लॉईड स्टॉवेल शॅप्ले : (२ जून १९२३ – १२ मार्च २०१६). प्रसिद्ध अमेरिकन गणिती, अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्रविषयातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. वस्तू व सेवांच्या मागणी-पुरवठ्यात योग्य संतुलन राखून बाजारपेठा अधिक कार्यक्षम होण्याच्या दिशेने केलेल्या मूलभूत संशोधनासाठी शॅप्ले यांना २०१२ मध्ये अर्थशास्त्रज्ञ ॲल्विन इ. रॉथ (Alvin E. Roth) यांच्याबरोबरीने अर्थशास्त्रविषयातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. शॅप्ले यांचा भिन्न बाजारपेठांच्या वाढीसाठीचा मूलभूत सिद्धांत व रॉथ यांचे याबाबतचे संशोधन, प्रयोग व वास्तव आराखडा अशा कामगिरींसाठी दोघानांही नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे Royal Swedish Academyने या संदर्भातील आपल्या निवेदनात म्हटले.

शॅप्ले यांचा जन्म अमेरिकेच्या मॅसॅच्यूसेट्स राज्यातील केंब्रिज येथे झाला. त्यांचे वडील हॅरलो शॅप्ले प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते. शॅप्ले यांचे शालेय शिक्षण फिलिप्स एक्सेटर अकॅडमी येथे झाले. १९४८ मध्ये त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठातून गणितविषयात बी. ए. पदवी प्राप्त केली. तत्पूर्वी काही काळ त्यांनी चेंग्डू (चीन) येथे अमेरिकन सैन्याच्या हवाई विभागात काम केले. पुढे १९५३ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएच. डी. प्राप्त केली. त्यांचा पीएच. डी.चा प्रबंध व पश्चात संशोधनाने शॅप्ले मूल्यसिद्धांत व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विकसित केलेली क्रीडासिद्धांत (Game Theory) ही तंत्रे अधोरेखित झाली. १९५३-५४ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठात अध्यापन केल्यानंतर १९५४–१९८१ या काळात त्यांनी Rand Corporation या संस्थेत काम केले. त्यानंतर १९८१ पासून ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजल्स येथे अर्थशास्त्र व गणित या विषयांचा सन्माननीय प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत होता.

शॅप्ले यांनी निर्बंधित बाजारपेठांच्या प्रणाली, राजकीय क्रीडानीती, खर्चविभागणी आणि बाजारपेठांच्या संरचनापद्धती या विषयांवर संशोधन केले. त्यामुळे दोन भिन्न प्रकारच्या व्यक्तींच्या समूहामध्ये प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेळ कसा घालायचा, याबाबतचे मार्गदर्शन झाले. न्यूयॉर्क सिटी हायस्कूल्स व प्रवेश-इच्छुक ९०,००० विद्यार्थी, दरवर्षी पदवीधर होणारे २०,००० Doctors व अमेरिकेतील रुग्णालये यांत मेळ कसा घालायचा, असे व्यावहारिक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पद्धती किंवा ढाचे विकसित केले. शॅप्ले यांना क्रिडा व समन्वय नीती सिद्धांत या क्षेत्रांतील महनीय व्यक्तिमत्त्व मानले जाते.

शॅप्ले यांनी स्वत: व सहकाऱ्यांबरोबर लिहिलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : व्हॅल्युज ऑफ नॉन-ऑटोमिक गेम्स (१९६९–सहलेखन), थिअरी ऑफ गेम्स ॲण्ड इट्स ॲप्लिकेशन्स टू इकॉनॉमिक्स ॲण्ड पॉलिटिक्स (१९८१), स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी ॲण्ड गेम थिअरी : पेपर्स इन हॉनर्स ऑफ डेव्हीड ब्लॅकवेल (१९९६) व डायनॅमिक प्रॉपर्टीज ऑफ दि नॅश इक्विलिब्रीयम (१९९६).

शॅप्ले यांचे ‘स्टॉचॅस्टिक गेम्सʼ (१९५३), ‘कॉलेज ॲडमिशन्स ॲण्ड स्टॅबिलिटी ऑफ मॅरेजʼ (१९६२), ‘मार्केट गेम्सʼ (१९६९), ‘युटिलिटी कम्पॅरिझन ॲण्ड थिअरी ऑफ गेम्सʼ (१९६९), ‘लाँग टर्म कॉम्पिटिशनʼ (१९७४), ‘पोटेन्शियल गेम्सʼ (१९९६), ‘मल्टिपर्पज युटिलिटीʼ (२००८) हे शोधनिबंध महत्त्वाचे मानले जातात.

शॅप्ले यांना नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्यांच्या संशोधनकार्याबद्दल पुढील मानसन्मान लाभले : फेलो, इकॉनॉमेट्रिक सोसायटी (१९६७), फेलो, अमेरिकन आर्ट्स ॲण्ड सायन्सेस (१९७४), मेंबर, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (१९७९), जॉन वॉन न्यूमन थिअरी प्राइज (१९८१), सन्माननीय डॉक्टरेट हिब्रू विद्यापीठ, जेरुसलेम (१९८६), डिस्टिंग्विश्ड फेलो, अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन (२००७), फेलो, अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी (२०१२), गोल्डन गूझ अवॉर्ड (२०१३).

शॅप्ले यांचे अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील टस्कन येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा