महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ. केवळ एकाच जिल्हयासाठी निर्मिती झालेले विद्यापीठ, अशी या विद्यापीठाची ख्याती आहे. विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र राज्य शासकीय अधिनियम यू. एस. जी. – १००४ (९४१२००४) यान्वये १ ऑगस्ट २००४ रोजी सोलापूर येथे झाली. तत्पूर्वी १९८४ पासून शिवाजी विद्यापीठाचे येथे पदव्युत्तर अध्ययन केंद्र होते. याच्या कार्यक्षेत्रात केवळ सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालये अंतर्भूत होतात. ‘विद्यया संपन्नता’ हे विद्यापीठाचे बोधवाक्य असून सोलापूरचे प्रसिद्ध कवी कै. दत्ता हलसगीकर रचित ‘ज्ञानरुप देव धर्म जीवनी असो’ हे विद्यापीठाचे विद्यापीठ गीत आहे. डॉ. इरेश स्वामी हे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू होते.

इतिहास : पूर्वी सोलापूर जिल्हा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या विद्यापीठाशी संलग्नित होता. कोल्हापूर या ठिकाणी शिक्षणासाठी सोलापूरवरून जाणे-येणे आर्थिक व मानसिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना न परवडणारे असल्याने शिक्षणापासून अनेक विद्यार्थी वंचित राहात होते. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन वैश्विक घडामोडींविषयी जाणीव करून देण्याचा शासनाचा उद्देश होता. तसेच चांगल्या व्यवस्थापनासाठी शिक्षणाची विभागणी करणे आवश्यक होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने सोलापूर विद्यापीठाची निर्मिती केली. विद्यापीठाची सुरुवात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे विभागीय केंद्र असलेल्या केगांव या ठिकाणी झाली. केगांव हे ठिकाण सोलापूरपासून ९ किमी. अंतरावर असून ते सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आहे. ६ मार्च २०१९ रोजी सोलापूर विद्यापीठाचे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर’ असे नामकरण करण्यात आले.

विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या सुमारे २०७ हे. जमिनीचे तीन भागांत विभाजन करण्यात आले असून प्रत्येक प्रशालेसाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत. विद्यापीठ क्षेत्र एकूण ३५.५ एकर परिसरात असून महाराष्ट्र शासनाने विद्यापीठास ५०० एकर जागा दिली आहे. विद्यापीठ परिसरामध्ये विविध शैक्षणिक विभाग, मुलींचे वसतीगृह, विद्यापीठ कँटीन, अतिथी निवासस्थान अशा विविध सोयी-सुविधा आहेत. विद्यापीठाशी संलग्नित सुमारे १०८ महाविद्यालये असून त्यांमधील २ महाविद्यालये स्वायत्त आहेत. या सर्व महाविद्यालयांतून सुमारे ६५,००० मुलेमुली अध्ययन करित आहेत (२०२०-२१).

दृष्टीक्षेप : संशोधन, अध्यापन कौशल्य आणि उत्तम कार्यपद्धतीद्वारे विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता समृद्ध करणे, हे विद्यापीठाचा दृष्टीक्षेप आहे.

मिशन : जागतिक आणि स्थानिक स्रोतांच्या आधारे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विविध क्षेत्रांमध्ये सक्षम बनविणे आणि त्यांच्यात शक्तीसमृद्ध करणे, हे उद्दिष्ट समोर ठेवून विद्यापीठाद्वारे विविध ध्येयांची निश्चिती करण्यात आली आहे.

ध्येये :

  • बदलत्या जगात आपल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक जीवन, नेतृत्व आणि नागरिकत्व मिळवून देणारी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची गुणवत्ता वेळो वेळी सुधारत राहणे.
  • आर्थिक दृष्ट्या अपंग व वंचितांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.
  • विद्यार्थ्यांची विद्याशाखेमध्ये सुधारणा करणे; तसेच विद्याशाखेस बळकटी निर्माण करण्यासाठी एकात्मित पद्धती आणि पायाभूत सुविधेचा वापर अनुकूल बनविणे.
  • भारतीय संस्कृतीच्या गुणविशेषांनुसार जागतिक स्तरावर विद्यार्थी तयार करणे.
  • विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक आणि सामाजिक स्तरातील व्यक्तींमध्ये आत्मशिस्त आणि उच्च नैतिक निकष तयार करणे.
  • स्वयंप्रेरित आणि समर्पित संशोधकांना एकत्रित बांधणे.
  • शैक्षणिक जगातील घडामोडींच्या अनुषंगाने अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती स्वीकारण्यासाठी, तसेच उद्योग व वाणिज्य क्षेत्रांतील विकासासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविणे आणि समर्थन देणे.
  • शोधनाभिमुख आणि कुशल प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पोषक व सक्षम वातावरणात त्यांची कौशल्ये, शैक्षणिक बुद्धी, उद्योजकीय कौशल्ये आणि नवकल्पना असलेल्या विद्यार्थ्यांना नॉलेज प्रोफेशनलमध्ये रूपांतरित करणे.
  • शिक्षण आणि शिष्यवृत्ती यांसाठी वातावरण तयार करणे.
  • सध्याच्या आणि पुढील पिढीसाठी फायदेशीर अध्यापन, शिक्षण आणि विस्तार क्रियाकल्पांचे राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्टता केंद्र बनविणे इत्यादी.

