आयर्लंड प्रजासत्ताकाच्या ईशान्य भागातून वाहणारी एक नदी. आयर्लंडच्या लीन्स्टर प्रांतातील किल्डेअर परगण्यात, सस. पासून सुमारे १४० मी. उंचीवर असलेल्या अ‍ॅलन या दलदलमालिकेतून (पीट-बॉग्ज) या नदीचा उगम होतो. उगमापासून ईशान्येस ११२ किमी. वाहत जाऊन ड्रॉइडा शहराच्या पूर्वेस आयरिश समुद्राला ती मिळते. नदीचे पाणलोट क्षेत्र २,६९५ चौ. किमी. आहे. नदीप्रवाहाचे ढाळमान प्रति किलोमीटर फक्त १.२४ मी. आहे. म्हणजेच नदीचे खोरे सपाट आहे. ब्लॅकवॉटर (लांबी ६४ किमी.) ही प्रमुख उपनदी नॅव्हन (आनयूव्ह) येथे बॉइनला मिळते. डील, यलो या बॉइनच्या इतर उपनद्या आहेत. नदीखोऱ्यात लहान-मोठी सुमारे ४० सरोवरे आहेत. त्यांपैकी लॉख रूमॉर (क्षेत्रफळ २४८ चौ. किमी.) हे सर्वांत मोठे सरोवर आहे. ड्रॉइडाजवळील ओल्डब्रीज ते नॅव्हन यांदरम्यान मुख्य नदीप्रवाहाला समांतर असे अनेक कालवे काढले असून ते जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. नदीखोऱ्यात चुनखडक, शेल, वालुकाश्म व सिलूरियन प्रकारचे खडक आढळतात. बॉइनच्या खोऱ्यात शेती, मासेमारी, पशुपालन, दूधप्रक्रिया, पर्यटन इत्यादी व्यवसाय चालतात. ड्रॉइडा हे बॉइन नदीच्या मुखापासून आत ६.५ किमी. अंतरावर असून ते प्रमुख शहर आणि बंदर आहे. नॅव्हन हे नदीकाठावरील अंतर्गत भागातील दुसरे महत्त्वाचे शहर आहे. ड्रॉइडा आणि नॅव्हन या शहरांत उद्योगांचे केंद्रीकरण झाले आहे.

बॉइन नदी लांबीने छोटी असली, तरी तिला ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि पौराणिक पार्श्वभूमी मोठी आहे. नदीखोऱ्यातील नॉथ, न्यूग्रेंज आणि डॉथ या ठिकाणी नवपाषाण युगातील थडगी असून ती प्राचीन पुरातत्त्वीय दृष्ट्या महत्त्वाची आहेत. त्याशिवाय खोऱ्यातील इतरही अनेक ठिकाणी ऐतिहासिक व पुरातत्त्वीय दृष्ट्या महत्त्वाच्या वास्तू व भग्नावशेष आढळतात. नदीखोऱ्यातील टॅरा येथे आयर्लंडच्या राजाची प्राचीन राजधानी होती. प्राचीन काळापासून ही नदी ज्ञात असून ग्रीक भूगोलज्ञ टॉलेमी यांनी दुसऱ्या शतकात काढलेल्या आयर्लंडच्या नकाशात बॉइन नदी बोविंदा किंवा बोबिंदा या नावाने दाखविली होती. नदीचे बॉइन हे नाव मूळ नावाचे इंग्रजी रूप आहे. आयर्लंडच्या इतिहासातील बॉइनची लढाई महत्त्वपूर्ण असून ती इ. स. १६९० मध्ये या नदीच्या खोऱ्यातील ड्रॉइडाजवळ लढली गेली होती. ट्रिम, किल्डेअर, टॅरा, नॅव्हन, स्लेन, ड्रॉइडा इत्यादी प्राचीन स्थळे या नदीच्या काठावर आहेत. ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि पौराणिक पार्श्वभूमीमुळे या नदीच्या खोऱ्यात पर्यटन व्यवसाय वाढीस लागला आहे.

समीक्षक : वसंत चौधरी