काँत, ऑग्यूस्त : (१९ जानेवारी १७९८—५ सप्टेंबर १८५७). एकोणिसाव्या शतकातील एक प्रभावशाली फ्रेंच तत्त्वज्ञ. प्रत्यक्षार्थवादी तत्त्वज्ञानाचा प्रणेता आणि ‘मानवतेच्या धर्मा’चा संस्थापक. दक्षिण फ्रान्समध्ये माँपेल्ये येथे जन्म. त्याच्या रोमन कॅथलिक पंथीय आईवडिलांची ईश्वरावर आणि राजावर नितांत श्रद्धा होती. परंतु काँतला वयाच्या तेराव्या वर्षीच प्रचलित धर्माचा, ईश्वराचा व राजेशाहीचा वीट आला. अलौकिक बुद्धिमत्तेविषयी त्याची विद्यार्थीदशेतच ख्याती झाली. त्या काळच्या पॅरिसमधील प्रसिद्ध पॉलिटेक्निक स्कूलमध्ये त्याचे शिक्षण झाले. तेथे त्याला विज्ञानाची गोडी लागली. तेथील पुरोगामी वैचारिक वातावरणाने त्याला प्रगतिपर विचारांची ओळख झाली व विद्यापीठांतर्गत क्रांतिकारक चळवळीत भाग घ्यावयास मिळाला. बेंजामिन फ्रँक्लिन (१७०६—१७९०) या अमेरिकन सत्पुरुषाचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवून त्याने प्रतिकूल परिस्थितीतही ज्ञान मिळविण्याचा निर्धार केला आणि अतिशय काबाडकष्ट करून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.
ऑग्यूस्त काँतसेंट सॅंसीमाँ (१७६०—१८२५) नावाच्या अभिजात समाजवादी विचारवंताकडे काँत खाजगी चिटणीस म्हणून सहा वर्षे राहिला. सॅंसीमाँशी झालेल्या चर्चेतून त्याला सामाजिक समस्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून ऊहापोह करण्याची आणि विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञानाचा सामाजिक सुधारणेसाठी उपयोग करण्याची स्फूर्ती मिळाली.
त्याचे प्रथम कॅरोलिन मॉसिन नावाच्या अनाथ मुलीशी लग्न झाले. पण त्याचे वैवाहिक जीवन सुखी झाले नाही. त्याने अल्पावधीतच तिच्याशी घटस्फोट घेतला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्याचा मादाम क्लोतील्द दे व्होक्स या विवाहित स्त्रीशी घनिष्ठ परिचय झाला. पण धार्मिक वृत्तीच्या क्लोतील्दने आपल्या हद्दपार झालेल्या नवऱ्याशी घटस्फोटही घेतला नाही, की काँतशी विवाहबाह्य शरीरसंबंधही ठेवला नाही. ती वर्षभराच्या आत मरण पावली. तिच्या नैतिक चारित्र्याचा काँतच्या मनावर कायमचा प्रभाव पडला. त्याने आयुष्याच्या पूर्वार्धात विज्ञान आणि तर्कबुद्धी यांना प्राधान्य दिले; पण उत्तरार्धात मात्र भावना आणि धर्म यांना अधिक महत्त्व देऊन त्याने ‘मानवतेचा धर्म’ नावाचा एक नवा धर्म प्रस्थापित केला.
त्याने आपला ए डिस्कोर्स ऑन पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा सहा खंडांतील ग्रंथ १८३० ते १८४२ या बारा वर्षांच्या कालावधीत लिहिला आणि ए सिस्टिम ऑफ पॉझिटिव्ह पॉलिटी हा चार खंडांतील ग्रंथ १८५१ ते १८५४ या चार वर्षांत लिहून काढला.
पॅरिस येथे त्याचा कॅन्सरने देहान्त झाला. त्याचे पॅरिस येथील निवासस्थान जसेच्या तसे जतन करून ठेवण्यात आले आहे.
