शिवणीवर फुटते आणि बिया बाहेर पडतात. फॅबेसी कुलाचे हे वैशिष्ट्य आहे. उदा., वाटाणा, गुलमोहर, घेवडा. मात्र भुईमुगाची शेंग फुटत नाही. तिला अस्फुटनशील शिंब म्हणतात.

कूटपटिक : (सिलिक्वा). हे फळ लांब व अरुंद आणि लहान शेंगेच्या स्वरूपात असते. शेंग क्वचित वाकडी असून तिच्यात अनेक बिया असतात. ते एकाच फुलातील द्विअंडपी व ऊर्ध्वस्थ अंडाशयापासून तयार होते. ते खालून वरच्या दिशेने दोन उभ्या शिवणीवर फुटते. उदा., मोहरी, मुळा. आकाराने लहान असलेल्या फळाला कूटपटिका (सिलिक्युला) म्हणतात. उदा., चांदणी.

बोंड : (कॅप्सूल). हे फळ गोल किंवा अर्धगोल आकाराचे असून ते एकाच फुलाच्या संयुक्त, ऊर्ध्वस्थ व बहुअंडपी अंडाशयापासून तयार होते आणि वेगवेगळ्या प्रकारे फुटते. उदा., कापूस, भेंडी इ. या प्रकारातील चिनी गुलाबाची फळे आडवी फुटतात.

साधी अस्फुटनशील शुष्क फळे

साधी अस्फुटनशील शुष्क फळे : यांचे तृणफळ, कृत्स्नफळ, सूर्यमुखी फळ, सपक्ष फळ आणि दृढफळ असे उपप्रकार आहेत.

तृणफळ : (कॅरीऑप्सिस). गवत कुलातील फळांना ‘तृणफळ’ म्हणतात. ते एका फुलाच्या ऊर्ध्वस्थ एकअंडपी अंडाशयापासून तयार झालेले असून फळात एकच बी असते. फलभित्ती आणि बीजावरण एकमेकांना चिकटलेले असतात. उदा., गवत, गहू, मका, ज्वारी इ.

कृत्स्नफळ: (अकीन). हे फळ एकाच अंडाशयापासून तयार होते. फलभित्ती पातळ, शुष्क व कठीण असून ती बीजावरणापासून विलग असते. फळात एकच बी असते. कुक्षीवृंत फळाला चिकटलेला असतो. उदा., तुती, गुलाब, मोरवेल इ.

सूर्यमुखी फळ : (सिप्सेला). सूर्याच्या दिशेने फुले असणाऱ्या वनस्पतींच्या फळांना सूर्यमुखी फळ म्हणतात. ती निम्न व द्विअंडपी अंडाशयापासून तयार झालेली असतात. त्यांत एकच बी असते. फलभित्ती आणि बीजावरण वेगळे होऊ शकतात. उदा., सूर्यफूल, कारळे, करडई इ.

सपक्ष फळ : (समरा). या फळातील फलभित्तीवर एक किंवा अधिक पातळ पंख असतात. ते एकाच फुलाच्या एका ऊर्ध्वस्थ व संयुक्त अंडाशयापासून तयार झालेले असते. त्यात एक किंवा दोन बिया असतात. फळप्रसार वाऱ्यामार्फत होतो. उदा., मधुमालती.

दृढफळ : (नट). या फळाची फलभित्ती जाड, कठीण व सहज न फुटणारी असते. ते एकाच फुलातील एकाच ऊर्ध्वस्थ व संयुक्त अंडाशयापासून तयार होते. उदा., काजू, बिब्बा इ.

साधी अर्धस्फुटनशील शुष्क फळे

साधी अर्धस्फुटनशील शुष्क फळे : ही शुष्क फळे सुकल्यावर अर्धवट फुटतात. त्यांचे मालाशिंब, युग्मवेश्मी, नैकसपक्ष, स्फोटीवेश्म आणि मुद्रिका हे उपप्रकार आहेत.

मालाशिंब : (लोमेन्टम). माळेसारखे दिसणारे हे फळ एकाच फुलातील एकअंडपी व ऊर्ध्वस्थ अंडाशयापासून तयार होते. शेंग बियांभोवती दबलेली असून ती आडवी फुटते व तिचे एकबीजी तुकडे होतात. हे भाग अस्फुटनशील असतात. उदा., बाभूळ, लाजाळू इ.

