गंगा नदीची एक प्रमुख उपनदी. लांबी ७८४ किमी. गुगल नकाशानुसार या नदीची लांबी ९३२ किमी. आहे. जलवाहन क्षेत्र सुमारे ७१,९०० चौ. किमी. छ्त्तीसगढ राज्यातील बिलासपूर जिल्ह्यात, मैकल डोंगररांगांमधील अमरकंटक या उच्चभूमी प्रदेशात सस. पासून १,०४८ मी. उंचीवर या नदीचा उगम होतो. हे उगमस्थान नर्मदा नदीच्या उगमस्थानापासून पूर्वेस अगदी जवळ आहे. त्यामुळे भूशास्त्रीय दृष्ट्या शोण खोरे म्हणजे नर्मदा खोऱ्‍याचेच विस्तारित खोरे आहे, असे मानले जाते. छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यांतून ही नदी वाहते. उगमानंतर बिलासपूर व शहडोल (मध्य प्रदेश) जिल्ह्यांतून उत्तरवायव्येस वाहत जाऊन पुढे एक वळण घेऊन ती पूर्वेस वळते. येथून पुढे नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेल्या कैमूर टेकड्यांच्या दक्षिणेकडून, या टेकड्यांना समांतर पूर्वईशान्य दिशेत वाहू लागते. प्रथम उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातून, त्यानंतर झारखंड-बिहार या राज्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाते. पुढे बिहार राज्यातून वाहत जाऊन बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहराच्या पश्चिमेस काही अंतरावर ती दक्षिणेकडून गंगा नदीला मिळते. ज्या कैमूर टेकड्यांना ही नदी समांतर वाहत जाते, त्या टेकड्या म्हणजे भूशास्त्रीय दृष्ट्या विंध्य पर्वताचाच विस्तारित भाग असल्याचे मानले जाते.

सुवर्ण, महाशोण, शोणभद्र, हिरण्यवाह (हिरण्यवाहू), सोनोस, सोहन इत्यादी नावांनी या नदीचे उल्लेख मिळतात. हिला सोन नदी असेही म्हणतात. नदीपात्रात सोन्यासारखी चमकणारी पिवळ्या रंगाची वाळू आढळत असल्यामुळे तिचे सुवर्ण किंवा शोण हे नाव पडल्याचे मानले जाते. या वाळूचा उपयोग बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. रामायणात तसेच पुराणांमध्येही या नदीचा उल्लेख आढळतो. अनेक फारशी, उर्दू आणि हिंदी कवींनी या नदीचे व तिच्यातील पाण्याचे वर्णन केलेले आहे. ब्रिटिश प्रशासक सर जॉन ह्यूल्टन यांनी शोण नदीचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘शोण नदी कैमूर श्रेणीतील तीव्र भृगु प्रदेशातून वाहत गेल्यानंतर पुढे मैदानी प्रदेशातून सरळ गंगा नदीपर्यंत वाहत जाते’.

जोहिला, बनास, गोपट, रिहांड, कनहार व उत्तर कोएल या शोणच्या प्रमुख उपनद्या आहेत. वरच्या टप्प्यात नदीचे उतारमान अधिक असल्यामुळे ती खळाळत वेगाने वाहते. नदी हंगामी असून तिचे पात्र रुंद, परंतु उथळ आहे. त्यामुळे ती जलवाहतुकीस उपयुक्त नाही. कोरड्या ऋतूत तिच्या पात्रात सर्वत्र वाळूचे आच्छादन आढळते. या काळात वाहणाऱ्‍या उष्ण पश्चिमी वाऱ्‍यांमुळे नदीच्या पूर्व काठावर वाळूचे नैसर्गिक बांध निर्माण झालेले दिसतात. मैदानी प्रदेशात तिचे बरेचसे पात्र साधारणपणे ३ ते ४.८ किमी. रुंदीचे आहे. पूर्वीच्या काळी नदीने पाचपेक्षा अधिक वेळा आपले पात्र बदलले आहे; परंतु डेहरी येथे इ. स. १८७३-७४ मध्ये बांधलेल्या अनिकट धरणामुळे, तसेच बिहारमधील रोहटास जिल्ह्यात १९६० च्या दशकात बांधलेल्या इंद्रपुरी (शोण) बंधाऱ्‍यामुळे नदीच्या पात्रबदलाला आळा बसला आहे. अनिकट धरण, शोण कालवा प्रणालीचे दोन कालवे आणि इंद्रपुरी बंधारा यांमुळे फार मोठे क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात बनसागर हे बहुद्देशीय धरण बांधण्यात आले आहे. याशिवाय शोण नदीच्या काही उपनद्यांवर धरणे बांधली आहेत. टेकड्यांच्या प्रदेशात होणाऱ्‍या मुसळधार पावसाच्या वेळी येणाऱ्‍या पुराचे पाणी एवढ्या मोठ्या रुंद पात्रातही मावू शकत नाही. त्यामुळे मुख्यत: शहाबाद, गया व पाटणा या जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण होते. ही नदी ज्या ज्या राज्यांतून वाहते त्या राज्यांत या नदीच्या पाणीवाटपाबाबत विवाद आहेत.

शोण नदीचे खोरे विरळ अरण्याचे तसेच विरळ लोकवस्तीचे आहे. अनुपपूर, चोपण, देवरी, रोहटासगढ, डेहरी, शोणभद्र आणि बिहटा ही या नदीच्या काठावरील प्रमुख नगरे आहेत. बिहारमधील भोजपुरी आणि मागधी (मगही) भाषिक प्रदेशांदरम्यानची ही नदी सीमारेषा बनली आहे. या नदीच्या खोऱ्‍यात असलेला अमरकंटक प्रदेश हे निसर्गसुंदर व जैवविविधतेने नटलेले नैसर्गिक वारसास्थळ आहे.

समीक्षक : माधव चौंडे