सिंग, दिलबाघ : (१० मार्च १९२६‒९ फेब्रुवारी २००१). भारतीय हवाई दलाचे प्रमुख. त्यांचा जन्म गुरदासपूर (पंजाब) येथे लष्करी वारसा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी झाले. त्यानंतर ते तत्कालीन हवाई दलात नोकरीस लागले. आवश्यक त्या प्रशिक्षणानंतर त्यांना १९४४ मध्ये वैमानिकाचे कमिशन मिळाले. त्यांच्या सक्रियात्मक हवाई प्रगतीची झेप मिग-२१ या विमानाला हवाई दलात प्रविष्ट केल्यानंतर सर्वांना कळाली. तत्पूर्वी त्यांनी नवी दिल्ली येथे ‘सुपरसॉनिक बँग’चा प्रथम प्रयोग केला, तेव्हा ‘मिस्टर चार-ए मॉडेल’ जाहीर रीत्या वस्तुसंग्रहार्थ ठेवण्यात आले. त्यांच्या हवाई दलातील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन ज्येष्ठतेनुसार त्यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली (१९८१) आणि नियत वयानुसार ते या पदावरून १९८४ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर भारत सरकारने त्यांची ब्राझिलमध्ये भारताचे राजदूत म्हणून नेमणूक केली (१९८५‒८७ ). उर्वरित जीवन त्यांनी वाचन-लेखन यांत व्यतीत केले.

डेहराडून (उत्तरांखड) येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा