श्री गुलाबराव महाराज : (६ जुलै १८८२—२७ सप्टेंबर १९१५). महाराष्ट्रातील विद्वान तत्त्वज्ञ, संत व थोर विचारवंत. त्यांचे पूर्ण नाव गुलाबराव गोंदुजी मोहोड असून त्यांचा जन्म अलोका व गोंदुजी या दांपत्यापोटी माधान या गावी झाला. विदर्भात अमरावतीच्या दक्षिणेस २१ किमी.वर लोणीटाकळी हे गाव श्रीमहाराजांचे आजोळ होय. वयाच्या नवव्या महिन्यात देवी येऊन डोळे आल्याचे निमित्त होऊन त्यांना कायमचे अंधत्व आले. वयाच्या चौथ्या वर्षी आई वारली. तेव्हा ते लोणीटाकळीहून माधान मुक्कामी परत आले. त्यांच्या ठिकाणी जबरदस्त स्मरणशक्ती व थोर प्रज्ञाशक्ती प्रगट झाली.
त्यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीतही अनेक सांस्कृतिक विषयांचा परामर्श घेतला आणि हिंदू संस्कृतीला उज्ज्वल करणार्या मूलभूत विचारांना योग्य दिशा दिली. सूक्ष्म, दूरस्थ व अलौकिक अशा सर्व विषयांत त्यांना गती होती. त्यांचे सीतारामजी भुसार या शेजार्याच्या मुलीशी लग्न झाले. तिचे नाव मनकर्णिका असून तिच्या सहवासात त्यांनी जीवन व्यतीत केले. लग्नाच्या वेळी त्यांचे उपनयन झाले; तथापि स्वत:ला ते शूद्र म्हणवून घेत. लक्ष्मणभट जोशी यांजकडून काही संस्कृत ग्रंथ ऐकूणच त्या गोष्टी पाठ केल्या. एका काजीकडून कुराणातील कलमे शिकले. रामराव मास्तरांनी श्रीमहाराजांना तोंडी हिशोब व पाढे शिकवले. श्रीमहाराजांची पाठशक्ती अद्भूत होती. शब्दरूपावली, लघुव्याकरण हे ग्रंथ मुखोद्गत करून त्यांनी संस्कृत भाषेत प्रवेश मिळवला. ज्ञानार्जनासाठी त्यांनी ग्रंथ खरेदिले. अल्पावधीत ते संस्कृत पंडित बनले आणि भजन करू लागले. तीर्थयात्रेच्या निमित्ताने त्यांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी, जगन्नाथपुरी आदी गावांची सफर केली.
श्रीमहाराजांचे तत्त्वज्ञान : सांख्य : सांख्यसुरेन्द्र, सांख्यसार, सांख्यनिरूपण, श्रीधरोच्छिष्टपुष्टि इत्यादी ग्रंथांतून श्रीमहाराजांनी सांख्य तत्त्वज्ञानाबद्दलचे विचार मांडले आहेत. सकृतदर्शनी सांख्यदर्शन मानीत नाही, असे वाटते; पण श्रीमहाराजांनी असा निष्कर्ष काढला आहे की, ‘ईश्वर नाहीच’ असे निश्चयात्मक विधान येथे कोठेच नाही. ईश्वराची सिद्धी अशक्य आहे इतकेच म्हटले आहे.
चोवीस तत्त्वे आणि पंचविसावा पुरुष अशी २५ तत्त्वांची ‘संख्या म्हणजे परिगणना’ करून सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम सांगितला असल्यामुळे या शास्त्राला सांख्य म्हणतात. हा अर्थ श्रीमहाराजांनी स्वीकारला आणि नवीन अर्थ पुढील श्लोकात व्यक्त केला.