तत्त्वज्ञान : काँतचे तत्त्वज्ञान प्रत्यक्षार्थवादी होते. त्याच्या मते खरे ज्ञान हे इंद्रियदत्त अनुभवापुरतेच मर्यादित असते. इंद्रियानुभवाची मर्यादा ओलांडली की, ज्ञानप्राप्ती न होता केवळ आत्मवंचनाच होते. विज्ञान हेच श्रेष्ठ प्रतीचे ज्ञान होय. इंद्रियानुभवात आढळणाऱ्या सृष्टीचे विज्ञानांनी-शास्त्रांनी निरीक्षण-प्रयोग यांच्या मदतीने मिळविलेले वस्तुनिष्ठ ज्ञान हेच खरे ज्ञान असून तेवढ्यावरच मानवाने समाधान मानले पाहिजे. दृश्य सृष्टीपलीकडच्या सद्वस्तूची अथवा सत्तत्त्वांची माहिती मिळविण्याचा सारा प्रयत्न व्यर्थ आहे. प्रत्यक्षातील वस्तूंची फक्त दृश्य स्वरूपेच मानवास ज्ञात होऊ शकतात. त्यांची मूळ स्वरूपे अथवा त्यांच्या अंतर्यामी दडलेली तत्त्वे जाणून घेणे मानवास शक्यच नसते. म्हणूनच वस्तूंच्या अंतरंगातील मूळ कारणांचा शोध लावण्याचे तत्त्ववेत्त्यांचे आजवरचे सारे प्रयत्न फोल ठरले आहेत.
विज्ञान हे निसर्गातील घटना ‘का’ घडून येतात, याचे स्पष्टीकरण देण्याच्या अथवा जणू निसर्गशक्तींच्या मनातील हेतू हेरण्याच्या भरीस पडत नाही. त्या घटना ‘कशा’ घडून येतात, एवढेच जाणून घेण्याचा ते प्रयत्न करते. त्या घटना कोणत्या ठराविक क्रमाने घडून येतात हे निरीक्षणाद्वारे जाणून घेतले, की सध्याच्या घटनांवरून पुढे कोणत्या घटना घडतील याचे भाकित करता येते.
काँतच्या मते मानवी ज्ञानाच्या विकासात तीन अवस्था दाखवून देता येतात :
- धर्मशास्त्रीय विचार अथवा देवदेवतांविषयक कल्पना : या अवस्थेत माणूस निसर्गातील घटनांची निसर्गातील अथवा दैवी कारणे देत असतो. ही धर्मशास्त्रीय विचारसरणी काष्ठपाषाणपूजा, अनेकदैवतपूजा आणि एकेश्वरभक्ती अशा तीन टप्प्यांत विकसित होते आणि अनेकत्वाकडून एकत्वाकडे वळत जाते.
- तत्त्वमीमांसात्मक विचार अथवा परतत्त्वविषयक संकल्पना : या अवस्थेत माणूस वस्तूंची अथवा घटनांची मूळ कारणे अथवा अंतिम तत्त्वे काय असावीत, याविषयी तर्क करतो आणि निसर्गाच्या पसाऱ्यामागे मूर्त दैवतांऐवजी अमूर्त तत्त्वे पाहू लागतो. ही तत्त्वमीमांसापर विचारसरणीदेखील अनेकत्वाकडून एकत्वाकडे, अनेकतत्त्ववादाकडून एकतत्त्ववादाकडे झुकत असते. तत्त्वमीमांसात्मक विचारसरणी तर्कप्रधान असल्याकारणाने ती अनेकदा पूर्वप्रस्थापित सिद्धांतांची वैगुण्ये उघडकीला आणते आणि वैचारिक विध्वंसाला अथवा बौद्धिक संभ्रमाला कारणीभूत होते.
- वस्तुदर्शी विज्ञान अथवा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणी : या अवस्थेत माणूस निसर्गातील घटनांची वस्तुनिष्ठ वर्णने देत राहतो आणि निसर्गाचे नियम शोधून काढतो.
