कळ : (१९९६). श्याम मनोहर यांची कादंबरी. श्याम मनोहर हे मराठीतील प्रयोगशील लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एकूण कादंबरी लेखनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून कळ या कादंबरीकडे पहावे लागते. ही कादंबरी आशय आणि रुपबंधाच्या पातळीवर रुढ संकेतबद्धतेला बगल देत नाविन्यपूर्ण प्रयोग करते. यामध्ये सूत्रबद्ध अशी गोष्ट नाही. कथेचीही अनेक वैशिष्ट्ये या कादंबरीत पहायला मिळतात. वैशिष्ट्येपूर्ण कथनरीतीचाही अवलंब त्यांनी केला आहे. कथनाच्या अनेक शक्यता त्यांनी या कादंबरीत आजमावलेल्या आहेत.
श्याम मनोहरांच्या एकूण कादंबरी लेखनात कळ या कादंबरीला अभ्यासकांनी केंद्रवर्ती स्थान दिले आहे. या कादंबरीत त्यांनी कथानक, पात्ररचना, निवेदन आणि भाषा अशा सर्वच आविष्कार घटकांच्या पार्श्र्वभूमीवर नवीनतम शक्यतांचा शोध घेतला आहे. या कादंबरीत रुढ असे कथानक नाही. कोणतेही नायकपात्र नाही. निवेदनाचे माध्यम म्हणून त्यांनी ‘मोटार गॅरेजवाला’ ही व्यक्त्तिरेखा वापरली आहे. त्याच्या जीवनविषयक दृष्टिकोणातून या कादंबरीची संरचना आकार घेते. त्याच्या मूल्यगर्भ जाणीवेतून ती प्रकटते. मोटार गॅरेजवाला ही व्यक्तिरेखा आणि ‘चरित्र-कळ’ या दोन गोष्टींनी कादंबरीची संहिता तोलून धरली आहे. या कादंबरीचा सगळा डोलारा या दोन गोष्टींवर आधारलेला आहे. त्यामुळे अनेक गोष्टींच्या योजनेमुळे विस्कळीत वाटणारी कादंबरीची संहिता तितकीच सुरक्षित वाटते. आशयाच्या पातळीवर समकालीन मध्यमवर्गीय समाज, मराठी साहित्य आणि वाङ्मयीन संस्कृती तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील हरवत चाललेल्या अस्सलपणावर, सृजनशीलतेवर प्रखर, भेदक भाष्य करते .
कळ या कादंबरीत ५६ भाग आहेत. प्रत्येक भागाचा निवेदक स्वतंत्र आहे. त्यामुळे निवेदकाचा आवाजही बदलत जातो. प्रथमपुरुषी, तृतीयपुरुषी, कधी मोटार गॅरेजवाला स्वत:च निवेदक असतो, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक प्रकरणानंतर येणार चरित्रकळचा भाग हे कथन नेमके कोणाचे या प्रश्नाचे उत्तर संदिग्ध आहे. कथनरुपातील हे बदल लक्षणीय आहेत. कित्येक भागामध्ये निवेदक संवादाचा अजिबात आधार न घेता स्वत:ची गोष्ट सांगतो. फँटसीचा वापरही श्याम मनोहर यांनी चाणाक्षपणे या कादंबरीत केला आहे. दृश्यात्मकता हाही त्यांच्या कथनशैलीचा एक महत्त्वाचा विशेष आहे. एकंदरीत कथनपध्दतीच्या अनुषंगाने श्याम मनोहर यांनी इतके लक्षणीय बदल केले आहेत की, त्यामुळे कादंबरीच्या रुपाची रुढ संकल्पना पूर्णत: खिळखिळी होते.
कळ मधील काळाचा विचारही महत्त्वाचा आहे. घटना घडून गेल्यानंतर निवेदन हे सामान्यत: कथनपर साहित्यात अपेक्षित असते. त्यामुळे घटना घडण्याचा एक काळ आणि तो कथन करण्याचा एक काळ असे काळाचे दुहेरी परिणाम कथनपर साहित्यात असतात. याला नैसर्गिक कालानुक्रम म्हणतात. कळमध्ये काळाचा वापर वेगळ्याच प्रकारे झाला आहे. कळमध्ये काळाच्या अनुपस्थितीमुळे फक्त अवकाशाचाच विचार झाला आहे. काळाच्या गोठवलेपणामुळे या कादंबरीतील काळ प्रवाही नाही. या काळास ‘शून्य काळ’ असे म्हणतात. काळाच्या अशा विलक्षण वापरामुळे श्याम मनोहर यांनी कादंबरीच्या रुपात मुलभूत बदल घडवला आहे.
या कादंबरीत अनेक प्रयोग झाले आहेत. संमिश्र निवेदन, काळाची हाताळणी, उपरोधिकता, संवाद विरहित कथन, दृश्यात्मकता अशा कथानात्मक विविध अंगाचा त्यांनी सर्जकपणे उपयोग केला आहे. या सर्वांतून त्यांनी समकालीन समाजव्यवस्थेतील विविध आयामांना स्पर्श करत त्यातील फोलपणा उघड केला आहे. हे सर्व आशय-आविष्कारातील प्रयोगामुळे शक्य झाले आहे. समकालीन मराठी कादंबरीतील कळ ही महत्त्वाची प्रयोगशील कादंबरी आहे.
संदर्भ : मनोहर, श्याम, कळ, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
समीक्षक : दत्ता घोलप