फिच, राल्फ : (१५५० – १६११). भारतात आलेला पहिला इंग्लिश प्रवासी. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

इ. स. १५८० पर्यंत पोर्तुगीजांनी भारताकडे येणारे समुद्री मार्ग इतर देशांसाठी अडवून ठेवल्यामुळे इंगज प्रवासी खुष्कीच्या मार्गाने भारतात व पूर्वेकडील इतर देशांत येत असत. १५८३ मध्ये फिच ‘टायगर’ नावाच्या जहाजामधून आपल्या प्रवासास निघाला आणि मे महिन्यात सिरियातील आलेप्पो येथे आणि नंतर तो बसऱ्याला पोहोचला (६ ऑगस्ट १५८३). येथून पुढील प्रवासात होर्मुझ येथे काही इटालियन प्रवाशांनी त्याला पकडून पोर्तुगीजांच्या ताब्यात दिले. त्यांनी त्याला हेर समजून आपल्याबरोबर दीव व खंबायतमार्गे गोव्याला नेले. गोव्याबद्दल त्याने फारसे लिहिलेले नाही; परंतु तो एक महत्त्वाची गोष्ट नमूद करून ठेवतो. ती म्हणजे गोव्यात येणाऱ्या प्रत्येक जहाजातून माल व घोडे येतात आणि येथे येणाऱ्या इतर मालावर जकात माफ असून फक्त येणाऱ्या घोड्यांवर ८ टक्के जकात आकारली जाते. तेथे त्याची थॉमस स्टीव्हन व डचमन या जेझुइट पाद्र्यांबरोबर मैत्री झाली. या पाद्र्यांनी फिचला जामिनावर सोडवले. गोव्यात स्थायिक झाल्यावर तेथे त्याने एक दुकान भाड्याने घेऊन आपला व्यापार चालू केला. त्याला पोर्तुगालला पाठवण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर एप्रिल १५८४ मध्ये फिच व इतर दोघांनी तेथून पळून विजापूरला जाण्याचे ठरवले, मात्र प्रत्यक्षात त्यांनी विजापूरच्या मुलखातून प्रवास करत गोवळकोंडा गाठले. तेथून ते सध्याच्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर मार्गे बऱ्हाणपूरला गेले. बऱ्हाणपूर परिसरातून पावसाळ्यात फक्त घोड्यावरूनच प्रवास करणे शक्य होते आणि या शहरात मोठ्या प्रमाणात सुती कापड, रंगीत कापड व लोकरी वस्त्रे तयार होतात व येथे तांदूळ आणि मका विपुल प्रमाणात पिकवला जात असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे. तेथून त्याने आग्रा व फतेपूर सीक्री येथे जाण्याचे ठरवले, मात्र त्याच्याबरोबर असणारे इतर दोघे पश्चिमेकडील मोगल प्रदेशात गेले. या दोन शहरांबद्दल तो लिहितो की, ‘आग्रा हे या काळातले सर्वोत्तम शहर आहे. येथील घरे दगडात बांधलेली असून रस्ते रुंद आहेत. येथे एक किल्ला असून त्याभोवती खंदक आहे.’ पुढे फतेपूर सीक्रीबद्दल तो माहिती देतो की, ‘हे शहर आग्रा शहरापेक्षा मोठे आहे; परंतु येथील घरे व रस्ते जुन्या महानगराइतकी सुंदर नाहीत. ही दोन्ही शहरे त्या काळातील लंडनपेक्षा मोठी असून येथे मोठ्या संख्येने लोक राहतात. या दोन शहरांतील अंतर माझ्या अंदाजाने १२ मैल असून संपूर्ण मार्ग अन्नपदार्थ आणि इतर वस्तूंच्या बाजाराने व्यापलेला आहे.ʼ