युग्मवेश्मी : (क्रेमोकार्प). हे फळ एकाच फुलातील द्विअंडपी, संयुक्त व निम्न अंडाशयापासून तयार होते. ते उभे दोन शिवणींवर व दोन भागांत फुटते. अंडाशयामध्ये घुसलेल्या फलाधाराचे दोन भाग होतात व त्यावर हे दोन भाग युग्माप्रमाणे चिकटलेले असतात. फुटलेले भाग अस्फुटनशील व एकबीजी असतात. उदा., बडीशेप, जिरे, कोथिंबीर (धणे), गाजर इ.

नैकसपक्ष : (डबल समरा). हे फळ ऊर्ध्वस्थ द्विअंडपी अंडाशयापासून तयार होते. पिकलेले फळ दोन समान भागांत फुटते. प्रत्येक भागाला पंख आणि बी असते. उदा., जहरी ‍नारळ.

स्फोटीवेश्म : (रेग्मा). हे फळ एकाच फुलातील त्रिअंडपी, संयुक्त व ऊर्ध्वस्थ अंडाशयापासून तयार होते. फळ पिकल्यावर ते खालून वर तीन भागांत फुटते. प्रत्येक अस्फुटनशील भागात एक किंवा दोन बिया असतात. उदा., एरंड, मोगली एरंड इ.

मुद्रिका : (कार्सेरूल). हे फळ एकाच फुलातील द्विबहुअंडपी, संयुक्त व ऊर्ध्वस्थ अंडाशयापासून तयार होते. मुद्रिका किंवा अंगठीच्या आकारातील हे फळ पिकल्यावर चार कप्प्यांमध्ये फुटते. प्रत्येक कप्प्यात एक बी किंवा दृढफलिका असते. उदा., राजमुद्रा, तुळस इ.

साधी मृदू फळे

साधी मृदू फळे  : ही फळे एकअंडपी किंवा बहुअंडपी, संयुक्त व ऊर्ध्वस्थ अंडाशयापासून तयार होतात. त्यांची फलभित्ती जाड व मऊ असून पिकल्यावर फुटत नाही. गरामध्ये एक किंवा अनेक बिया असतात. अंत:फलभित्तीचे स्वरूप व बियांची संख्या यांनुसार त्यांचे खालील सात उपप्रकार होतात.

आठोळीयुक्त: (ड्रूप). या फळाच्या फलभित्ती जाड व मऊ असून त्याचे तीन स्तर स्पष्टपणे दिसतात. बाह्यफलभित्ती पातळ व रंगीत; मध्यफलभित्ती मऊ व गरयुक्त आणि अंत:फलभित्ती कठीण असून त्यामध्ये एक किंवा अधिक बिया असतात. उदा., आंबा, काजू. मात्र माड (नारळ), सुपारी इ. फळांमध्ये मध्यफलभित्ती तंतुमय असते.

अनष्ठिल : (बेरी). या फळामध्ये बाह्यफलभित्ती पातळ व रंगीत असून मध्यफलभित्ती रसाळ असते. अंत:फलभित्ती कठीण नसते. बिया अनेक असतात. उदा., वांगे, टोमॅटो व द्राक्षे. खजुरामध्ये एक बी असते.

कर्कटी : (पेपो). या फळाची बाह्यफलभित्ती काहीशी जाड असून मध्यफलभित्ती व अंत:फलभित्ती वेगवेगळ्या नसतात. फलभित्तीच्या आत बिया अनेक व विशिष्ट रचनेत असतात. उदा., काकडी, कलिंगड इ.

उत्कोलक : (पोम). हे आभासी फळ आहे. आभासी फळातील गर अंडाशयापासूनच नव्हे तर अंडपीबाहेरील ऊतींपासूनही तयार होतो. उत्कोलक प्रकारच्या फळामध्ये पुष्पासन वाढत जाते आणि अंडाशयापासून तयार झालेल्या मूळ फळाला झाकून टाकते. सामान्यपणे पुष्पासनाचा भागच खाल्ला जातो. उदा., सफरचंद, नासपती इ..

नारंगक :  (हेस्पिरीडियम). या फळाची फलभित्ती तीनही स्तरांपासून बनलेली असते. फलभित्ती जाड व तेलयुक्त असून अंतर्भागातील कप्प्यांमध्ये काही बिया व रसयुक्त केश असतात. उदा., लिंबू, मोसंबी इ..