ज्ञानाच्या तीन अवस्थांचा हा सिद्धांत मांडून काँतने धर्मशास्त्रासोबत तत्त्वमीमांसेचेही अवमूल्यन करून टाकले आणि ज्ञानाची महती वाढविली. त्याचप्रमाणे त्याने विज्ञानांचा-शास्त्रांचा उत्पत्तिक्रमही ठरवून टाकला. अर्थात वैद्यकादी व्यवहारोपयोगी शास्त्रे ही गणितादी सैद्धांतिक शास्त्रांच्या मागूनच उदयास आली. सैद्धांतिक शास्त्रांत प्रथम गणितशास्त्र उदयास आले. नंतर खगोलशास्त्र, भौतिकी, रसायनशास्त्र, जीवविज्ञान आणि सरतेशेवटी समाजशास्त्र ही क्रमश: अस्तित्वात आली. यांतील प्रत्येक पुढले शास्त्र हे आधीच्या शास्त्रावर आधारलेले असून प्रत्येक शास्त्र हे ज्ञानाच्या तीन अवस्थांच्या सिद्धांतानुसार आधिदैविक, तत्त्वमीमांसात्मक आणि प्रत्यक्षार्थवादी अशा तीन टप्प्यांत विकसित झाले, असे काँतचे म्हणणे होते.
मागाहून उदयास आलेले विज्ञान हे जरी आधीच्या विज्ञानावर आधारित असले, तरी ते आधीच्या विज्ञानात सर्वस्वी विलीन करता येत नाही. वरच्या पातळीवरील विज्ञानाचा अभ्यास खालच्या पातळीवर उतरून करणे, यात उघडच तर्कदोष आहे. उदा., जीवविज्ञानीय आणि रसायनशास्त्रीय घडामोडींचे केवळ भौतिकीच्या भाषेत विवरण करणे किंवा निव्वळ भौतिकीचे तत्त्वज्ञान प्रतिपादन करणे, हे काँतला मंजूर नव्हते.
समाजशास्त्रही काँतची नवनिर्मिती होय. त्याने या नव्या शास्त्राची स्वतंत्र पायावर प्रतिष्ठापना करून त्यास इतर विज्ञानांच्या तोडीची प्रतिष्ठा मिळवून दिली. अर्थात आजच्या समाजशास्त्राचे स्वरूप काँतप्रणित समाजशास्त्राहून फारच भिन्न आहे. काँतच्या समाजशास्त्राची व्याप्ती अतिशय विस्तृत होती. त्यात त्याने सगळे नीतिशास्त्र आणि पुष्कळसे मानसशास्त्र अंतर्भूत केले होते. शिवाय त्याने शास्त्राची जी चढती श्रेणी ठरविली होती, तीत समाजशास्त्रास शिखराचे स्थान दिलेले होते. याचाच अर्थ असा की, या शास्त्राच्या उभारणीस आधीच्या सगळ्या शास्त्रांचा हातभार लागण्यासारखा आहे. म्हणजेच साऱ्या वैज्ञानिक ज्ञानाच्या मदतीने समाजशास्त्राची अथवा मानवाच्या सामाजिक जीवनाची रचना केली पाहिजे. धर्मशास्त्रीय आणि तत्त्वमीमांसात्मक विचारांवर उभारलेले आजवरचे समाजजीवन हे चुकीच्या पायावर उभारलेले असून ते खरे म्हणजे भौतिकशास्त्रीय ज्ञानावर अथवा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीवर उभारणे आवश्यक आहे, असे काँतचे मत होते.