फिचने आपला प्रवास पूर्वेकडे चालू ठेवला. गंगा नदीच्या काठावरून प्रवास करत अलाहाबाद, बनारस, पाटणा, हुगळी येथे भेटी देत तो चितगावला गेला. तेथे त्याची मैत्री काही पोर्तुगीजांशी झाली. तेथून तो पुढे प्रवास करत सयाम म्हणजे सध्याचे थायलंड येथे पोहोचला. प्रयाग व बनारस बद्दल तो वर्णन करतो की, ‘येथे मोठ्या प्रमाणत वाघ, तितर पक्षी, कासवे व कबुतरे आहेत. खूप चांगली घरे नदीकाठी बांधलेली असून त्यात खूपशी मंदिरेच आहेत. या मंदिरांत दगडाच्या व लाकडी मूर्ती आहेत. त्यांतील काही सिंह, वाघ, माकड यांच्या असून कधी स्त्री व पुरुष देवतेच्या आहेत. काही मूर्तींना चार हात असून येथे पूजा-अर्चा करण्यासाठी अनेक लोक येतात. येथे सुती कापड मोठ्या प्रमाणात तयार केले जात असून बनारस हे शहर शेल्यांसाठी प्रसिद्ध आहे.’ पाटणा शहराबद्दल तो लिहितो की, ‘हे शहर खूपच मोठे आहे. येथील घरे साधी असून माती व बांबूपासून बनवलेली आहेत. येथील रस्ते रुंद आहेत. कापूस, बंगाली साखर व अफूचा मोठा बाजार आहे.’ पाटण्याजवळ जमिनीतून सोने काढले जाते, अशी देखील महत्त्वाची माहिती तो देतो.

फिचच्या प्रवासवर्णनात अकबराबद्दल खूपच थोडी माहिती आहे. प्रवासात बघितलेल्या लोकांच्या वेशभूषेबद्दल तो लिहितो की, गोवळकोंड्यातील स्त्री व पुरुष आपल्या शरीराच्या मध्यभागी फक्त एक कापड बांधतात. तसेच गंगेच्या खोऱ्यातील लोक कापड वाचवण्यासाठी फक्त एक कापड शरीराभोवती गुंडाळतात. बनारसमधील स्त्रिया कपाळावर व भांगात मध्यभागी कुंकू लावतात. पाटण्यातील लोक अनवाणी चालतात आणि चांदी व तांब्याचे दागिने वापरतात. हिवाळ्यात डोक्याला लोकरी टोपी घालतात व आपले कान बांधून ठेवतात, अशी माहिती तो देतो. याशिवाय तो साधूंची वेशभूषा, लहानवयात होणारी लग्ने, विवाह, धार्मिक मान्यता, जादूटोणा, धार्मिक विधी, मंदिरे, मशिदी, अंतिम विधी, मृत व्यक्तीला गंगेच्या प्रवाहात सोडण्याची पद्धत व सती प्रथा यांबद्दल विस्तृत लिहितो.

परतीचा प्रवास करताना फिच कोचीन, गोवा मार्गे चौल येथे आला. चौलच्या वर्णनात तो लिहितो, ‘येथील राज्यपाल मोगल असून येथून औषधे, मसाले, रेशीम, चंदन, हस्तिदंत आणि चिनीमातीच्या भांड्यांचा मोठा व्यापार होतो. येथे मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे असून त्यापासून फळे, दारू, साखर, दोर, चटया बनवल्या जातात.’  याचबरोबर तो तेथील लोक झाडांपासून ताडी कशी गोळा करतात, याबद्दल माहिती देतो. पुढे तो चौल येथून होर्मुझला जाणाऱ्या जहाजात चढला व आलेप्पोमार्गे एप्रिल १५९१ मध्ये मायदेशी परतला. त्याने मायदेशात गेल्यावर काय केले, या बद्दलची माहिती उपलब्ध नाही.

लंडन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :

  • Ansari, Mohammd Azhar, European Travellers under the Mughals (1580-1627), Delhi, 1975.
  • Ryley, J. Horton, Ralph Fitch, England’s pioneer to India and Burma, London, 1899.

                                                                                                                                                                                  समीक्षक : प्रमोद जोगळेकर