बार्थोलोम्यू दीयश : (१४५०-२९ मे १५००). आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप या भूशिराचा शोध लावणारा पोर्तुगीज दर्यावर्दी व समन्वेषक. त्याचे पूर्ण नाव बार्थोलोम्यू दीयश दे नोव्हाइस. त्याच्या १४८६ पूर्वीच्या जीवनेतिहासाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही.

बार्थोलोम्यू दीयशचे पोर्तुगीज टपाल तिकीट.

दीयश हा पोर्तुगाल सम्राट दुसरा जॉन (१४५५—१४९५) याच्या पदरी सरकारी कोठारांचा अधीक्षक होता. त्याने दिओगो काओ (Diogo Cão) याच्याबरोबर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या सफरीत भाग घेतला होता. १४८६ मध्ये दिएगोच्या मृत्यूनंतर  दुसरा जॉन याने नवीन शोधमोहिमेचे नेतृत्व दीयशकडे सोपवले व सां क्रीस्तोवो (São Cristóvão) या शाही जहाजाचे प्रमुख म्हणून नेमले. तर मालवाहू जहाजाचे नेतृत्व दीयशचा भाऊ दिएगो दीयशकडे देण्यात आले. त्याला सां क्रीस्तोवो, सां पँटालिओ (São Pantaleão) ही दोन जुनी जहाजे व १२० टनांची सां गाब्रेल (Sao Gabrel) व सां राफेल (Sao Rafael) या नावांची दोन नवीन जहाजे देण्यात आली. मजबूत असे ‘बोअर’ नावाचे एक जहाज, तसेच २०० टनांचे एक मालवाहू जहाज त्याच्यासोबत देण्यात आले. या नवीन बांधल्या गेलेल्या जहाजांचे वर्णन द बिगिनिंग ऑफ साउथ आफ्रिकन हिस्टरी या ग्रंथात मिळते.

प्रवासास सुरुवात केल्यावर दीयश पूर्वी दिओगो काओने शोधलेल्या केप वर्दे बेटांवर पोहोचला. तेथे या काफिल्याला वादळाने झोडपले. या वादळात एक जहाज या काफिल्यापासून भरकटले व परत लिस्बनला गेले. येथून पश्चिमेकडे प्रवास करताना त्यांना दक्षिण अमेरिकेचा किनारा दिसला. ब्राझीलच्या सांता बार्बारा जवळील बंदरावरून पाणी भरून त्याने आपला पुढला प्रवास अटलांटिक महासागरातून चालू केला. या प्रवासास निघताना त्याने आपले एक जहाज आत्तापर्यंतच्या प्रवासाचा वृतांत कळवण्यासाठी लिस्बनला पाठवले. दरम्यान तो चक्रीवादळात सापडला; पण त्यातून तो सुखरूप बाहेर पडला. या वादळात त्याच्या काफिल्यातील ४ जहाजे समुद्रात बुडाली तर इतर ७ जहाजे भरकटली. यांपैकी एका जहाजाचा कप्तान त्याचा भाऊ पेद्रो दीयश हा होता. या चक्रीवादळातून उर्वरित ६ जहाजांचे खूप नुकसान झाले; तथापि ती सुखरूप बाहेर पडली व पुढील प्रवासास निघाली. वादळात सापडल्यामुळे हा काफिला आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून भरकटला व परत मार्गावर येऊन गिनीच्या किनाऱ्यावर पोहोचला. हा प्रवास करताना त्याने दिएगो काओने शोधलेला मार्ग अवलंबत सध्याच्या केप क्रॉस येथे पोहोचला व तेथे पोर्तुगीज राजचिन्ह उभे केले. तेथून पुढे आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सध्याच्या नामिबियातील लुडेरिट्झ बे (Luderitz Bay) येथे पोहोचला. तेथे त्याने पुरावा म्हणून एक स्तंभ उभारला. येथून पुढे दक्षिणेकडे निर्मनुष्य व नापीक असा किनारा बाजूला ठेवत प्रवास करताना त्याला थंड हवामान व आग्नेयेकडून येणारे जोरदार वारे याचा सामना करावा लागला व तो अखेर अलेक्झांडर-बे येथे पोहोचला. तेथे त्याला प्रतिकूल हवामानामुळे सात दिवस मुक्काम करावा लागला. येथून पुढील १३ दिवसांच्या प्रवासात त्याला थंड हवामान व विरुद्ध दिशेने वाहणारे वारे याला तोंड द्यावे लागले. आपण आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून जात आहोत, हे दीयशच्या लक्षात तेव्हा आले नाही. परंतु परतीच्या प्रवासात त्याने या टोकास ‘केप ऑफ गुड होप’ (काबो दे ब्वेना एस्पेरेंझा) हे नाव दिले. या प्रवासात तो दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून पुढे गेला, तेव्हा त्याला पूर्वेकडील हिंद महासागराकडून येणारे उष्ण वारे मिळाले. येथून दीयशने आपली जहाजे किनारा मिळेल या उद्देशाने पूर्वेकडे वळवली, परंतु त्याला किनारा मिळाला नाही. किनारा दिसत नसल्याचे बघून त्याने जहाजे उत्तरेकडे नेली. सरतेशेवटी ३ फेब्रुवारी १४८८ या दिवशी सध्याच्या मोझेल उपसागरात (Mossel Bay) येथे त्याने नांगर टाकला. जेथे दीयशने नांगर टाकला, त्या जागेचे त्याने (Bay of the Cattle or Bay of Cowheads) बे ऑफ द कॅटल किंवा बे ऑफ काउहेड असे नामकरण केले. तर तेथील खाडीला त्याने रॉकची खाडी असे नाव दिले.