शैक्षणिक संकुल : विद्यापीठांतर्गत रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, भूशास्त्र, संगणकशास्त्र, सामाजिकशास्त्रे, वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र, भाषा व वाङ्मय, तंत्रज्ञान, ललित कला व कलाशास्त्र आणि अलाइड सायन्स ही शैक्षणिक संकुले असून या संकुलांतर्गत पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन विषयी शिक्षण दिले जाते. एम. फिल. व पीएच. डी. या पदव्यांच्या अध्यापनाची-मार्गदर्शनाची सोय येथे आहे. त्याच बरोबर विद्यापीठाद्वारे शिक्षक मान्यता विभाग, वेगवेगळ्या कृती, शैक्षणिक संशोधन आणि विकासांतर्गत कौशल्य विकास केंद्र, पेट परीक्षा, शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखा इत्यादी विभागांचे कार्य चालते.

कौशल्य विकास केंद्र : विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा विकास व्हावा याकरिता विद्यापीठाने २००५-०६ मध्ये जनविकास केंद्राची स्थापना केली. समाजातील इच्छुक नागरिकांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणाची सोय व्हावी, हा विद्यापीठाचा हेतू होता. आज या केंद्राद्वारे प्रमाणपत्र व पदविका, तांत्रिक कौशल्य, संगणक कौशल्य, रुग्णसेवा (पॅरामेडीकल) इत्यादी अभ्यासक्रम राबविले जातात. जनविकास केंद्राचे २० एप्रिल २०१७ रोजी कौशल्य विकास केंद्र असे नामांकन झाले आहे.

उपक्रम : विद्यापीठांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. त्यांमध्ये आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य सेवा-सुविधा, तसेच आरोग्यविषयक जनजागृती कार्य केले जाते. सेट-नेट परीक्षांचे आयोजन, सेमिनार, चर्चासत्रे, कार्यशाळा, अनुसूचित जाती-जमातींतील विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट, पुणे (बार्टी) या संस्थेने दिलेल्या वित्तीय साहाय्याच्या आधारे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या परीक्षांना बसणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी साधनसिद्धता वर्ग (कोचिंग क्लासेस) सुरू केले आहेत. तसेच युजीसी अंतर्गत चालविले जाणारे ऑनलाईन सेवांतर्गत शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते.

अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकन : विद्यापीठ हे विद्यार्थीकेंद्री असून येथे अध्ययन-अध्यापनासाठी योग्य प्रणाली राबविल्या जातात. विद्यापीठाद्वारे काळानुरूप अभ्यासक्रमांची निर्मिती केली जाते. आवश्यक त्या सोयी-सुविधांचा वापर करून मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाते.

ग्रंथालय : विद्यापीठाचे स्वतंत्र रंगभवन-ग्रंथालय असून ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचा वापर संशोधक, मार्गदर्शक, विद्यार्थी, प्राचार्य इत्यादी करतात. ग्रंथालयात एकूण ३९,७५८ ग्रंथ, २५ विविध वर्तमानपत्रे, १,४०६ प्रबंध व लघुसंशोधने, ३,२४५ भेट पुस्तके, ११६ नियतकालिके, ८४६ सी. डी., ९० राष्ट्रीय आणि १९ आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल उपलब्ध आहेत. डिजीटल विद्यापीठ म्हणून सर्वत्र प्रसिध्द असून विद्यापीठात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ई स्रोतांचा समावेश आहे. ग्रंथालयात ११५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असलेले अभ्यासिका कक्ष आहे. ग्रंथालयांतर्गत विद्यापीठ अभ्यासकेंद्राची सुविधा दिली जाते. हे अभ्यासकेंद्र विद्यार्थ्यांसाठी सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत खुले असते.

सोलापूर विद्यापीठाने अल्पावधीतच शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रिडा या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली असून विद्यापीठास वृक्षारोपण, मृदा व पाणी संवर्धन-साठवण आणि कार्बन श्रेयांकासाठी अनेक हरित पुरस्कार मिळाले आहेत.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम