कॅनडातील आँटॅरिओ प्रांताच्या उत्तरमध्य भागातून वाहणारी नदी. आँटॅरिओ प्रांतात मूळ स्वरूपातील ज्या काही मोजक्या नद्या आहेत, त्यांपैकी ही एक नदी असून ती प्रांतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब व मोठी नदी आहे. लांबी ९८२ किमी., जलवाहन क्षेत्र १,३५,००० चौ. किमी. समुद्र सपाटीपासून ३७१ मी. उंचीवर असलेल्या सेंट जोझफ सरोवरातून तिचा उगम होतो. सामान्यपणे पूर्वेकडे आणि ईशान्येकडे वाहत जाऊन हडसन उपसागराचा फाटा असलेल्या जेम्स उपसागराला ती मिळते. नदीचा सुरुवातीचा प्रवाह कॅनडाच्या ढालक्षेत्रातील अनेक द्रुतवाहांवरून तसेच एकमेकांशी जोडलेल्या सरोवर मालिकांमधून वाहतो. त्यांतील सेंट जोझफ हे सर्वांत मोठे सरोवर आहे. ऑल्बनी नदीला डावीकडून पगाशी, हेन्ली आणि एटोवामामी; तर उजवीकडून चीपे, स्ट्रीटफिल्ड, कनागमी, ओगोकी, शाबुस्क्वीआ, मिसेहको या प्रमुख उपनद्या मिळतात. कनागमी (लांबी ३२० किमी.) ही तिची सर्वांत मोठी उपनदी आहे. अनेक धबधब्यांवरून वाहत येणाऱ्या ओगोकी या तिच्या पूर्वीच्या उपनदीचा प्रवाहमार्ग निपिगान सरोवराकडे वळविण्यात आला आहे. निपिगान नदीच्या खोऱ्यात असलेल्या जलविद्युतनिर्मिती प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी तिचा प्रवाह वळविण्यात आला आहे. ओगोकी – ऑल्बनी संगमस्थानाच्या पुढे ऑल्बनी नदी कॅनडियन ढालक्षेत्रातून बाहेर पडते. त्यानंतरचा तिचा मुखापर्यंतचा प्रवाहमार्ग सु. ४०० किमी. लांबीचा आहे. ऑल्बनी नदीच्या पात्रात कागामी हे बेट असल्यामुळे तेथे नदी उत्तर व दक्षिण या दोन शाखांनी वाहते. ऑल्बनी नदी ही मुखाजवळ अनेक शाखांनी ॲकमिस्की खाडीमार्गे जेम्स उपसागराला मिळते. नदीच्या मुखाजवळ फोर्ट ऑल्बनी व कशीचेवन ही प्रमुख नगरे आहेत. ऑल्बनीचे खोरे ही क्री आणि ओजिब्वे या मूळ इंडियन जमातींची भूमी असून परंपरागत मासेमारी, प्राण्यांची शिकार व पारध या उदरनिर्वाहक व्यवसायांबरोबरच शासन पुरस्कृत स्थानिक खाणकाम व अरण्याेद्याेग प्रकल्पात आणि पर्यटन व्यवसायात ते काम करतात.

फोर्ट ऑल्बनी शहर

हडसन्स बे कंपनीचा गव्हर्नर चार्ल्स बेली या पहिल्या यूरोपीयन व्यक्तिला ही नदी दृष्टीस पडली. ऑल्बनीचा ड्यूक जेम्स यांच्या नावावरून नदीला हे नाव पडले. हा जेम्स पुढे इंग्लंडचा जेम्स दुसरा म्हणून राजा बनले. चार्ल्स बेली यांनी तिच्या मुखाशी १६८४ मध्ये स्थापन केलेल्या फोर्ट ऑल्बनी या हडसन्स बे कंपनीच्या व्यापारी ठाण्यापासून व्यापारी बोटी आत जात असत. फरच्या व्यापार काळात हा प्रमुख जलमार्ग होता. या नदीतून वाहतूक करण्यासाठी पहिल्यांदा प्रसिद्ध यॉर्क बोटी बनविण्यात आल्या. सपाट तळ असलेल्या या बोटी १२.२ मी. लांबीच्या आणि ३ मी. रुंदीच्या असत. त्यांची बांधणी यॉर्क कारखान्यात केली जाई. या प्रदेशात त्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात. नदीचा मुखापासूनचा आतील ४०० किमी. लांबीचा प्रवाहमार्ग जलवाहतूकयोग्य आहे. ऑल्बनी-कनागामी यांच्या संगमावर १७४३ मध्ये हेन्ली हाऊस हे हडसन्स बे कंपनीचे पहिले अंतर्गत व्यापारी ठाणे स्थापन करण्यात आले. नदीच्या वरच्या खोऱ्यात ऑझ्नबर्ग सरोवराच्या काठी स्थापन करण्यात आलेले ऑझ्नबर्ग हाऊस हे व्यापारी ठाणे सर्वांत यशस्वी होते. फर व्यापाराच्या दृष्टीने या नदीला १९३२ पर्यंत, म्हणजे मूसोनीपर्यंत लोहमार्ग सुरू होईपर्यंत महत्त्वाचे स्थान होते.

समीक्षक : माधव चौंडे