दीयशचा येथून पुढे जाण्याचा बेत होता; परंतु बरोबरच्या मंडळींनी याला विरोध केला. त्यामुळे त्याने आपला परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत त्याने केप अगुहलास (Cape Aguhlas) येथे स्मृतिस्तंभ उभारला. परतीच्या प्रवासात वाऱ्यांनी त्याला साथ दिल्यामुळे तो आफ्रिकेच्या किनाऱ्याच्या जवळून प्रवास करत १४८८ सालच्या डिसेंबर महिन्यात लिस्बन येथे पोहोचला.

पोर्तुगीजांच्या सोने या धातूच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम आफ्रिकेतील गिनी येथे दीयशने काही काळ वास्तव्य केले. मनुएल पहिला (१४६९—१५२१) याने वास्को द गामाच्या (१४६०—१५२४) मोहिमेसाठी जहाज बांधणीच्या कामात सल्लागार म्हणून दीयशला नेमले होते. जहाजातून केप वर्दे बेटापर्यंत त्याने वास्को द गामासोबत प्रवास केला आणि तेथून तो परत गिनीला आला. वास्को द गामाची जहाजे मे १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्याला लागली. साधारणतः दशकानंतर दीयशचा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचा प्रवास समाप्त झाला. त्यानंतर मनुएल पहिला याने पेद्रो अल्वारेस काब्राल (१४६७—१५२०) याच्या नेतृत्वाखाली मोठी पलटण भारताकडे पाठविली. यातील चार जहाजांचे नेतृत्व दीयशकडे होते. ही सर्व पलटण १५०० मध्ये ब्राझीलला पोहोचली. तेथून अटलांटिक समुद्रामार्गे दक्षिण आफ्रिकेला आणि पुढे हिंदी महासागरात पोहोचली. येथे यांची १३ जहाजे वादळाच्या तडाख्यात सापडली. मे १५०० मध्ये यातील चार जहाजे बुडाली आणि त्यामध्ये दीयशचीही जहाजे होती. केप ऑफ गुड होपपासून काही अंतरावर दीयश व इतर सर्व खलाशी यांना जलसमाधी मिळाली.

दीयश त्या कालखंडातील एकमेव शोधक होता, ज्याने अटलांटिक समुद्रामार्गे हिंदी महासागरातून आशिया खंडात तसेच भारताकडे जाण्याचा मार्ग शोधून काढला.

संदर्भ :

  • George, McCall, The Beginning of South African History, London, 1902.
  • Randles, W. G. L. Bartolomeu Dias and the Discovery of the South-east Passage Linking the Atlantic to the Indian Ocean (1488), Portugal, 1988.

                                                                                                                                            समीक्षक : प्रमोद जोगळेकर