अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड या विभागीय प्रदेशातील सर्वांत लांब नदी. लांबी ६५५ किमी. जलवाहनक्षेत्र २८,७१० चौ. किमी. या नदीचा उगम अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यू हँपशर राज्याच्या उत्तर भागातील कनेक्टिकट सरोवर मालिकेमधून होतो. हे उगमस्थान कॅनडातील क्वीबेक प्रांताच्या दक्षिण सरहद्दीपासून जवळ आहे. अ. सं. सं.मधील न्यू हँपशर, व्हरमाँट, मॅसॅचूसेट्स आणि कनेक्टिकट या राज्यांतून ही नदी वाहते. उगमापासून मुखापर्यंत ती सामान्यपणे दक्षिणेस वाहते. उगमानंतर प्रथम न्यू हँपशर राज्यातून केवळ १४ किमी. वाहत गेल्यानंतर ती न्यू हँपशर – व्हरमाँट या राज्यांच्या सरहद्दीवरून ३८३ किमी. वाहत जाते. त्यानंतर पुढे मॅसॅचूसेट्स आणि कनेक्टिकट राज्यांतून वाहत गेल्यानंतर ओल्ड सेब्रुक (सेब्रुक) जवळ ती लाँग आयलंड साउंड या नदीमुखखाडीस मिळते. उत्तर अंटलाटिक महासागराचा फाटा असलेली ही नदीमुखखाडी उत्तरेस कनेक्टिकट राज्य आणि दक्षिणेस न्यूयॉर्क राज्यातील लाँग आयलंड बेट यांदरम्यान स्थित आहे.

कनेक्टिकट नदीच्या सुमारे १४८ उपनद्या असून त्यांपैकी ३८ उपनद्या महत्त्वाच्या आहेत. त्यांतील चिकपी, मिलर्झ, ॲमनूसिक, फर्मिंग्टन, वेस्टफील्ड, डिअरफील्ड, व्हाइट, पसम्पसिक या उपनद्या प्रमुख आहेत. लाँग आयलंड साउंडला ७० टक्के गोड्या पाण्याचा पुरवठा या नदीद्वारे होतो. नदीच्या एकूण जलवाहन क्षेत्रापैकी प्रामुख्याने उत्तरेकडील सुमारे दोन तृतीयांश क्षेत्र अरण्यमय, तर दक्षिणेकडील एक चतुर्थांश क्षेत्र शेतीखाली आहे.

कनेक्टिकट व तिच्या उपनद्यांच्या पात्रात असलेल्या द्रुतवाह आणि जलप्रपातांचा जलविद्युतशक्ती निर्मितीसाठी फायदा झाला असून तिच्या मधल्या टप्प्यात औद्योगिक नगरे विकसित झाली आहेत. जलविद्युतशक्ती निर्मितीच्या बाबतीत ही नदी देशातील सर्वाधिक विकसित नद्यांपैकी एक आहे. वसंत ऋतूत परिसरातील बर्फ वितळून आलेल्या पाण्यामुळे नदीतील पाण्याची पातळी बरीच वाढते. कित्येकदा ही पातळी विनाशकारी ठरत असून त्यामुळे १९२७, १९३६, १९३८ आणि १९५५ मध्ये नदीला विनाशकारी पूर आले होते. विशेषत: १९३६ मधील पुरामुळे झालेली हानी विचारात घेऊन पूरनियंत्रण आणि जलविद्युतशक्ती निर्मितीच्या दृष्टीने केंद्र शासनाने कनेक्टिकट व तिच्या उपनद्यांवर वीस धरणांचे बांधकाम हाती घेतले. त्यांपैकी वरच्या टप्प्यात बांधलेल्या वाइल्डर (व्हरमाँट) येथील धरणामुळे ७४ किमी. लांबीचा असलेला जलाशय निर्माण झाला आहे. नदीच्या अखेरच्या ९७ किमी. पर्यंतच्या पात्रात भरती – ओहोटीचा प्रभाव आढळतो.

कनेक्टिकट नदी, हार्टफर्ड

आज या नदीचा उपयोग जलविद्युतशक्ती निर्मिती, औद्योगिकीकरण, जलसिंचन आणि जलवाहतूकीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे खोरे कांदा व तंबाखू उत्पादन, ट्रक फार्मिंग आणि दुग्धशेतीसाठी प्रसिद्ध आहे. नदीच्या काठावर कागदगिरण्या आहेत. नदीत शॅड जातीच्या माशांची व्यापारी तत्त्वावर मासेमारी केली जाते. काठावर अनेक शहरे व नगरे विकसित झाली आहेत. त्यांपैकी स्प्रिंगफिल्ड (मॅसॅचूसेट्स) आणि हार्टफर्ड (कनेक्टिकट) ही शहरे विशेष प्रसिद्ध आहेत. औद्योगिक व नागरी अपशिष्टांमुळे नदीतील पाण्याचे वाढलेले प्रदूषण कमी करण्यासाठी संबंधित राज्ये प्रयत्नशील आहेत. कनेक्टिकट नदी आणि उपनद्यांची खोरी सृष्टिसौंदर्याने नटलेली आहेत. नदीखोर्‍यात व्हाइट मौंटन व ग्रीन मौंटन ही दोन राष्ट्रीय अरण्ये असून नदीपरिसरात अनेक राज्य अरण्ये, राखीव जंगले आणि उद्याने आहेत. हार्टफर्डच्या वरच्या बाजूस असणारे एनफिल्ड फॉल्स हे जलप्रपात विशेष प्रेक्षणीय आहेत. मुखाजवळ पुळणी आणि रिसॉर्ट्स आहेत. मुखाजवळची आर्द्रभूमी रामसर परिसर म्हणून घोषित करण्यात आली आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही नदीखोर्‍याचा परिसर महत्त्वाचा आहे. एकंदरीत नदीच्या संपूर्ण खोर्‍याच्या भरभराटीच्या दृष्टीने या नदीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे.

डच समन्वेषक ॲड्रीॲन ब्लॅक यांनी इ. स. १६१४ मध्ये या नदीचा शोध लावला. १६३० च्या दशकात या नदीखोऱ्यातील पहिल्या यूरोपीय वसाहतींची स्थापना इंग्रजांनी केली. सुमारे दोन शतकांपासून कनेक्टिकट राज्य आणि पश्चिम मॅसॅचूसेट्समधील व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने ही नदी विशेष महत्त्वाची होती. अमेरिकन क्रांती आणि १८१२ च्या युद्धकाळात येथील व्यापार भरभराटीला आला होता.

समीक्षक : वसंत चौधरी