सम्यक्ं ख्याति
सम्यक् ख्यातनरूपं सांख्यम् ।
सम्यक् – एवं ब्रह्म । तस्य ‘ख्या-कथन’ संख्या ।
… यद्यपि प्रकृतिमहदादीनां बहूनां तत्त्वानां गणकोSध्यात्मतत्त्वं
ब्रह्मैव सार, प्रकृतिमहदादीनि त्याज्यानि एव ।
इति मुमुक्षुकृपानिष्ठ: सन् ज्ञानप्रदानाय, इति भाव: ।।
“शुद्ध आत्मतत्त्वाच्या निर्गुण-निराकार साक्षीस्वरूपाचे ज्ञान सांगणारे शास्त्र ते सांख्यशास्त्र”, असे महाराजांचे मत आहे. अज्ञानवस्थेतील एका विशिष्ट सीमेपर्यंत त्यांनी सांख्यांची प्रकृती पुरुषबहुत्व हे सिद्धान्त स्वीकारले आणि ज्ञातृ-अवस्थेत सांख्याला वेदांताच्या जवळ नेऊन ठेवेले. हे करताना ईश्वरसिद्धीचीही भर घातली, तेसुद्धा सांख्यांच्या मूळ वचनांना धक्का न लावता.
योग : योगप्रभाव, निदिध्यासनप्रकाश, हिरण्ययोग, ध्यानयोगदिवाकर, योगांगयमलक्षण, कुंडलिनी, जगदंबा आणि सोपानसिद्धी हे श्रीमहाराजांच्या योगावरील आठ ग्रंथ होत. असंप्रज्ञात समाधि साधणे, हे योगदर्शनाचे ध्येय. ध्येय-ध्याता यांचे ऐक्य म्हणजे समाधि (योगप्रभाव पृ. २३). असंप्रज्ञात समाधिचे खालीलप्रमाणे तीन प्रकार आहेत :
- आपोआप व्युत्थान पावणारी असंप्रज्ञात समाधि : साधकाच्या सर्व प्रकारच्या वासनांचा क्षय झाल्यावर साधकाला समाधि लागू शकते. इथे श्रीमहाराजांना ईश्वरप्राणिधान न करणारा योगी अभिप्रेत आहे.
- दुसर्याद्वारे व्युत्थान पावणारी असंप्रज्ञात समाधि : इथे त्यांनी विष्णूच्या शंखनादाने व्युत्थित झालेल्या प्रल्हादाचे उदाहरण दिले आहे.
- व्युत्थानरहित असंप्रज्ञात समाधि : ज्ञानोत्तर पराभक्ती करणार्या अधिकारी योगी भक्ताचीच ती अवस्था असते. जीवेश्वरभेद संपूर्णतया नष्ट होणे, ध्येय-ध्याता यांचे जाणीवरहित ऐक्य साधणे म्हणजे ‘असंप्रज्ञात समाधि’ होय.
याच चिंतनप्रक्रियेतून त्यांनी ‘त्वंपदनिष्ठ’ आणि ‘तत्पदनिष्ठ समाधि’ हे दोन प्रकार नव्याने मांडले आहेत. त्वंपदनिष्ठतया आत्मरूपे समाधि: आणि तत्पदनिष्ठतया प्रेमरूपे भगवति समाधि: असे म्हणून तयो: रक्षणं तु महावाक्यनिष्ठता असेही त्यांनी आवर्जून सांगितले. हे सर्व नवीन प्रकार त्यांनी उकलून दाखविले आहेत.
न्याय-वैशेषिक : न्यायसूत्र आणि युक्तितत्त्वानुशासनम् हे दोन ग्रंथ अपूर्णच राहिले. वस्तुत: मोक्षप्राप्ती किंवा पराभक्ती यासाठी या दोन्ही शास्त्रांचा फारसा उपयोग नाही; पण ब्रह्मप्राप्तीसाठी अनुमानाच्या साहाय्याने मनन करावे आणि श्रुतिसंमत तर्काच्या साहाय्याने विचारातले दोष दूर करावेत, असा विचार श्रीमहाराजांनी मांडला आहे.