घनकवची मृदुफळ : (अँफिसराका). या फळामध्ये फलभित्ती तीन स्तरांपासून बनलेली असते. ती जाड व कठीण असून गरामध्ये अनेक बिया असतात. उदा., बेल, कवठ इ.

दाडिम : (बॅलुस्टा). या फळामध्ये फलभित्ती जाड व चामड्यासारखी असून आत कप्पे असतात. हे कप्पे पातळ पडद्यांनी विभागलेले असतात व प्रत्येक कप्प्यांमध्ये अनेक रसाळ बिया असतात. उदा., डाळिंब .

घोसफळे

घोसफळ किंवा समूह फळ : साध्या फळांच्या गुच्छाला ‘घोसफळ’ म्हणतात. ते एकाच फुलातील अनेक व विभक्त अंडपींपासून तयार होते. त्यातील प्रत्येक फळ शुष्क किंवा मृदू असते. त्याचे खालीलप्रमाणे चार प्रकार आहेत.

पेटिका घोसफळ : (इटॅरिओ ऑफ फॉलिकल). एकाच फुलातील दोन किंवा अधिक अंडपींपासून फळांचा गुच्छ तयार होतो. उदा. रुई, सोनचाफा, सदाफुली इ.

कृत्स्न घोसफळ : (इटॅरिओ ऑफ अकीन्स). एकाच फुलातील अनेक विमुक्त अंडपींपासून हा गुच्छ तयार होतो. ही फळे एकत्र असतात. उदा., गुलाब, स्ट्रॉबेरी, मोरवेल इ.

आठळीयुक्त घोसफळ : (इटॅरिओ ऑफ ड्रूप). एकाच फुलातील अनेक विमुक्त अंडपींपासून आठळीयुक्त व लहान मृदुफळांचा गुच्छ बनतो. उदा., रासबेरी इ.

अनष्ठिल घोसफळ : (इटॅरिओ ऑफ बेरी). एकाच फुलातील अनेक अंडपींपासून या फळांचा गुच्छ तयार होतो. मात्र फळात आठळी नसते. उदा., सीताफळ, हिरवा चाफा, अशोक इ.

संयुक्त फळ

संयुक्त फळ : पुष्पविन्यासातील अनेक फुलांपासून तयार झालेल्या फळाला ‘संयुक्त फळ’ म्हणतात. त्याचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:  (१) सरसाक्ष : (सोरॉसीस). या फळांचा अक्ष मांसल व रसाळ असतो. कणिश किंवा स्तबक प्रकारच्या पुष्पविन्यासापासून हे फळ बनलेले असते. उदा., अननस, फणस, बारतोंडी, तुती इ. (२) औदुंबरिक : (सायकोनस). हे फळ कुंभासनी पुष्पविन्यासापासून तयार होते. उदा., अंजीर, उंबर (औदुंबर), वड इ.

फळ आणि बियांच्या अनेक सामान्य संज्ञा वनस्पतींच्या वर्गीकरणांशी जुळत नाहीत. सामान्य व्यवहारात फळ म्हणजे वनस्पतीचा चवीला गोड असलेला भाग. दृढफळ म्हणजे कठीण, तेलकट व कवचयुक्त भाग. भाजी म्हणजे कमी गोड व आहारासाठी वापरला जाणारा वनस्पतीचा भाग. उदा., पाला, शेंगा इत्यादी. काकडी, भोपळा, वांगे, टोमॅटो, भोपळी मिरची तसेच वाटाणा, घेवडा इत्यादींच्या शेंगा ही फळे आहेत आणि त्यांचा वापर भाजी म्हणून केला जातो. मका, भात, गहू इ. तृणधान्ये आपल्याला बिया वाटल्या तरी वनस्पती दृष्ट्या ती फळे आहेत. त्यांची फलभित्ती अतिशय पातळ असून ती बीजावरणाला चिकटलेली असते. दृढफळ हे वनस्पती दृष्ट्या फळच असते. ज्या पक्व अंडाशयात बीज असते त्याला वनस्पती दृष्ट्या फळ म्हणतात. बीज म्हणजे पक्व बीजांड असते.

This Post Has One Comment

pragati pawar साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.