सरीन, सतीश कुमार : (१ मार्च १९३९). भारताचे भूतपूर्व हवाई दलप्रमुख. विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवापदक आणि परमविशिष्ट सेवापदक यांचे मानकरी. जन्म रावळपिंडी (पाकिस्तान) येथे. त्यांचे मूळ घराणे वायव्य सरहद्द प्रांतातील. भारत-पाकिस्तान विभाजनानंतर हे कुटुंब दिल्लीत येऊन स्थायिक झाले. तेथेच त्यांचे प्रारंभीचे शालेय शिक्षण झाले. १९५४ मध्ये भारतीय हवाई दलात त्यांनी प्रवेश केला. तेथे गेल्यावर डेहराडूनच्या जॉइन्टस् सर्व्हिसेस विंग (विद्यमान राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) च्या पहिल्या वर्षीच्या तुकडीतून ते पदवीधर झाले आणि उड्डाणाच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली. २९ मे १९५७ रोजी हवाई दलाच्या उड्डाण विभागात त्यांना कमिशन मिळाले. उड्डाणाच्या कौशल्याबद्दल त्यांना हिम्मतसिंगजी विजयचिन्ह (Trophy) मिळाले. जुलै १९६२ मध्ये चिकाटी व कर्तव्यपरायणता या गुणांच्या जोरावर त्यांनी सर्व उमेदवारांत प्रथम कमांक संपादून पीएआय् (Pilot Attack Instruction) हा शिक्षणक्रम पूर्ण केला आणि वांछनीय नोरोन्हा विजयचिन्ह प्राप्त केले. ते जून १९६४ पर्यंत एटीडब्ल्यूच्या प्रशिक्षकपदावर होते.

सरीन हे तूफान स्क्वॉड्रन या लष्करी विमानतुकडीचा (पथकाचा) फ्लाइट कमांडर म्हणून जुलै १९६४ ते मार्च १९६६ पर्यंत हवाई दलाच्या पूर्व भागात काम करीत असताना भारत-पाकिस्तानमध्ये १९६५ साली युद्ध उद्भवले. त्या वेळी क. २९ स्कॉर्पिओज स्क्वॉड्रनद्वारे त्यांनी पूर्व पाकिस्तानातील लक्ष्यावर हल्ले केले. नंतर त्यांनी तेझपूर, बागडोगा आणि कुंभीगाम या केंद्रांमधून आपल्या स्क्वॉड्रनसमवेत कार्य केले.

हंटर्स स्क्वॉड्रनमध्ये एक वर्ष काम केल्यावर सरीन यांनी जून १९६७ ते जानेवारी १९७१ पर्यंत मिग-२१ या विमानांच्या पथकाचे फ्लाइट कमांडर म्हणून काम पाहिले. मिग-२१ या विमानांचा ताफा मिळाल्यानंतर आपल्या स्क्वॉड्रनचा कार्यकारी (Operational) दर्जा उंचविण्यात अल्पावधीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. या विशिष्ट कामगिरीमुळे त्यांना १९७० मध्ये वायुसेनापदक प्राप्त झाले.