पूर्वमीमांसा : वेदांच्या पूर्व भागात यज्ञयागादि कर्मकांड आहे आणि उत्तर भागात औपनिषदिक तत्त्वज्ञान आहे. दु:खनिवृत्ती आणि अखंड सुखप्राप्ती व परमपुरुषार्थ खरा; पण जोपर्यंत जीव संसारालाच सुख मानतो, तोपर्यंत त्याला मुक्तीचा मार्ग उपयोगाचा नाही. म्हणून ऐहिक सुखांपेक्षा स्वर्गसुख श्रेष्ठ आहे, असे सांगून जीवाला स्वर्गादी फलांकडे प्रवृत्त करण्याचे काम पूर्वमीमांसा करते. नंतर ‘क्षीणे पुण्ये मर्त्यलोक विशन्ति’ हे जाणल्यावर अखंड सुख फक्त आत्मज्ञानाने लाभेल ही भावना बळावली की, वेदान्ताचे काम सुरू होते. पूर्व अंगातून उत्तर अंगात प्रवेश हेच पूर्वमीमांसेचे फलित होय. “शब्दप्रधान वाक्यांचा पूर्वमीमांसेत विचार असून अर्थप्रधान वाक्यांचा उत्तरमीमांसेत विचार आहे.” त्यांनी हे सिद्ध केले की, नामस्मरण कर्त्तंत्र नसून वस्तुतंत्रच आहे. मीमांसेतल्या यज्ञीय हिंसेचे तात्पर्य शेवटी अहिंसेतच होते, हेही त्यांनी युक्तिवाद आणि विपुल प्रमाणवचने देऊन दाखवून दिले आहे.
वेदान्त : ही पाचही दर्शने पोषक होतात ती वेदान्तालाच. म्हणून वेदान्तदृष्टीने श्रीमहाराजांनी या सर्व दर्शनांचा समन्वय साधून दाखवला आहे आणि अद्वैत वेदान्ताच्या मूल्यवान शिरपेचाला पराभक्तीच्या भावसमृद्धपणाची जोड देऊन विलक्षण सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. या समन्वयाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे त्यांनी वेदान्ताला दिलेली ‘अनध्यस्तविवर्ता’ची नवीन संकल्पना.
शांकरज्ञान भगवद्भक्ति अलंकृतम् ।
यद्वाक्यं तम्प्रमाणं स्यदिति स्वमतनिर्णय ।।
श्रीमहाराजांनी प्रेमनिकुंज या ग्रंथात वेदान्ताचे ११ पूर्वपक्ष मांडून शेवटी भक्तिसिद्धांताचा निष्कर्ष काढून त्याला ‘अनध्यस्तविवर्त’ या संज्ञेने संबोधले आहे.
अनध्यस्तविवर्त : शंकराचार्यांच्या अद्वैताचा पूर्ण रूपाने स्वीकार करून अनध्यस्तविवर्त ही नवी संज्ञा, नवी परिभाषा वेदान्ताला श्रीमहाराजांनी दिली. प्रीतिनर्तन, निदिध्यासनप्रकाश, भगवद्भक्तिसौरभ, प्रेमनिकुंज इत्यादी ग्रंथांतून हा विषय त्यांनी अत्यंत विस्ताराने खंडनमंडनपूर्वक मांडला आहे.
अध्यस्तविवर्त : या संकल्पनेत जग हे अध्यस्तविवर्त असून त्याला अधिष्ठानरूप असलेल्या परब्रह्माचे ज्ञान झाले की, जगाची निवृत्ती होते; पण अध्यस्तविवर्त अज्ञानजन्य असतो म्हणून ज्ञानाने तो निवृत्त होतो.
तत्त्वमसि : ज्ञानानंतर भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी व्यतिरेकानंतर अन्वय प्राप्त करून घ्यावी याचे भक्तिपदतीर्थामृत ग्रंथात सविस्तर विवेचन केले आहे.
