कासीरर, एर्न्स्ट : (२८ जुलै १८७४—१३ एप्रिल १९४५). नव-कांटमतवादी जर्मन तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म ब्रेस्लौ ह्या गावी एका ज्यू व्यापारी कुटुंबात झाला. बर्लिन, लाइपसिक, हायड्‌लबर्ग व मारबर्ग येथील विद्यापीठांत त्याचे शिक्षण झाले. १९१९ ते १९३३ पर्यंत हॅंबर्ग विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. १९३३ साली हिटलरच्या हाती जर्मनीची सत्ता गेली, हे पाहून त्याने आपल्या जागेचा राजीनामा दिला. त्यानंतर ऑक्सफर्ड (१९३३–३५), स्वीडनमधील गॉथनबर्ग (१९३५—४१) आणि येल (१९४१—४४) ह्या विद्यापीठांत त्याने तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले.

कासीरर मौलिक तत्त्ववेत्ता होता त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाचा व एका व्यापक अर्थाने मानवी संस्कृतीचा इतिहासकारही होता. ह्या सर्व क्षेत्रांत त्याने विपुल लेखन केले आहे. Philosophie der Symbolischen Formen (१९२३, २५ व २९; इं. भा. फिलॉसॉफी ऑफ सिंबलिक फॉर्म्स) ह्या त्याच्या तीन खंडांतील जर्मन ग्रंथात त्याच्या तत्त्वज्ञानाचे सार येते, असे म्हणता येईल. कांट, हेगेल, हुसर्ल आणि त्याचा गुरू असलेला हेरमान कोएन (१८४२—१९१८) ह्या तत्त्ववेत्यांचा प्रभाव त्याच्या विचारावर दिसून येतो.

आपला अनुभव म्हणजे आपल्याला लाभणाऱ्या इंद्रियवेदनांचा केवळ संघात नव्हे, मानवी ग्रहणशक्तीत सुप्त असलेल्या शुद्ध संकल्पनांव्दारा ह्या संघाताला वा सामग्रीला, आपण जेव्हा सुव्यवस्थितपणे एकात्म करतो, ह्या संकल्पनांचे रूप जेव्हा आपण ह्या संघाताला देतो, तेव्हाच त्याला अर्थ प्राप्त होतो, तो अनुभवाचा विषय होतो. कांटच्या ह्या मूळ भूमिकेचा विकास आणि विस्तार कासीररने केला आहे. मानवी ग्रहणशक्तीत उगम पावणाऱ्या ह्या शुद्ध, अनुभवपूर्व संकल्पनांची एक चौकट आहे, ही चौकट मानवी अनुभवाला त्याचा स्थिर असा आकार प्राप्त करून देते आणि विज्ञानाचे रूपही ह्या चौकटीने कायमचे निश्चित होते, अशी कांटची शिकवण होती. उलट कासीररच्या मताप्रमाणे विज्ञान विकसनशील आहे व म्हणून नवनवीन वैज्ञानिक उपपत्ती उदयाला येतात. पण कोणत्याही उपपत्तीच्या बुडाशी मानवी ग्रहणशक्तीने निर्माण केलेला एक अनुभवपूर्व संकल्पनाव्यूह असतो आणि तो त्या उपपत्तीला आकार देतो. शिवाय कांटने केवळ विज्ञान आणि नैतिक अनुभव ह्यांना आधारभूत असलेल्या अनुभवपूर्व संकल्पनांचा शोध घेतला. ह्याच्या उलट कासीररने विज्ञान आणि नीती ह्यांबरोबरच मानवी आत्म्याचे धर्म, पुराणकथा, भाषा, कला इ. इतर आविष्कार आहेत, त्यांना आधारभूत असलेले जे प्रतीकांचे व्यूह आहेत, त्यांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही प्रतीके मानवी मनाने निर्माण केलेली असतात मानवी अनुभवाच्या त्या त्या विवक्षित अंगाला त्याचे स्वतःचे रूप विवक्षित प्रतीकव्यूहाकडून प्राप्त होते. म्हणून कासीरर याच्या मते धर्म, कला, नीती, विज्ञान हे अनुभवप्रकार एका बाह्य विश्वाची प्रतिबिंबे नसतात, तर मानवी मनाने निर्माण केलेल्या प्रतीकांच्या माध्यमातून घडलेले मानवी मनाचे आविष्कार असतात. माणूस हा प्रतीके निर्माण करणारा प्राणी आहे. मानवी मनाचे हे आविष्कार सतत परिवर्तन पावत असतात पण ह्या आविष्कारांच्या रूपांच्या विकासामागे एक सूत्र असते. ह्या रूपांचा शोध घेणे आणि त्यांच्या विकासामागचे सूत्र विशद करणे, हे कासीररच्या तत्त्वज्ञानाचे प्रयोजन आहे.

१९४५ साली कोलंबिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक ह्या पदावर काम करीत असताना त्याचा न्यूयॉर्क शहरात मृत्यू झाला.

संदर्भ :

  • Schilpp, P.A. Ed. The Philosophy of Ernst Cassiler, New York, 1949.