वेलिंग्टन येथील हवाई दलाच्या लष्करी महाविद्यालयातून नोव्हेंबर १९७१ मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांची पूर्व वायुविभागाच्या (Eastern Air Command) मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध (बांगला देश युद्ध) पेटले (१९७१), तेव्हा त्यांना अगरतलाच्या आघाडी तळावर सर्व हवाई हालचालींचे नियंत्रण करण्याकरिता पाठविण्यात आले. सरीन यांनी दाखविलेली ही असामान्य कर्तव्यतत्परता आणि निष्ठा यांमुळे त्यांना हवाई मुख्यालयाकडून ‘कॅस’ (CAS) हे प्रशंसापत्र देण्यात आले. बांगला देश युद्धात अगरतला हा नॅट या छोट्या विमानांचा तळ होता. तेथील हवाई युद्ध नियोजनाची सर्व जबाबदारी सरीन यांच्यावर होती. त्यामध्ये चितगाँगवर बाँब टाकून त्यांनी पाकिस्तानी लष्करी सैन्याला हैराण केले. त्यांच्या यशस्वी धोरण व कार्याचा उचित सन्मान त्यांस वायुसेनापदक देऊन करण्यात आला. त्यानंतर त्यांची पूर्व हवाई कार्यालयाच्या मुख्यालयात अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे १९७३ मध्ये त्यांची सिनिअर फ्लाइट कमांडर म्हणून अदमपूरला नियुक्ती झाली. तेथील लष्करी विमानांच्या काफिल्यात दोन वर्षे काम केल्यानंतर सरीन यांना इराकमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांची अल्-कूट लष्करी हवाई तळावर नियुक्ती झाली (१९७५). तेथील दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी एक हजार सैनिकांना हवाई हल्ल्याचे प्रशिक्षण दिले. तेथून परतल्यावर त्यांची बरेलीच्या १५ क्रमांकाच्या भागात प्रमुख प्रचालन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली (१९७७). त्याच तळावर त्यांची पहिला कमांडंट (अधिपती-नायक) म्हणून नेमणूक झाली. या पदोन्नतीनंतर १९८१ मध्ये ते ग्रुप कॅप्टन झाले आणि पूर्व विभागातील एअर डिफेन्स सिग्नल युनिटचा सर्व कार्यभार त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर लागोपाठ पदोन्नती मिळून ते एअर डिफेन्स कमांडर, डब्ल्यूएसी आणि एसडब्ल्यूएसी झाले. ग्रुप कॅप्टन म्हणून सरीन हे एका लढाऊ तळाचे प्रमुख कार्यवाह होते. त्यांनी एका हवाई संरक्षण विभागाचे प्रमुख म्हणून त्याचप्रमाणे हवाई दलाच्या मुख्यालयात उड्डाण सुरक्षितता विभागाचे संयुक्त संचालक म्हणूनही काम पाहिले. त्यांना एअर कमोडोर म्हणून बढती मिळाली (जानेवारी १९८५) आणि त्यांची पश्चिम विभागाचे एअर डिफेन्स कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांची इंग्लंडमधील भारतीय उच्च आयुक्तालयात हवाई मदतनीस (Air Attache) म्हणून नेमणूक झाली (१९८९).

लंडन (ग्रेट ब्रिटन) येथील भारतीय दूतावासामध्ये हवाई संरक्षणविषयक सल्लगार म्हणून बजावलेल्या कामगिरीबद्दल सरीन यांना अतिविशिष्ट सेवापदक बहाल करण्यात आले (जानेवारी १९९०). ग्रेट ब्रिटनहून मायदेशी परतल्यावर एका अतिशय अवघड व धोक्याच्या, परंतु महत्त्वाच्या हवाई दलाच्या तळावर एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पश्चिम वायुदल क्षेत्रामधील हा तळ अथवा हे वायु स्थानक सर्वोत्कृष्ट कार्य करणारे हवाई स्थानक म्हणून गणले गेले.

एअर मार्शल म्हणून बढती मिळाल्यावर सरीन यांची केंद्रीय हवाई दलामध्ये (सेंट्रल एअर कमांड) वरिष्ठ हवाई दल अधिकारी (सीनिअर एअर स्टाफ ऑफिसर) म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे ऑक्टोबर १९९३ मध्ये स्वॅकचे (SWAC) एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जून १९९४ मध्ये पश्चिम विभागाच्या हवाई दलाचे प्रमुख अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

एअर मार्शल सरीन यांना हवाई दलातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंतु असामान्य सेवेबद्दल परमविशिष्ट सेवापदक बहाल करण्यात आले (जानेवारी १९९५). ऑगस्ट १९९५ पासून ते हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून काम पाहू लागले. हे पद त्यांनी ३१ डिसेंबर १९९५ अखेरपर्यंत सांभाळले. नंतर त्यांची भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली (३१ डिसेंबर १९९५ ते ३१ डिसेंबर १९९८). १९९८ मध्ये सरीन सेवानिवृत्त झाले.