या माधुर्यभक्तीचे म्हणजे पराभक्तीचे १६ प्रकार नव्याने श्रीमहाराजांनी मांडले आहेत. त्यात श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य व संख्य या नवविधा भक्ती असून पुढे लालन, वात्सल्य व माधुर्य अशा चढत्या श्रेणी आहेत. शेवटचे गुप्त संयोग, स्पष्ट संयोग, गुप्त वियोग व स्पष्ट वियोग हे माधर्यरूपी पराभक्तीचे चार प्रकार असून ही भक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. या भक्तीत विषयवासनेचा किंवा शारीरिक प्रेमाचा अंशही नसतो.
मधुराभक्ती : ‘मधुराद्वैताचार्य’ म्हणूनच ख्यातनाम झालेल्या श्रीगुलाबराव महाराजांनी मधुराद्वैत भक्तीविषयी समाजात असलेला वैचारिक गोंधळ पूर्णपणे दूर सारला आहे.
भक्ताच्या अंत:करणातील वृत्ती जेव्हा सगुण भगवंताला आलंबन घेऊन उठतात, तेव्हा तिला भक्ती म्हणतात. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य व सख्य हे आठ प्रकार ज्ञानपूर्व उपासनेचे म्हणजे गौणी भक्तीचे असून आत्मनिवेदनातील अहंतासमर्पण व ममतासमर्पण आणि लालन व वात्सल्य असे चार प्रकार जीवब्रह्मैक्यरूपी समाधी साधल्यानंतरचे म्हणजे ज्ञानोत्त्तरभक्तीचे आहेत, हिला ‘मध्यमाभक्ती’ म्हणतात. ‘सएवाहं’ या समानाधिकरणाला माधुर्याची जोड दिली की, गुप्त संयोग, स्पष्ट संयोग, गुप्त वियोग व स्पष्ट वियोग असे चार प्रकार माधुर्यरूपी पराभक्तीचे होतात. एकूण असे सोळा प्रकार जरी गौण श्रेष्ठ असले, तरी पराभक्ती मिळाल्यानंतर मात्र हे सर्व वृत्तिभेद परमप्रेमाचेच उन्मेष होऊन जातात.
- गुप्त संयोगरूपी माधुर्यभक्ती : भक्त आपल्या हृदयसंपुटात भगवंताचा साक्षात्कार करून घेतो; पण बाहेर मात्र सार्या संसारात त्याला दु:ख देणारे वैरी दिसतात.
- स्पष्ट संयोगरूपी माधुर्यभक्ती : हृदयातील भगवंत साक्षात्कार बाहेरदेखील अनुभवला जातो, हाच अन्वयानुभव होय. हृदयातले वियोग प्रेम म्हणजे गुप्त विप्रलंभ उत्कटतेला पोहचले की, मग स्पष्ट विप्रलंभनाची वार्ता दिसू लागते.
- गुप्त विप्रलंभरूपी माधुर्यभक्ती : गुप्त विप्रलंभ म्हणजे हृदयातील भगवंत मूर्तीचा वियोग होणे. रासक्रीडेमध्ये गोपींना किंचित अभिमान झाला.
- स्पष्ट विप्रलंभ माधुर्यभक्ती : अंतर्बाह्य सर्वत्र भगवंताचा वियोग अनुभवायला येणे म्हणजे स्पष्ट विप्रलंभ होय.
समन्वयपद्धती : श्रीमहाराजांनी उत्तम, मध्यम, अधम व अधमाधम असे समन्वयाचे मुख्य भेद करून त्याचे उत्तम, उपतीव्य-उपजीवक, उपेक्षारूप, अलिप्ततामूलक, शिखर, प्रयोजन, ऐतिहासिक, क्लिष्ट व अधमाधम असे नऊ प्रकार केले आहेत. त्यांपैकी त्यांनी उत्तम व मध्यम समन्वय यांनाच महत्त्व दिले आहे.
श्रीमहाराजांनी केलेली समन्वयाची व्याख्या : सर्व संप्रदायाचा आधार एक आहे, मात्र वृत्ती भिन्नभिन्न आहेत. सर्व संप्रदायांचा समन्वय केला, तरी कोणत्याही संप्रदायपरंपरांचा विच्छेद होत नाही. उलट, सर्व संप्रदायानुसार त्यांना अपेक्षित असलेली अनेक भिन्न भिन्न फले सर्वांना प्राप्त होऊन शेवटी एकच ईश्वरप्राप्तिरूप फल सर्वांना प्राप्त होते, हे लक्षात घेणे म्हणजे समन्वय करणे होय.
