सिंग, अर्जन : (१५ एप्रिल १९१९ — १६ सप्टेंबर २०१७). भारताचे माजी वायुसेनाप्रमुख. जन्म ल्यालपूर येथे. वडिलांचे नाव किशन सिंग. माँटगोमेरी आणि लाहोर येथे शिक्षण. विमानोड्डाणाचे प्रशिक्षण इंग्‍लंडमधील क्रॅनवेल येथे (१९३८). भारतीय वायुसेनेत १९३९ मध्ये कमिशन. भारतीय वायुसेनेच्या पहिल्या स्क्वॉड्रनमध्ये असताना वायव्य सरहद्द प्रांतातील (१९३९) आणि आराकान आणि ब्रह्मदेश येथील (१९४४) हवाई कारवायांत भाग घेतला. विंग कमांडर म्हणून १९४५ मध्ये बढती. त्याच वर्षी इंग्‍लंडमधील शाही विमानदलाच्या महाविद्यालयात प्रशिक्षण. पुढे ग्रुप कॅप्टन म्हणून बढती व अंबाला येथील वायुसेना केंद्राचे प्रमुखपद (१९४७). नंतर वायुसेनेच्या प्रशिक्षण केंद्राचे संचालक (१९४८). १९४९ मध्ये इंग्‍लंडमधील संयुक्त लष्करी दलांच्या महाविद्यालयात प्रशिक्षण. १९५० मध्ये पुन्हा बढती. १९५९ मध्ये एअर व्हाइस मार्शल या पदावर नियुक्ती. पुढे त्यांची वायुसेनाप्रमुख पदावर १ ऑगस्ट १९६६ रोजी नेमणूक झाली आणि १५ जुलै १९६९ रोजी ते सेवानिवृत्त झाले. ते भारतीय हवाई दलातील एकमेव पंच तारांकित श्रेणी (Five Star Rank) असलेले अधिकारी होत.

आराकान व ब्रह्मदेशातील कामगिरीबद्दल अर्जन सिंग यांना विशिष्ट सेवापदक (Distinguished Flying Cross) देण्यात आले. भारतासकट अमेरिका, इंग्‍लंड व ऑस्ट्रेलिया या देशांच्या हवाई दलांच्या संयुक्त प्रशिक्षण सरावाचे ते प्रमुख होते (१९६३). १९६५ मध्ये पाकिस्तानबरोबरच्या युद्धात त्यांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याच वर्षी त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला. अर्जन सिंगांचा विशेष म्हणजे साठाहून अधिक नव्याजुन्या प्रकारची विमाने चालविण्यातील त्यांचे नैपुण्य. १९६२ मधील चिनी आक्रमणाच्या वेळी निरीक्षणासाठी ते आघाडीवर गेले होते. त्या वेळीही हवाई कारवाईत प्रत्यक्षपणे भाग घेण्याची संधी त्यांनी दवडली नाही. भारतीय हवाई दलाची कार्यक्षमता वाढविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे.

ते एक उत्कृष्ट जलतरणपटूही होते. त्यांनी भारतीय जलतरण संघाचे अध्यक्षपद भूषविले होते. मेलबर्न येथील ऑलिंपिक क्रीडासामन्यांत भारतीय क्रीडापटूंच्या पथकाचे नेतृत्व त्यांनी केले होते (१९५६). एप्रिल १९७१ मध्ये स्वित्झर्लंड येथे ते भारताचे राजदूत होते. तसेच १९७४ ते १९७७ या कालावधीसाठी त्यांची केन्या येथे उच्चायुक्तपदी निवड करण्यात आली होती.

त्यांच्या पत्नीचे नाव तेजी असून त्यांना अरविंद व आशा अशी दोन अपत्ये आहेत. अरविंद सिंग हे प्राध्यापक असून अमेरिकेत स्थित आहेत, तर आशा सिंग ह्या यूरोपात वास्तव्यास आहेत.

हृदयक्रिया बंद पडल्यामुळे त्यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.

संदर्भ :

  • https://starsunfolded.com/arjan-singh/