काँतच्या समाजशास्त्राचे दोन विभाग होते :
- सामाजिक स्थितिकी : यात समाजाच्या सुस्थितीचा विचार केलेला होता. मानव हा समाजप्रिय प्राणी असून मानवी समाज हा व्यक्तिव्यक्तींमधील ‘सामाजिक करारा’तून निर्माण झालेला नाही. माणसामाणसांच्या देहमनांचे गुणधर्म मूलतः समान असून त्यांच्यात वांशिक, धार्मिक, राष्ट्रीय, भाषिक कारणांवरून पडलेले गट हे कृत्रिम, अतएव निरर्थक आहेत. सारी मानवजात एकात्म असून मानवी समाजाचे सारे घटक परस्परांवर अवलंबून असतात आणि सामाजिक जीवनाची आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, बौद्धिक आदी अंगे परस्परसंबद्ध असतात. मानव हा मूलतः स्वार्थी असतो, हे हॉब्जचे मत चुकीचे असून मानवी स्वभावात स्वार्थपरायणतेपेक्षा सामाजिक सहसंवेदनाच अधिक बलवत्तर असते. समाजाची सुस्थिती ही प्राधान्येकरून कुटुंबसंस्थेच्या स्थैर्यावर अवलंबून असते. यास्तव विवाहबंधनांसारखी कुटुंबजीवन अबाधित राखणारी बंधने समाजाने जपली पाहिजेत. समाजाची खरी सुधारणा आंतरिक नीतिमत्ता वृद्धिंगत केल्यानेच होते. ती राज्यक्रांत्यांनी अथवा संपत्तीच्या समान वाटणीने होत नाही. उत्कृष्ट समाजरचनेत जनतेचे नैतिक मार्गदर्शन करणारा चारित्र्यसंपन्न विज्ञानवेत्त्यांचा वर्ग असलाच पाहिजे. त्याचबरोबर विज्ञाननिष्ठ समाजरचना ही शेतीप्रधान न राहता अपरिहार्यपणे उद्योगप्रधान होऊन औद्योगिक कारभार कार्यक्षमतेने चालविणारा कुशल उद्योगपतींचा वर्ग उदयास येतो. व्यवहारचतुर उद्योगपतींच्या हाती शासनाची सूत्रे असावीत. शासकीय सत्ता आणि औद्योगिक व्यवस्था उद्योगपतींच्या हाती, तर वैचारिक प्रभुत्व आणि नैतिक मार्गदर्शन वैज्ञानिकांच्या हाती, अशी काँतप्रणीत आदर्श समाजाची रचना होती.
- सामाजिक गतिकी : यात सामाजिक स्थित्यंतराचा विचार केलेला होता. समाजजीवनाची उत्क्रांती मानवी ज्ञानाच्या उत्क्रांतीशी निगडीत असते. त्यामुळे ज्ञानाचा विकास असा धर्मशास्त्रीय, तत्त्वमीमांसात्मक आणि वस्तुदर्शी वा प्रत्यक्षार्थवादी अशा तीन टप्प्यांतून झाला; तसेच समाजजीवनाचे स्थित्यंतरही याच तीन टप्प्यांनी झाले. पहिल्या अवस्थेत, राजा हा ईश्वराचा अवतार अथवा प्रतिनिधी आहे, या धर्मभोळ्या समजुतीसोबत मानवी समाजात सर्वत्र राजसत्ता नांदत होती. दुसऱ्या अवस्थेत राजेशाहीची वैगुण्ये आणि राजे लोकांचे दुर्गुण लोकांना कळून चुकतात. राजेशाही खिळखिळी होऊन वर्गविद्रोह सुरू होतो आणि राजकीय क्रांत्या घडून येतात. शेवटच्या अवस्थेत औद्योगिक प्रगती होऊन आर्थिक सुबत्ता आणि वैज्ञानिक ज्ञान वाढीस लागते व समाजजीवनातील अंदाधुंदी नष्ट होऊन सुव्यवस्था नांदू लागते.
मानवी जीवनाचे उन्नयन करण्यासाठी धर्म आणि नीती यांची नितांत आवश्यकता आहे, अशी काँतची धारणा होती. म्हणून त्याने ‘मानवतेचा धर्म’ प्रस्थापित केला. जुन्या देवदेवतांची पूजा करणे हे अंधश्रद्धेचे लक्षण असल्याकारणाने मानवाने मानवतेची–बुद्धिवैभवाने आणि कलागुणांनी तळपणाऱ्या विभूतींची–पूजा करावी. मानवामानवांत दुरावा व तंटेबखेडे निर्माण करणाऱ्या प्रचलित अंधश्रद्धामय धर्मांचा त्याग करून सर्वांनी मानवताधर्माच्या झेंड्याखाली एकत्र यावे, अशी काँतची मनीषा होती; परंतु आधी बुद्धिनिष्ठ विज्ञानाचा पाठपुरावा करणाऱ्या काँतने शेवटी भावनाप्रधान धर्माची एवढी तरफदारी करावी, हे काँतच्या अनेक चाहत्यांना आत्मविसंगतच वाटले.
संदर्भ :
- Hutton, H. D. Comte’s Life and Work, London, 1892.
- Levy-Bruhi, Lucien Trans. Beaumont-Klein K. de, The Phillosophy of Auguste Comte, New York, 1903.
- Mill, J. S. Auguste Comte and Positivism, London, 1865.
- Watson, J. Comte, Mill and Spencer, 1899.