श्रीमहाराजांनी सर्व धर्मांना मूळ असलेले सर्वांगपूर्ण आणि अगदी सोपे असे लक्षणे सांगून नंतर दुसरे ठिकाणी सर्व धर्माचे आधारसूत्र मांडले आहे.
सत्त्ववृद्धिर्भवेद येन अन्य गणुद्वयघातिनी ।।
स ही धर्मो न चान्य: स्वादिति स्वमतनिर्णय ।।५।।
हे धर्माचे मूळ तत्त्व सर्व धर्मांना तंतोतंत लागू पडते. या धर्मलक्षणातून महाराजांनी जगातील सर्व धर्मांना नवे योगदान दिले आहे. साधुबोधात महाराज म्हणतात की, ‘‘धर्माचा निर्विकार पद्धतीने विचार करणारा, शूद्रवर्णात सृष्टीमध्ये मी एकटाच आहे, असे पक्के समज.’’ या प्रखर आणि दृढ धर्माची तत्त्वमीमांसा त्यांनी त्यांच्या संप्रदाय सुरतरू या ग्रंथात विस्तारपूर्वक मांडली आहे. ती सर्वधर्मसमन्वयवाद्यांना उपयुक्त ठरते.
नीतिशास्त्र : पाश्चात्त्यांच्या १) आप्तवचन (Athority), २) अंत:स्फूर्ती (Intution), ३) बहुपयोगिता (Utility) आणि ४) विकासवाद (Evolution) या चारही मतांचे श्रीमहाराजांनी खंडन केले आहे. मात्र पाश्चात्त्यांच्या ग्राह्य भागाचा भारतीय नीतित्त्वांशी समन्वयही करून दिला आहे. जीवाने स्वत: परमेश्वर स्वरूप होऊन जगताच्या कारणात मिळूण जाणे, हे भारतीय विचारसरणीचे ध्येय असल्यामुळे परमार्थ मार्गावरील पथिक हाच डोळ्यासमोर ठेवून धर्म आणि नीती यांचा विचार भारतीय शास्त्रांमध्ये केला आहे. एकंदरीत धर्म आणि नीती यांची घातलेली सांगड श्रीमहाराजांनी स्पष्ट केली आहे.
पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा परामर्श घेताना श्रीमहाराजांनी डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचा अज्ञेयवाद, अणुवाद, संशयवाद इत्यादी पाश्चात्त्य मतांची चिकित्सा भारतीय न्यायघटीत तर्कपद्धतीने लावून डार्विनच्या उत्क्रांतिवादाचे खंडन करून ते म्हणतात की, ‘‘केवळ उत्क्रांती मानणे हे बुद्धीला पटण्यासारखे नाही. उत्क्रांती आणि अपक्रांती दोन्ही होत असतात. म्हणून परस्पर सहकार्याची भावना वाढणे, द्वेष कमी करणे, विकार नाहीसे करणे, विकारांवर विचारांचा ताबा मिळवणे, ही भारतीयांची उत्क्रांतीची संकल्पना आहे आणि ती डार्विन, स्पेन्सर यांच्या मतानुसार नैसर्गिक होत नसून प्रयत्नपूर्वक होत असते.”
