ताव्हेर्न्ये, झां बातीस्त : (१६०५–जुलै १६८९). फ्रेंच जगप्रवासी आणि जडजवाहिरांचा व्यापारी. त्याचा जन्म पॅरिस येथे झाला. तो प्रॉटेस्टंट पंथीय होता. त्याचे वडील आणि काका भूगोललेखक होते. १६३६ ते १६६८ या काळात त्याने फ्रान्सबाहेर पर्शिया व भारतात एकंदर सहा प्रवास केले. त्याला सर्व यूरोपियन भाषा अवगत होत्या. एकूण पौर्वात्य जगात इराण, भारत, जावा, इंडोनेशिया या देशांना त्याने भेटी दिल्या.

आपल्या पहिल्या प्रवासात त्याने आलेप्पो, आलेक्झांड्रीया, बसरा (इराक), शीराझ (इराण) या शहरांना भेटी दिल्या. दुसऱ्या प्रवासाला त्याने १६३८ ला सुरुवात करून सिरियातील आलेप्पो शहराला भेट देऊन १६३९ मध्ये तो सुरतेला आला. या सफरीमधे त्याने आग्र्याबरोबरच गोवळकोंड्यासही भेट दिली. १६४३ ते १६४९ या काळात त्याने आपला तिसरा प्रवास केला. या प्रवासात त्याने जावा-सुमात्रा येथे भेट देऊन दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप मार्गे परतला. चौथी सफर १६५१ ते १६५५ या काळात करताना त्याने आलेक्झांड्रीया, आलेप्पो, इराणमधील बंदर आब्बास, भारतातील मच्छलीपटनम्, गंडीकोटा, गोवळकोंडा, सुरत, अहमदाबाद तसेच ब्रम्हदेशातील काही शहरांना भेटी दिल्या. भारतातील प्रवासाचा विस्तृत वृत्तांत त्याने लिहून ठेवला असून आग्रा ते गोवळकोंडा पर्यंत त्याने किती दिवसांत प्रवास केला, त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. त्याने या नंतरचे दोन्ही प्रवास १६५७ ते १६६२ आणि १६६४ ते १६६८ या सालात केले. पण या प्रवासात तो भारत सोडून फार पूर्वेकडे जाऊ शकला नाही. या दोन्ही प्रवासांबद्दल खूप कमी माहिती मिळते. आपल्या पाचव्या व सहाव्या सफरीत त्याने पाटणा, डाक्का, बंगाल, मच्छलीपटनम्, गोवळकोंडा, गोवा, सुरत येथे भेटी दिल्या. या प्रवासात त्याने बंगालचा मोगल सुभेदार शायिस्ताखान, गोवळकोंड्याचा कुतुबशहा व विजापूरचा आदिलशहा यांना भेटल्याचे लिहिले आहे.

आपल्या लेखनात त्याने गोवळकोंड्याचे विस्तृत वर्णन केले आहे. सध्याच्या ‘हैदराबाद’ बद्दल तो म्हणतो की, ‘या शहराचे नाव ‘भागानगर’ असे असून ते कुतुबशहा महमद कुली याच्या लाडक्या पत्नीच्या म्हणजे ‘भागमती’ च्या नावावरून ठेवले गेलेʼ. तो पुढे असेही म्हणतो की, शहरापासून तीन कोस अंतरावर असणाऱ्या गोवळकोंड्याच्या राजांच्या सुंदर मशिदीबाहेर रोज संध्याकाळी चार वाजता गरीब लोकांना रोटी आणि पुलाव वाटला जातो. एखादी नवीन व्यक्ती शहरात शिरताना दरवाजात अडवून तिची झडती घेतली जाते. जर तिच्याकडे मीठ किवा तंबाखू सापडली, तर तिच्याकडून जकात वसूल केली जात असे. आपल्या लेखनात त्याने गोवळकोंड्यातील सरदारांच्या दर सोमवारी निघणाऱ्या मिरवणुकीचेही वर्णन केले आहे. या मिरवणुकीच्या सुरुवातीला दहा किंवा बारा हत्ती, मागे तीस ते चाळीस उंट व त्यांच्यामागे पायी चालणारी मंडळी असतात. या सर्वांच्या मागून घोडदळ व तोफखाना जात असे. मिरजुमल्याबद्दलही त्याने भरपूर लेखन केले आहे. १० नोव्हेंबर १६६५ रोजी औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे मोगल दरबारातील जवाहीरखान्यात बघितलेल्या अमूल्य रत्नांचे त्याने वर्णन केले आहे. रत्ने, मोती, दागिने यांचे वजन किती होते, ते ही लिहून ठेवले आहे. त्याने विविध देशांची चलने, तत्कालीन प्रचलित वजनेमापे, अंतरे, हिऱ्यांच्या खाणीं यांबद्दलही लेखन केले आहे. प्रसिद्ध ‘कोहिनूर’ हिऱ्याबद्दल तो लिहितो की, हा हिरा कोलारच्या खाणीत १६५६ किंवा १६५७ मध्ये मिळाला. त्याचे मूळ वजन ७८७.५ कॅरेट होते. हा मूळ हिरा त्याने औरंगजेबाच्या जवाहीरखान्यात १६६५ मध्ये बघितला होता. तेव्हा त्याचे वजन फक्त २८० कॅरेट होते; पण पुढे १७३८ मध्ये दिल्लीवर केलेल्या आक्रमणात नादिरशाहने केलेल्या लुटीत ‘कोहिनूर’ इराणमध्ये गेला.