संगीतशास्त्र : श्रीमहाराजांनी गानसोपान हा ग्रंथ लिहून संगीतशास्त्रात नवी भर घातली आहे. त्यांनी मातंगमुनीसारख्या संगीतशास्त्रकारांचा परामर्श घेऊन आपल्या संगीतविषयक चिंतनातून परंपरेला धरून असलेले पण आजच्या संगीतविषयक रागदारीच्या नवीन धारणांनाही स्वीकारणारे नवे योगदान समजावून घेणे अगत्याचे आहे, हे स्पष्ट केले. सामवेदीय संगीत, मार्गी संगीत, देशी संगीत आणि भक्तीने परतत्त्वांचा स्पर्श लाभलेले संगीत ही त्यांची संपल्पना संगीतशास्त्राला नवे योगदान आहे. काव्याने रस, छंदाने ताललालित्य, स्वराने हृदयरंजन आणि अर्थाने मोक्ष हे श्रीमहाराजांनी गानसोपानात सांगितलेले प्रयोजनचतुष्ट्य भारतीय संगीताच्या तत्त्वज्ञानाचा गाभा स्पष्ट करते.
काव्यशास्त्र : काव्यसूत्रसंहिता हा श्रीमहाराजांचा लहानसा सूत्रग्रंथ असून त्यात काव्यसामुग्री, कविलक्षण, स्फूर्तिप्रयोजन, लक्षणपाद असे विभाग आहेत. सर्वनामरूपतामक सृष्टीच्या अंतर्गत असलेल्या ईश्वराच्या स्वरूपाचा अनुभव आणून देणारे तेच खरे काव्यलक्षण होय. ‘विकार व विचार यांचे ऐक्य म्हणजे स्थायिभाव’, हा सिद्धांत त्यांनी या सूत्रग्रंथात मांडला. काव्यशास्त्रातील सूक्ष्म धागे उलगडून दाखविताना त्यांनी वैदिक आणि पौराणिक परंपरेचा धागा सोडला नाही.
इतिहास : पाश्चात्त्यांनी भारतीय इतिहासाची केलेली विकृती पाहून श्रीमहाराजांनी इतिहासाची आर्यसंमत मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. १) आर्य हा वंश नसून संस्कृती आहे. २) आर्य भारतात बाहेरून आले नाहीत. ३) शूद्रवर्ण आर्याचाच एक भाग आहे. ४) आर्यसंस्कृती प्राचीन काळी विश्वात पसरली होती, हे सिद्ध केले. सुसंस्काराचे दान म्हणजे शिक्षण या शैक्षणिक निकषानुसार लिहिला गेलेला खरा इतिहास भारतीय संस्कृतीत प्रमाण मानला जातो. श्रीमहाराजांचे वाङ्मय ऐहिक व पारमार्थिक अशा उभय विषयांवर आहे. खरा धर्म कोणता? तो कोणापासून समजून घ्यावा? सर्व धर्मांत हिंदू धर्म श्रेष्ठ कसा? हे अनेक ग्रंथांद्वारे त्यांनी सुलभ व बिनतोड रीतीने प्रतिपादले आहे. त्यांचे ग्रंथ म्हणजे ज्ञानकोशच होय. द्वैताद्वैत, कर्म, भक्ती, ज्ञान, योग व वैराग्य या सर्वांचे एकचित्त दर्शन त्यांच्या ग्रंथांत घडते.
त्यांनी दिलेली सत्त्वसंपन्न भारतीय जीवनमूल्यांची तर्कशूद्ध चौकट हीच भावी काळाला मार्गदर्शक ठरणार आहे.
श्रीगुलाबराव महाराजांची ग्रंथसंपदा (य = यष्टी= खंड) :
सूत्र ग्रंथ : १) अन्तर्विज्ञानसंहिता – (सं) य १६, २) ईश्वरदर्शन – (सं) य १६, ३) समसूत्री – (सं) य १६, ४) दुर्गातावम् – (सं) य १६, ५) काव्यसूत्रसंहिता – (सं) य १६, ६) शिशुबोध व्याकरण – (सं) य १६, ७) न्यायसूत्राणि – (सं) य १६, ८) एकादशीनिर्णय: (सं) य १६, ९) पुराणमीमांसा – (सं) य १६,
आकार ग्रंथ : १०) संप्रदाय सुरतरू – य ११,
भाष्यग्रंथ : ११) नारदीयभक्त्याधिकरण न्यायमाला – (सं) य १६, १२) भक्तिसूत्रभाष्यम् – (सं) य १६, १३) भक्तिसूत्रभाष्यम भाष्य – (सं) य १६, १४) प्रियलीलामहोत्सव निमंत्रणविलास – य ३, १५) प्रियलीलीमहोत्सव आमंत्रणविलास – य १४, १६) श्रीधरोच्छिष्टपुष्टि: – (सं) य १६, १७) श्रीधरोच्छिष्टपुष्टिलेश: – (सं) य १६, १८) ब्रह्मसूत्रव्याख्या – य १५, १९) निगमांतसुभा – य १५, २०) ब्रह्मसुत्रांवर निरूपणे – य १८, २१) भववद्गीतासंगति – य १, २२) मनोहारिणी (हिंदी) – य १८, २३) गीतेवरील निरूपणे – य १७, २४) गीतेवरील प्रवचने – य १७, २५) गीतेवरील निरूपणे – य १८, २६) गीतेवरील स्फुट निरूपणे – य १८, २७) ऐश्वर्यार्थदीपिका (ईश्वरगाथा) – य १५, २८), षट्पद्ध्वनि: – (सं) य १६, २९) ईशावास्योपनिषद् (सं) य १६, ३०) ऋग्वेदटिप्पणी – (सं) य १६, ३१) योगवासिष्ठ तत्त्व – य १७, ३५) योगवासिष्ठ निरूपणे – य १८,
शास्त्रग्रंथ : ३६) सुखवरसुधा – य १३, ३७) वेदान्तपदार्थोद्देशदीपिका – य १३, ३८) शास्त्रसमन्वय: – (सं) य १६, ३९) आगमदीपिका – (सं) य १६, ४०) युक्तितत्त्वानुशासनम् – (सं) य १६, ४१) प्रेमनिकुंज – य १०, ४२) शांतिसुधाकर – य २, ४३) वेदान्तप्रक्रियासमुच्चय – य १५, ४४) वेदान्तनिरूपण – य १५, ४५) तत्त्वबोध – (सं) य १६, ४६) षड्दर्शनलेश संग्रह – (सं) य १६,
भक्तिग्रंथ : ४७) भक्तिपदतीर्थामृत – य १, ४८) निगमांतपथसंदीपक – य १, ४९) भगवद्भक्तिसौरभ – य २, ५०) प्रीतिनर्तन – य २, ५१) नित्यतीर्थ – य २, ५२) प्रिय पाहुणेर – य र, ५३) भक्तितत्त्वविवेक – (सं) य १६, ५४) प्रियप्रेमोन्माद – (सं) य १६, ५५) गोपिकापादपीयूषलहरी – य १५, ५६) गोविंदानंदसुधा – (सं) य २,
योग : ५७) निदिध्यानसनप्रकाश – य १, ५८) ध्यानयोगदिवाकर – य २, ५९) सोपानसिद्धी – य २, ६०) हिरण्ययोग (स्वप्नयोग) – य २, ६१) योगप्रभाव (पद्य) – य १५, ६२) योगप्रभाव १ व २ (गद्य ), ६३) ज्ञानेश्वरी निरूपण – य १५,
संख्य : ६४) सांख्यसुरेंद्र – य १४, ६५) सांख्यसूत्रावरील विचार – य १५, ६६) सांख्यग्रंथ्सार एक निबंध – य १५, ६७) सांख्यसार – य १८,
संगीत : ६८) छंद प्रदीप – य १५, ६९) गानसोपान – य १५,
आयुर्वेद : ७०) मानुसायुर्वेद – (सं) य १६, ७१) मानुसायुर्वेद – य १५, ७२) भिषग्रिदशचीप्रभा – (सं) य १६, ७३) वैद्यवृंदावन वैद्यनंदिनी,