भारतात प्रवास करताना १६६६ मध्ये गोवळकोंड्याच्या भेटीत ताव्हेर्न्ये याने कोलार येथून ११५.६ कॅरेटचे एक अमूल्य असे निळे रत्न आपल्या बरोबर फ्रान्समध्ये नेले व तेथील राजा १४वा लुई याला ते विकले. त्याला त्यावेळी ‘ताव्हेर्न्ये ब्लू’ म्हणून ओळखत असत. या रत्नाचे रेखाचित्र व वर्णन त्याने आपल्या Travels In india या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात केले आहे. यालाच पुढे १७४९ मध्ये राजाच्या जवाहिऱ्याने ६८ कॅरेटमध्ये कापले. पुढे फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, त्यावेळी हे रत्न चोरीला गेले. याची मूळ ओळख लपवण्यासाठी हे रत्न ४५.५२ कॅरेटमध्ये कापले गेले. हे रत्न सध्या ‘फ्रेंच ब्लू’ अथवा ‘होप डायमंड’ म्हणून ओळखले जाते. आज याची किंमत अंदाजे २०० ते ३५०  दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे.

इराणमधील बंदर आब्बास येथून निघून ५ मे १६६५ रोजी ताव्हेर्न्ये सुरत बंदरात आपला तरुण पुतण्या, चार नोकर व एक वैद्य यांच्यासह प्रवास करीत आला. सुरतेस काही दिवस मुक्काम करून बऱ्हाणपूर, ग्वाल्हेर, आग्रा असा प्रवास करीत तो दिल्लीस आला. तेथे तो काही आठवडे राहिला. पुढील प्रवासात राजमहाल येथे त्याची फ्रान्स्वा बर्निअर या दुसऱ्या फ्रेंच प्रवाशाबरोबर भेट झाली. पुढील प्रवास त्या दोघांनी मिळून केला. २५ नोव्हेंबर १६६५ रोजी ताव्हेर्न्ये याने दिल्लीचा निरोप घेतला व तो बर्निअरसह बंगालकडे गेला.

ताव्हेर्न्ये याने आपल्या प्रवासांचा वृत्तांत Les Six Voyages En Turquie, En Perse Et Aux Indes (१६७६–७७) या पुस्तकात लिहून ठेवला आहे. १६८५ मध्ये तो रशियातून पूर्वेकडे जाण्यास निघाला. या त्याच्या सातव्या प्रवासात वयाच्या ८४ व्या वर्षी मॉस्को (रशिया) येथे तो मृत्यू पावला.

ताव्हेर्न्ये याच्या लेखनावरून असे दिसते, की तो एक उत्साही निरीक्षक तसेच एक उल्लेखनीय सांस्कृतिक भाष्यकर्ता होता. त्याच्या प्रवासवर्णनाचे डच, इटालियन व इंग्रजी भाषेत भाषांतर झाले आहे.

 

संदर्भ : 

  • Ball, Valentine, Jean Baptiste Tavernier Travels In india, London,1925.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          समीक्षक : महेश तेंडुलकर