प्रकरणग्रंथ : ७४) स्वमतनिर्णय: – (सं) य १६, ७७) कांतकांतावाक्यपुण्यम् – (सं) य १६, ७८) चित्तोपदेश – य १, ७९) सद्वैजयंती – य २, ८०) बाराखडी – य, ८१) त्रिकांडसार – य २, ८२) प्रमादकल्लोळ – य १५,
गाथा : ८३) अभंगांची गाथा – य ९, ८४) पदांची गाथा – य ९,
निबंध : ८५) अलौकिक प्रवास – य २, ८६) अमोघ निरूपण – य २, ८७) बौद्ध निबंध – य १५, ८८) वेदान्तनिरूपण – य १५, ८९) सिद्धीसार – य १८, ९०) अलौकिक व्याख्यानमाला – य ५, ९१) युक्त्या – य १७, ९२) गुरूचरणकौमुदी – य १८, ९३) निरूपण – य १८,
संवाद : ९४) साधुबोध – य १८, ९५) मणिमंजुषा – य २, ९६) सुवर्णकण – य १७, ९७) स्वमतव्यांश-सिद्धान्ततुषार – य ६, ९८) दुर्मतहृदयभंजन – य १५, ९९) प्रश्नोत्तरे – य १५, १००) वृत्तिक्षीरसागर – य १५, १०१) बालबुद्धिविवर्धिनी – य १७,
पत्रे ११७ : १०२) अकरा पत्रे – य १, १०३) वीस पत्रे – य २, १०४) अडतीस पत्रे – य ७, १०५) सत्तेचाळीस पत्रे – य १२, १०६) एक पत्र – य १५,
लोकगीते : १०७) स्त्रीगीते – य ४, १०८) स्त्रीगीत संग्रह – य ४, १०९) तुंबडी – य २, ११०) रूक्मिणी स्वयंवर – य ९, १११) रूक्मिणी पत्रिका – य ९,
स्तोत्र : ११२) ज्ञानेश्वर –मातृपितृ-भावनाष्टक – य २, ११३) कृष्णपंचपदी – य २, ११४) गुरूपंचपदी – य २,
चरित्र-आख्याने : ११५) आत्मचरित्र – य १६, ११६) सूचना प्रकरण – य १, ११७) सूचना प्रकरण – य २, ११८) अभंगात्मक १९ आख्याने – य ९, ११९) पदात्मक ८ आख्याने – य ९, १२०) पतिव्रताचरितामृत – य १५,
विविधरचना : १२१) सुखपर्व (नाटक) – य १५, १२२) मात्रामृतपानम् – (सं) य १६, १२३) पत्नीप्रेमपराग – य २, १२४) नवीन भाषा – नावंग – य १६, १२५) शब्दकोश – य १५, १२६) सांकेतिक भाषा (लघुलिपी), १२७) मोक्षपट (क्रीडा ), १२८) हरिपाठाच्या प्रतिज्ञा, १२९) शिक्षण रत्नाकर (अप्रकाशित).
संदर्भ :
- Kopardekar, Sharad D. Gulabrao Maharaj : A Biography, Bharatiya Vidya Bhavan, Pune, 1985.
- काशीकर श्री. गो. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे विचार वैभव, नागपूर, २०००.
- घटाटे, कृष्ण माधव, भक्तिशास्त्र, चांदूर, १९८१.
- घटाटे, कृष्ण माधव, श्री. गु. म. अन्वेषिता विश्वव्यापिनी हिंदू संस्कृती, पुणे, २०००.
- त्रिपुरवार, कै. राजेश्वरशास्त्री, श्रीगुलाबराव महाराज यांचे चरित्र्य, अमरावती, २०००.
- पंडित, राम, श्रीगुलाबराव महाराज विभूती आणि साहित्य, मुंबई, एप्रिल-१९९९.
- पंडित, वेदान्तकेसरी बाबाजी महाराज, अमृतानुभव-कौमुदी, मुंबई, १९९९.
- राजेश्वर, मिलींद, श्री गुलाबराव महाराज यांचे चरित्र, अमरावती, २०००.
- शेवडे, सच्चिदानंद, ज्ञानेश्वरकन्या गुलाबराव महाराज, गंधर्व-वेद प्रकाशन, पुणे, २०१०.
समीक्षक : उषा गडकरी